रताळ्याची खीर

Story: अन्नपूर्णा । शीतल लावणीस |
20th November 2021, 12:04 Hrs
रताळ्याची  खीर

भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. तसेच वेगवेगळ्या देवदेवतांच्या जत्रा भरवल्या जातात, ह्या जत्रेला  त्या त्या देवदेवतांचे भक्त म्हणा, महाजन म्हणा देवाच्या भेटीला आवर्जून असेल त्या ठिकाणाहून आपल्या घरी, नातेवाईकांकडे येतात. आपल्या माणसांना भेटतात. जत्रेच्या दिवशी घरात त्या दिवशी आनंदाचे वातावरण असते. जेवणात  नेहमीपेक्षा दोन-चार जिन्नस जास्त बनवले जातात आणि मुख्यत्वे करून ह्यात गोडाधोडाचा  पदार्थ आवर्जून  केला जातो. प्रत्येकजण  आपल्या रितीरिवाजानुसार परंपरागत चालून आलेले   गोडाचे  पदार्थ करतात. काही ठिकाणी  खीर बनवतात.तात्पर्य काय आलेल्या  पाहुण्यांचे तोंड गोड करणे.

 माझ्या माहेरी माघ महिन्यात श्री मारुतीरायची जत्रा भरते.  ह्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या जत्रेला भरपूर गर्दी असते. प्रत्येकाच्या दारात मारुतीरायाची  पालखी येते. लोक फळं, फुले देवाला अर्पण करून आरती दाखवतात.

   आमच्याकडे खूप लोक येतात. अश्या  वेळी आम्ही इतर फराळाबरोबर   त्यांना रताळ्याची खीर देतो. रताळ्याची खीर माझी  आई इतकी छान बनवत असे की त्याला कशाचीच  सर येत नसे.  मी तर  अगोदरच एक भांडं बाजूला काढून ठेवत असे. लोकाना तर  ह्या  खिरीची स्तुती  केल्याशिवाय राहवत नसे..तर आज आम्ही ही खीर कशी बनवली जात असे ते बघू.

खिरीसाठी लागणारे साहित्य..

साहित्य.

१/२ किलो रताळी  २ कप भरून.

१/२ कप गूळ. (आवडीप्रमाणे कमी जास्त करून शकता.)

 मोठ्या नारळाची एक वाटी किंवा  एक मध्यम आकाराचा  नारळ.

 चवीपुरते  मीठ.

१/२  चमचा  वेलची   पावडर.

एक टेबलंस्पून तांदळाचे  बारीक पीठ.

 कृती

१)  बाजारातून आणलेली रताळी मातीने माखलेली  असतात.  ती स्वच्छ धुणे गरजेचे असते. रताळी चांगली  धुवून घ्यावी. त्यांची सालं काढावी  मग आपल्याला हव्या तश्या त्याच्या गोल चकत्या कराव्या. व पाण्यात बुडवून ठेवाव्या.

२) नारळ  खवून  घ्यावा.

३) खवलेला  नारळ  मिक्सरमधून थोडं पाणी घालून वाटावा व त्याचे जाडसर दूध काढावे.  मग पुन्हा एकदा वाटून त्याचे एक कप दूध  काढावे.

४) धुतलेल्या रताळ्याचा  चकत्या एका जाड बुडाच्या भांड्यात   जरुरीपुरते   पाणी घालून  शिजवून घ्याव्यात.

५) मग त्यात   नारळाचे दुसऱ्यांदा काढलेले पातळ दूध घालावे.

६) त्यात गूळ घालावा. मीठ  घालावे.

७) एक मोठा चमचाभर  तांदळाचे पीठ पाव कप  पाण्यात कालवून त्यात घालावे.

 आता नारळाचे जाड दूध  घालावे.

८) शेवटी वेलची  पूड घालून ढवळावे.

९) चांगली उकळी आली की गॅस बंद करावा.

झाली आपली खीर  तयार.