भीमरूपी तात्या (भाग २)

काहीही झालं तरी मानेवरचं जुवाड खाली टाकायचं नाही असा निर्धार करून मी पुढेपुढे जातच राहिलो आणि तोंडाने देवाचं नामस्मरण करतच राहिलो. वेदना वाढत गेल्या पण मी थांबलो नाही.

Story: तात्यांच्या बाता । दीपक मणेरीकर |
20th November 2021, 11:12 Hrs
भीमरूपी तात्या (भाग २)

बैलगाडीला जुंपलेले, संथ गतीने गाडी ओढणारे माझे आवडते रेडे, त्यांची वेसण हातात धरून गोण्यांना टेकून गाडी हाकत बसलेला मी व गाडीत लादलेल्या गोण्यांवर गोण्यांना गच्च बांधलेल्या दोऱ्या घट्ट पकडून बसलेला आमचा अतिशय कृश बांध्याचा संतोष अशी आमची वरात, त्या किर्र काळोखात,निर्मनुष्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भयानक जंगलातून, आमच्या घरापासून साधारण दोन मैलवर असणाऱ्या कोल्हे घाटीच्या पायथ्याशी पोचली आणि मी गाडी थांबवली. थोडंसं वजन कमी करावं या उद्देशाने मी व संतोष खाली उतरलो संतोषला गाडीच्या मागे रहायला सांगून मी गाडीच्या पुढे आलो व देवाचं नामस्मरण करून रेड्यांना गाडी ओढण्यासाठी हाकारा दिला.. प्रचंड ताकदीच्या रेड्यांनी अतिशय संयमाने व संथ गतीने चढाव चढायला सुरुवात केली. एरवीचे चढाव हळूहळू वाढत जाणारे असतात तसा हा कोल्हे घाटीचा चढाव नव्हता. अगदी मुळापासूनच सरळसोट उंचीवर जाणारा हा विचित्र व घाणेरडा चढाव, 'पठाणगा' व 'ढोरगा', एवढ्या वजनासकट सहजपणे चढू शकणार नाहीत याची मला पुरेपूर जाणीव होतीच. पण काहीसे त्रास सहन करत, 'ते' दोघेही, कोल्हे घाटीतून गाडी वर चढवतीलच अशी मला खात्री होती पण....... अवघे काही फूट अंतर कापताच गाडीवर ताण आल्यासारखा कर्र आवाज आला आणि माझ्या मनात चर्र झालं. रेड्यांचा श्वासोच्छ्वास जलद गतीने होतोय हे मला जाणवलं. मी लगेच गाडीच्या खाली मागच्या बाजूला बांधलेला कंदील सोडवून काढला आणि त्याची वात पेटवली. कंदील घेऊन मी पुढे आलो तेव्हा रेड्यांवर प्रचंड ताण पडत आहे आणि त्यांच्या पायांमधील अंतर वाढतंय हे मला कंदिलाच्या उजेडात दिसून आलं. एवढ्यात परिस्थितीची जाणीव झालेला संतोष पुढे येऊन म्हणाला "तात्या परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. लगेच साताठ पोती खाली काढून बाजूला ठेवू आणी पहिल्या परतणाऱ्या गाडीतून घरी न्यायला सांगू" मलाही संतोषचा विचार पटला होता पण तेवढ्यात दादा काकांचे ते शब्द माझ्या कानात घुमले आणि माझा अहंकार जागृत झाला. गोण्या कमी करायला मी नाकार दिला आणी गाडीच्या मागे जाऊन गाडीला रेटा द्यायला सुरुवात केली त्यामुळे रेड्यांवरचा ताण थोडासा कमी झाल्यासारखं मला वाटलं खरं पण तो क्षणिक दिलासा होता. मी मागून बैलगाडी ढकलत होतो एवढ्यात संतोष मागे आला व रेड्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचं मला त्याने सांगितलं..

गाडीच्या समोर येऊन बघितलं असता  रेड्यांच्या तोंडातून फसाफसा फेस येत आहे व त्यांचे डोळे फार भयानक झाले आहेत असं मला कंदिलाच्या प्रकाशात स्पष्टपणे दिसून आलं. माझ्या जिवाभावाच्या रेड्यांच्या जिवाला कसलाही धोका झालेला मला सहन झाला नसता. आता झटकन काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि तो मी क्षणातच घेतला. मी कंदील संतोषच्या हातात दिला व त्या उजेडात पळतच रस्त्याकडेला असलेले मोठ्यात मोठे दगड आणून बैलगाडीच्या चाकांना लावले जेणेकरून गाडी खाली उतरणार नाही.. एवढं करून मी लगबगीने गाडीसमोर आलो आणी गाडीला पाठ करून वाकत जुवाडाच्या खाली आलो. बैलगाडीच्या मध्यभागी असलेल्या जुवाडाला एक आडवा दांडा गच्च बांधलेला असतो ज्याच्या दोन्ही टोकांना खाचा करून त्याठिकाणी बैल किंवा रेडे बांधले जातात. मी, गाडीच्या मध्यभागी असलेल्या त्या जुवाडाच्या खाली आलो आणि गाडी अलगद थांबवून रेड्यांना सोडून देण्याची संतोषला जवळजवळ आज्ञाच दिली. माझा पावित्रा बघून संतोष भांबावून गेला पण माझा रोष ओढवून घेण्यापेक्षा माझं म्हणणं ऐकून त्याने अगोदर ढोरग्याला व नंतर पठाणग्याला मोकळा केला पण ती शहाणी जनावरं खांद्यावरचं जू सोडायला तयार होईनात. गाडीचं जुवाड खांद्यावर घेऊन त्याला बांधलेल्या आडव्या तुळईवर दोन्ही बाजूंनी हात अडकवत मी संपुर्ण गाडीचा भार माझ्या मानेवर घेतला व गाडी जराशी वर उचलली आणि तेवढ्यात त्या दोन्ही मुक्या जनावरांना संतोषने बाजूला खेचून घेतलं. त्यासरशी एक मरणप्राय सणक माझ्या मानेतून उठली. आता गाडी मागच्या मागे झुकून मी वरच्या बाजूला उसळतोय की काय असं मला वाटू लागलं. मी मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि एक जोरदार रेटा देत पहिलं पाऊल पुढे टाकलं. जीव गेला तरी बेहत्तर पण आता माघार घ्यायची नाही असा दृढनिश्चय मी मनोमन केला आणी हळूहळू पुढे सरकू लागलो. पाठीवर साताठशे किलोचा भार घेऊन मी बैलगाडी अक्षरशः जिवाच्या आकांताने ओढत होतो. माझ्या संपूर्ण शरिरातील रक्त, पायांच्या पोटऱ्या व माझं डोकं या दोनच ठिकाणी एकवटलं आहे आणि माझ्या या दोन्ही अवयवांचा आता कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो असं मला स्पष्टपणे जाणवू लागलं. काहीही झालं तरी मानेवरचं जुवाड खाली टाकायचं नाही असा निर्धार करून मी पुढेपुढे जातच राहिलो आणि तोंडाने देवाचं नामस्मरण करतच राहिलो. वेदना वाढत गेल्या पण मी थांबलो नाही. देवाने, दैवाने व  प्रचंड व्यायाम करून कमावलेल्या माझ्या देहाने मला साथ दिली व मी एकदाचा, कोल्हेघाटीच्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी ठरलो. मी गाडी ओढत सपाट रस्त्यावर पोचतो म्हणेपर्यंत 'पठाणगा' व 'ढोरगा' हे माझे लाडके रेडे पळत येऊन शहाण्यासारखे जुवाडाच्या खाली आपापल्या जागी कधी येऊन उभे राहिले हे मलाच समजलं नाही. "

तात्या थांबले.... त्यांनी, तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून घेतलं आणि तोंड वर करून ते सरळ घशात ओतलं.... पाणी गिळताना होणाऱ्या घुटूक घुटूक अशा त्यांच्या घशातील आवाजाने मी भानावर आलो आणि माझ्या मनावर एवढा वेळ तोलून धरलेला साताठशे किलोंचा भार मी अलगदपणे खाली ठेवला..... आमच्या भीमरूपी तात्यांना डोळ्यांमध्ये साठवत....