मजेशीर माणसं…

हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात तसे प्रत्येक व्यक्तीचे स्वभावही भिन्न भिन्न असतात. एखाद्या भरती ओहोटीसारखे!

Story: ललित । गाैरी भालचंद्र |
23rd October 2021, 12:29 am
मजेशीर माणसं…

त्यादिवशी तर गम्मतच झाली शेजारच्या 

माने आजीना ‘ जेवण काय केलाय ‘ असे ती  विचारात होती.. 

आजी म्हणाल्या,  " बटाट्याची भाजी..! "

" आम्ही पण तीच बनवलीय हो आज " ती म्हणाली. ती निघून गेल्यावर आजी म्हणाल्या. अस्स करते बघ रोज. काय केलाय असे नेहमी विचारून आपणही तेच केलाय असे सांगते. आता काय म्हणावं या बाईला?

कोणतीही नवीन गोष्ट शेजारी - पाजारी आणली की तिला फार लागायचं . म्हणायची , " स्वस्तच आहे ते... मग तो फ्रिज असो...टीव्ही असो... एअर कंडिशनर असो किंवा वॉशिंग मशीन !  मी पण आणणार आहे म्हणायची प्रत्येकाची नवीन वस्तू पाहिल्यावर. 

हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात तसे प्रत्येक व्यक्तीचे स्वभावही भिन्न भिन्न असतात. एखाद्या भरती ओहोटीसारखे! काही व्यक्ती देवाला नमस्कार करून रोजच्या दिनचर्येला सुरुवात करतात. एखाद्याच्या सुखात सहभागी होतात. पण काही व्यक्तींना मात्र तशी सवय नसते चांगलं वागायची. 

रात्री दहा साडेदहा वाजता येऊन " बस हा ! " असे म्हणून दरवाजावर सोडून जायची. लहान मुलांना काय कळतं , ती बसायची. एक कार्यक्रम संपला मग दुसरा,  तिसरा... तरी जायचं नाव नाही. आणि विचारलं तर मुलं सांगायची आपण येईपर्यंत येऊ नका म्हटलंय आईने. तोपर्यंत बघतो आम्ही. असं म्हणून आमच्याच सोफ्यावर  कार्यक्रम बघत बसायची. 

ती बाई आली तर म्हणायची, आम्ही फक्त आध्यात्मिक कार्यक्रम बघतो. इतर कोणाचेच पाहत नाही.  दुपारी १२ वाजता पोरीला शेजारच्या आजींकडे टीव्ही बघायला पाठवायची. " लाईट नसली तरी बस तू तिथे गप्पा मार आजीबरोबर... " म्हणून सांगायची. आणि आजीला म्हणायची, " तुमचाही टाईमपास होईल बरा... मी देवाचं करायला जाते हा. " असे म्हणून गडबडीने जायची. 

शेजारच्या आजी माझ्या आईला म्हणायच्या, "  माझी सुद्धा पोथी वाचायची असते नि जप करायचा. पण ही अशी देवाच्या नावाखाली पोरीला इथे बसवून जाते. काय करणार. ती दोन वर्षाची पोर माझ्याबरोबर कितीशी गप्पा करणार आणि मी तरी रोज तीन-चार तास काय बोलणार तिच्याशी? रात्री, दुपारी प्रत्येकवेळी देवाचं करायला हवं म्हणून सांगून सोडून जायची आजींकडे, कधी आमच्याकडे, कधी अजून शेजारच्या एकांकडे...ती पोरगी रोज यायची, थोड्यावेळाने झोपी पण जायची. झोपली म्हणून सांगायला गेलं तर म्हणायची, असं हो काय! मग झोपवायचं उचलून बेडवर, झोपेनं, तिथे काय नि इथे काय... ! कुठेतरी झोपली की झाली..."  

एक दिवस तर कमालच केलीन या बाईने. दुपारी दोन वाजता आमचं दार वाजलं... आईने दार उघडलं तो बाहेर नंदू उभा होता... तिचा मुलगा... दार उघडल्यावर तो आत आला... "  आईबाबा बाहेर गेलेत, दाराला कुलूप आहे म्हणून इथे आलो." तो म्हणाला, " कुठे गेले? " माझा प्रश्न... “  बाबा गावाला गेलेत... आणि आईला जेवायला बोलावलंय... मंगळवारचं... तिकडे गेलीय... " मी त्याला चटई , उशी आणून घालून दिली. लहानच तो बिचारा... झोपला माझ्या आईच्या बाजूला. झोप तर काहीच लागेना. तोही ह्या कुशीचा त्या कुशीवर तळमळत होता. 

" जेवलास का! " मी विचारले ' नाही ' असे  म्हटल्यावर मी चरकले , आईचाही जीव गलबलला. 

' का ऱे ' माझी आई उद्गारली.

आईने आज जेवणाचं केले नाही. बाहेर जेवायला जाणार म्हणून." तो म्हणाला. 

माझी आई ताबडतोब उठली आणि पोळीभाजीची ताटली घेऊन आली. त्यानं समाधानानं पोळीभाजी खाल्ली. वर ग्लासभर पाणी प्याला. तितक्यात 

त्याचे वडील गावाहून आले त्यावेळी तो 

त्यांच्यासोबत निघून गेला.   तशी परिस्थिती बरी होती तिची. दोनवेळचं खाऊन पिऊन सुखी होती. निदान कुकर तरी लावून जायचा. वरणभात जेवला असता पोर.  निदान त्याला बरोबर तरी न्यावं. तसा लहानच तो... पहिलीतला पोर... पण शेवटी माणूसच ना ! 'मुलं म्हणजे देवाघरची  फुलं ‘ ती निष्पाप , निरागस असतात अगदी.

पण ही बाई तशी मजेशीर होती. मन मात्र साफ होतं तीच.  मनात एक बाहेर एक असे अजिबात नव्हते. पण आपल्याच विचाराच्या नादात ती हे असं वागायची .