जीवनशैलीतील बदल ठरतोय PCODच्या समस्येवर उपाय

तरूणींमध्ये आजकाल पीसीओडी (PCOD: Polycystic Ovarian Diseases) अर्थात पीसीओएस (PCOS: Polycystic Ovarian Syndrome) चे प्रमाण वाढत असल्याचे आढळत आहे. बहुतांश स्त्रिया या आजाराबद्दल इतक्या अनभिज्ञ आहेत की त्यांना रुटीन चेकअप अथवा इतर विशिष्ट चाचण्या करताना आपल्याला हा सिंड्रोम असल्याचं कळतं. या आजाराचं गांभीर्य लक्षात घेता, महिलांनी पीसीओएसकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. नव्या संशोधनांच्या मते, या समस्येवर तोडगा म्हणून रोजच्या जीवनशैलीतील काही बदल प्रभावी ठरताना दिसून येत आहेत ही एक समाधानाची बाब आहे.

Story: आरोग्य । डॉ. इमॅन्युअल ग्रेसीअस, मडगाव |
23rd October 2021, 12:20 Hrs
जीवनशैलीतील बदल ठरतोय PCODच्या समस्येवर उपाय

जगभरातील विविध अभ्यासकांच्या मते, वय वर्षे १४ ते वय वर्षे ४५च्या वयोगटातील महिलांमध्ये बहुतांश महिलांना PCOSचे परिणाम जाणवतात जे त्यांच्या प्रजननशीलतेवर परिणाम करतात. जागतिक स्तरावरील अभ्यासानुसार, स्त्रियांमध्ये या समस्यांचे अंदाजे प्रमाण पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंत आहे, परंतु नियमित तपासणी किंवा इतर वेळी निदान होईपर्यंत बहुतेकांना या रोगाच्या लक्षणांबद्दल माहिती नसते. याचे परिणाम गंभीर असले तरी या आजाराबाबत महिलावर्ग फारसा जागरूक नसल्याची खंत मडगांव येथील ग्रेशियस मॅटर्निटी हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. इमॅन्यूएल ग्रेशियस यांनी व्यक्त केली आहे.

सध्याची धकाधकीची जीवनशैली, अनिश्चित आणि अनियोजित दिनचर्या, आहाराच्या बदलत्या सवयी तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चरमुळे शारीरिक हालचालींचा अभाव आणि इतर संबंधित कारणांमुळे PCODच्या केसेसमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. ही जीवनशैली बदलल्यास या महिलांना PCODमुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो, अशी आशा डॉ. ग्रेशियस यांनी व्यक्त केली आहे. 

PCODमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये चिकट द्रवाने भरलेल्या गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. मासिक पाळीच्या वेळी तो स्त्राव निघून जाण्याऐवजी तसाच राहतो आणि कालांतराने या गाठी मोठ्या होत जातात. त्यामुळे भविष्यात स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो.

PCOSच्या काही मूलभूत लक्षणांमध्ये मासिक पाळीला उशीर होणे, त्यात अनियमितता येणे किंवा पाळीचे दिवस घटणे अशा बाबी प्रामुख्याने आढळून येतात. याचसोबत काही स्त्रियांमध्ये हर्सुटीझमचीही लक्षणेही दिसून येतात, ज्यात अँड्रोजन्सच्या अतिरेकामुळे हनुवटी, छाती, पाठ आणि ओठांच्या वर पुरुषांसारखी केसांची वाढ दिसून येते. सौंदर्यावर परिणाम करणाऱ्या या लक्षणांमुळे स्त्रियांच्या मानसिकतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यांना अँक्झायटीसारख्या मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशीच आणखी काही लक्षणे म्हणजे चेहऱ्यावर मुरुम येणे, कालांतराने त्वचा काळी होणे आणि केस गळणे. काही केसेसमध्ये, अंडाशयांची वाढ बरीच जास्त झालेली दिसते ज्यातून मोठ्या प्रमाणात अँड्रोजन्सचा स्त्राव होतो जो प्रजननशीलतेसाठी मोठा अडथळा ठरतो.

बऱ्याच केसेसमध्ये स्त्रिया जेव्हा क्लिनिकमध्ये असफल गर्भधारणेबाबत निदान करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना आपल्याला असलेल्या PCOS किंवा PCODबद्दल कळते. PCODमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमधील मुख्य समस्या ही वंध्यत्व आहे. PCODमुळे ऑव्ह्युलेशन प्रक्रियेचा ऱ्हास होऊन अंडबीजांची निर्मिती थांबू शकते, जे वंध्यत्वाचे मूळ कारणांपैकी एक आहे. या प्रक्रियेला एनॉव्ह्युलेशन म्हणतात जी पॉलीसिस्टीक ओव्हरीजमुळे निर्माण होते आणि PCOSचं कारण बनते. नियमित शारीरिक हालचाली आणि शिस्तबद्ध व्यायामासोबत सकस, पोषक आणि उत्तम आहार असे जीवनशैलीतील महत्त्वाचे बदल PCOD टाळण्यासाठी मदत करू शकतात. अधूनमधून उपवास करत राहणे हाही या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. तसेच हा उपाय कधीकधी कसल्याही औषधांशिवाय हा त्रास टाळण्यासाठीही उपयुक्तही ठरू शकतो. त्याचबरोबर भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला सकस आहार घेणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे, आरोग्याबद्दल सतर्क असणे आणि नियमित व्यायाम करणे असे लहानसहान पण ठळक बदल स्त्रियांनी आपल्या जीवनशैलीत करणे आवश्यक आहे. पोषण आणि सकस आहाराचं म्हणाल तर आम्ही आमच्या रुग्णांना आरोग्यदायी आहाराचा प्लॅन बनवून देतो, ज्यात ठराविक वेळी आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर व्यायामाचा भाग म्हणून दररोज चालणे, सायकलिंग करणे तसेच कार्डिओ आणि स्ट्रेचिंगही महत्त्वाचे ठरते.

काही अशाही केसेस दिसतात ज्यात बाळंतपणानंतर PCOD आपोआप बरी झालेला आहे. असं का झालं असावं याबद्दल कल्पना नाही पण अशाही केसेस आहेत. गर्भवती अथवा स्तनदा असताना महिलांना एक वर्षापेक्षा अधिक काळ मासिक पाळी येतच नाही. या कालावधीत हार्मोनल संतुलन सुरळीत होतं आणि कालांतराने नियमित मासिक पाळी येऊ लागते. बऱ्याचशा केसेसमध्ये गर्भधारणेपूर्वी PCOSची लक्षणे स्पष्टपणे जाणवत असतानाही बाळंतपणानंतर मासिक पाळी नियमितपणे सुरु झाल्याचं दिसतं. असं असलं तरी, PCODवर उपाय म्हणून महिलांनी योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भधारणेचा पर्याय निवडू नये.” 

PCOS आणि PCODचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही तर बऱ्याचदा त्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन महिलांना त्यांच्या सौंदर्याविषयी काळजी वाटू लागते. विशेषतः शरीरात होणारे बदल, वाढतं वजन, केसांची अनपेक्षित वाढ आणि गळती अश्या सौंदर्याविषयक समस्यांनी चिंताग्रस्त झालेल्या त्यांना समुपदेशन करणे अशावेळी अत्यंत आवश्यक असते. PCODचे निराकरण करणे आणि त्यावर प्रभावीपणे उपचार करणे किंवा घेणे आवश्यक आहे. बऱ्याच जणींना झटपट बऱ्या करणाऱ्या गोळ्या किंवा औषधे हवी असतात. पण यापेक्षा, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा पर्याय अधिक प्रभावशाली ठरतो. याने त्या सशक्त आणि सुदृढ होऊ लागल्या, PCOD दरम्यान वाढलेले वजन कमी झाले की मासिक पाळीही नियमित होण्यास सुरुवात होते.

“समाजाने आधीच लादलेला वंध्यत्वाचा कलंकही या रुग्णांच्या मनावर आघात करतो.” बहुतांश स्त्रियांना या त्रासाला सामोरे जावे लागते. त्याचे विपरीत मानसिक परिणाम दिसू शकतात. बऱ्याच केसेसमध्ये पालक त्यांच्या तरुण मुलींच्या मासिक पाळीच्या अनियमिततेबाबत जाणून घेण्यासाठी क्लिनिकमध्ये येतात. आपली मुलगी मोठी झाल्यावर गर्भ धारण करू शकेल की नाही याची त्यांना काळजी असते. मुलींपेक्षा त्यांचे पालकच जास्त चिंताग्रस्त दिसतात.”

PCOD आणि PCOSच्या रुग्णांना सुरक्षित आणि समाजाच्या कुत्सित नजरांपासून मोकळं वातावरण मिळावे, निदान, उपचार आणि समुपदेशन सुकर व्हावे यासाठी या रुग्णांसाठी  आठवड्यातून एक दिवस खास नेमला आहे. त्याचा फायदा सुलभतेने उपचार करण्यासाठी तसेच रुग्णांना समुपदेशन करण्यासाठी होतो. कसलीही भीती अथवा तमा न बाळगता सर्वांनी इथं येणे आणि मोकळ्या मनाने उपचार करून घेणं, हे उद्दिष्ट आहे.

PCODची लक्षणे:

1. अनियमित, उशिरा येणारी मासिक पाळी, पाळीचे दिवस घटणे.

2. पुरुषांसारखी हनुवटी, छाती, पाठ आणि ओठांच्या वर केसांच्या वाढीसारखी ‘हर्सुटीझम’ची लक्षणे.

3. पुरळ.

4. केस गळणे, टक्कल पडणे.

5. त्वचा काळवंडणे.

जीवनशैलीतील महत्त्वाचे बदल:

1. अधूनमधून उपवास करण्याचा उत्तम, गुणकारी उपाय.

2. दररोज चालणे, सायकलिंग तसेच कार्डिओ, स्ट्रेचिंगचा समावेश असलेला व्यायाम.

3. ताज्या भाज्या आणि फळांचा सकस, पोषक आणि संतुलित आहार.

4. शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणे.

5. आरोग्याबद्दल जागरूक असणे.