फुलव पिसारा नाच....

निसर्गाची ही विलक्षण अशी निर्मिती. उत्कृष्ट कारागिरीने नटलेला असा हा मोर. पाहिला की पाहत रहावा, मनात आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा.

Story: ललित । युवराज्ञी नाईक |
15th October 2021, 10:19 pm
फुलव पिसारा नाच....

पावसाची रिमझिम थांबली रे,

तुझी माझी जोडी जमली रे,

आभाळात छान-छान सातरंगी कमान,

कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा

आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!

ग. दि. माडगुळकरांच्या लेखणीतून उतरलेले हे गीत  मोराच्या नृत्याचे विलक्षण दर्शन घडवते. त्यात पु.लं.ची लाभलेली सुमधूर चाल! हे गीत नेहमीच मन प्रसन्न करते. एक नवीन उत्साह देऊन जाते. प्रथम बोंडला प्राणी संग्रहालयात पिसारा फुलवलेला मोर मी पाहिला होता. पण त्यात तेवढी गंमत नव्हती जेवढी स्वतंत्र मोर मजेत पिसारा फुलवून नाचताना पाहण्यात असते.

त्यादिवशी मोराचा आवाज आला म्हणून घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून मी सहज डोकावून पाहिले. पाहते तर तिथे एक मोर आपला भला मोठा पिसारा फुलवीत होता. मी लगेच घरच्या मंडळीला बोलावून आणले. सर्वांना ते दृश्य फारच भावले. फोटो काढण्याचे फार प्रयत्न केले पण तो ज्या अंतरावर होता ते टिपणे तसे कठीणच होते.

फोटो जरी मिळाला नसला तरी ते नयनरम्य दृश्य माझ्या डोळ्यात भरून राहिले होते. त्यादिवसापासून पुन्हापुन्हा मी त्याच जागेवर लक्ष ठेऊन होते. माहीत होते तो येणार नाही आणि आला तर सहजासहजी पिसारा फुलवणार नाही. पण मनाच्या एका कोपऱ्यात फार सकारात्मक भाव होता हे सर्व घडल्याचा. नशीबवानच म्हणावे असे दोन दिवसांत पुन्हा मला त्याच ठिकाणी लांडोरांसमोर पिसारा फुलवून नाचताना तो मोर दिसला. पण त्या वेळेस माझे जास्त लक्ष त्याचे छायाचित्र टिपण्याकड होते आणि त्यामुळे डोळे भरून त्याला पाहताही आले नाही व फोटो पण मिळाला नाही.

त्यानंतर काही दिवस गेले, मोर दिसायचा पण पिसारा फुलवताना पाहिलेला तो तेवढाच होता. फोटो जरी मिळाला नसला तरी मी माझ्या डोळ्यात आणि मनात मात्र ते सुंदर दृश्य नक्कीच टिपून ठेवले होते. या सर्वांचे वर्णन मी माझ्या एका मैत्रिणीला पण सांगितले होते. तीही याच गावची रहिवासी असल्याने तिनेही पुष्कळदा मोर पाहिले होते पण पिसारा फुलवून नाचताना पाहण्याची इच्छा कोणाला नसते? तसेच काहिसं तिचं पण झालं होतं. त्या दिवसापासून तिचाही मनात पिसारा फुलवलेला मोर पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती.

आणखीन काही दिवस गेले आणि सहजच आम्ही दोघी फोनवर बोलत होते. ती अशीच बोलता बोलता घराबाहेर गेली आणि अचानक तिला काही अंतरावर मोर पिसारा फुलवताना दिसला. ती अतिशय आनंदाने तिथले वर्णन करत होती. त्या दिवशी मला न पाहताही आणखी एकदा पिसारा फुलवून नाचणारा मोर एका वेगळ्या रुपात अनुभवण्यास मिळाला. तिचा आनंद गगनात मावत नव्हता तोच सलग दुसऱ्या दिवशीही तिला नाचणारा मोर दिसला. तिच्या आनंदातच मला आनंद मिळत होता. तो पाहिलेला मोर डोळ्यांतून उतरत नव्हता.

‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ म्हणत श्रावण महिन्यास प्रारंभ झाला. निसर्ग आणि वातावरण अगदी प्रसन्न होते हे दिवस असतातच आनंदमय, मन प्रफुल्लित करणारे. अचानक एके श्रावण सकाळी मला आईने उठवले व लवकर येवून घरा शेजारी आलेला मोर पहायला सांगितले. मी गेलेही पहायला पण ते रोजचं झालं होतं. पण माझी एक मैत्रिण अगोदरच एक दिवस म्हणाली होती की तिला मोर पहायचा आहे, आला तर व्हिडिओ कॉल करून दाखव आपल्याला. त्यामुळे मी त्यादिवशी तिच्याकरिता म्हणून कॉल केला व बाहेर गेले तर तोच त्या मोराने पिसारा फुलवला. माझी अजिबात अपेक्षा नव्हती की तो पिसारा वगैरे फुलवेल. मला दिसणारा तो मोर तिला मात्र व्हिडिओ कॉलवर दिसत नव्हता. म्हणून नंतर व्हिडिओ काढून पाठव म्हणून तिने फोन ठेवला.

लगेचच मी कॅमेरा घेऊन जरा पुढे गेले. जरा दूरच होता तरीही मनप्रसन्न करीत होता. क्षणात ऊन आले की त्याचा पिसारा वेगळाच चकाकायचा. सुमारे अर्धा तास तो मोर लांडोरसमोर पिसारा फुलवून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होता. मी हळूहळू त्याच्या खूप कमी अंतरावर पोहोचले होते. लपून छपून त्याची अनेक छायाचित्रेही टिपली. त्या खडकांमागे लपून बसले होते. पायात पण तीव्र वेदना होत होत्या. पण त्या मोराकडे पाहून सर्व वेदना दूर व्हायच्या. त्याच्याकडे पाहून भलतच सुख मिळत होतं. मनसोक्त पाहिलेला त्या दिवशीचा तो मोर!

खरीच, निसर्गाची ही विलक्षण अशी निर्मिती. उत्कृष्ट कारागिरीने नटलेला असा हा मोर. पाहिला की पाहत रहावा, मनात आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा हा आपला राष्ट्रीय पक्षी, मोर!