होरपळ (भाग ५)

त्याच वर्षी गोव्याच्या गव्हर्नरने ख्रिस्तेतरांना धार्मिक विधी करण्यावर कायद्याने बंदी घातली त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित केले.हिंदू स्रियांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तरच त्यांना घरची संपत्ती मिळे. बापाविना पोरकी मुले जर १४ वर्षांखालील असतील तर त्यांना बाप्तिस्मा देऊन वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत ख्रिस्ती शिक्षकांच्या ताब्यात द्यावे. असा कायदा करून तो अंमलांतही आणला जाऊ लागला. हा कायदा १६७७ पर्यंत चालू होता. त्यामुळे किती तरी हिंदू ख्रिश्चन बनू लागले.

Story: मागोवा । तेजश्री गो. प्रभुगांवकर |
23rd October 2021, 11:35 Hrs
होरपळ (भाग ५)

'फ्रांशिस्क  बार्रेतो' गव्हर्नर असताना अश्या ३००० लोकांना सां पावलू कॉलेजीत बाप्तिस्मा देण्यात आला. त्याआधी पण राणी कातारीनच्या काळात धर्मांधतेचा कळस झाला होता. त्यांना हिंदू ब्राह्मणाचा विशेष द्वेष वाटायचा. त्यांच्या वा मूर्ती पूजकांच्या घरात देव्हारा दिसल्यास लगेचच बघणाऱ्याने तक्रार करावी. आर्च बिशप त्यांना पकडतील. मग अश्या माणसाची मालमत्ता तक्रारदारास अर्धी मिळेल आणि अर्धा हिस्सा चर्चच्या मालकीचा असेल. पाखंडी लोकांना ख्रिश्चनांसारखे कपडे म्हणजे (शर्ट पॅन्ट) घालता येणार नाहीत. हिंदु मुलींनी जर ख्रिस्ती धर्म स्विकारला, तर त्यांना आई बाबा वा नातलगांच्या इस्टेटीचा वाटा हक्काने मिळेल. त्या आधी फक्त मुलांना वाटा मिळत असे. पण २६ मार्च, १५५९ च्या हुकूमानुसार तो अधिकार मुलींनाही मिळू लागला.

त्यामुळे हिंदूचे ख्रिस्तीकरण अधिक जलद होऊ लागले. अश्या छ्ळामुळे आपल्या बायका मुलांना शेजारील राज्यात काहींनी पाठविले. आपली दुकाने बंद केली. खारे पाणी शेतात शिरून सरकारला उत्पन्न न घेता यावे म्हणून शेतातील बंधारे फोडून टाकले. अश्या तऱ्हेने १५५९ मध्ये गोमंतकीयांनी सरकारविरोधी पहिला विरोध दर्शविला. पण दुकाने उघडण्यासाठी धमकावणी देऊन बळजबरीने त्यांना भाग पाडले गेले. तसेच मोडलेले बांध दुरूस्त करावेत नपेक्षा ती शेते पोर्तुगीजांना देण्यात येतील. दुसऱ्या राज्यात ठेवलेल्यांना ताबडतोब आणावे, नाहीतर इथे येण्यास त्यांना कायम मनाई केली जाईल.परागंदा झालेले परत न आल्यास त्याच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल असे फर्मान काढले गेले. ह्या उठावाच्या म्होरक्यांना हद्दपार केले गेले. त्यामुळे घाबरून जाऊन, खूप मोठ्या संख्येने लोक धर्मांतर करू लागले. अनेक ब्राम्हण आपल्या मुलांबाळांसह धर्मांत्तर करण्यासाठी मिशनऱ्याकडे गेले. व्हायसरॉय ने 'सांगितले की शहरात दोनशे, खेडेगावात चारशे अशी धर्मांतरे होत असतील तर आपण स्वतः तिथे हजर  राहू.' अश्या बोलण्याने धर्मांतराला गती मिळाली.

१५५९ साली चोडण बेटात मोठ्या प्रमाणात हे धर्मांतर झाले. कारण तिथे एका लग्न समारभांत ब्राह्मणाच्या पंक्तीत वेष बदलून बसलेला एक ख्रिश्चन जेवला. मग ते लग्न रद्द ठरले. मग दोन वर्षांनी परत गुपचूप लग्न लावताना एका कॅथॉलिकने मिशनरीकडे तक्रार केली. दुसरे लग्न करणे कायद्याने गुन्हा ठरविल्याने सगळी मंडळी ख्रिस्ती होण्यास तयार झाली. करमळी, चोडण, कुठ्ठाळी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले.कुठ्ठाळी येथील मंगेशाचे देऊळ मोडून तिथे चर्च उभारली गेली. गोव्यात एकही  ख्रिस्तीकरणाशिवाय ऊरू नये असा राणी कॅथरीनचा आदेश होता.

आता देवळे मोडण्याचा सपाटाच सुरू झाला. मडगावचे देऊळ मोडून तिथे इस्पिरीतु सांतुचे(Holy Spirit)चर्च बांधले गेले. हिन्दु देशांतर करत. उरलेले मिशनऱ्यांचा द्वेषभाव बाळगून होते. पण सत्तेपुढे त्याचे काहीच  चालत नव्हते. त्यांना नवीन देवळे बांधण्यास मज्जाव होता आणि सासष्टी,बारदेश येथील देवळांचा विध्वंस तर झालाच होता. ख्रिस्ती धर्मसभा नवे नवे नियम तयार करून जनतेवर लादत होते आणि  शारीरिक छळ करत होते. कारण ह्या धर्मसभांना तो अधिकार दिला गेला होता.

ख्रिस्ती होऊ नको, असा सल्ला देणाऱ्याच्या नशिबी गुलामगिरी येई. गलबत व्हलविण्यासाठी गलबताच्या तळाशी त्यांना सांखळदंडानी जखडून ठेवत. कोणी आजारी वा कमजोर झाला तर त्याला समुद्रात फेकून देत. बहुतेक ब्राह्मण जनजागृतीचे काम करत म्हणून त्यांच्या मुक्त संचारावर बंदी घातली गेली. ब्राह्मणांची यादी केली गेली आणि ज्यांचा जन्म सासष्टी व बारदेश येथे झालेला असेल, त्यांना त्या गावात जाऊन राहण्यास सांगण्यात आले. इतरांना पोर्तुगीज राज्याबाहेर जाऊन रहा असे बजावले. जुन्या काबिजादी म्हणजे तिसवाडी, बारदेश व सासष्टी इथेच पोर्तुगीज राजवट होती. म्हणून त्या लोकांना ह्या तालुक्यांबाहेर जाण्यास सांगितले गेले. रोज रोज नव नवे कायदे करून ख्रिस्तेतरांना छळण्याचे नवे मार्ग शोधले जात व  हिंदूंना ख्रिस्ती होण्यास जुलूमजबरदस्तीने भाग पाडले जाई. जणू अमानुषतेचा कळसच झाला होता.(क्रमशः)

[संदर्भः-पुस्तक

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास

मनोहर हिरबा सरदेसाई ]