अन्सारी प्रकरणी २५ रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th October 2021, 12:15 am
अन्सारी प्रकरणी २५ रोजी सुनावणी

पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली विभागाने ऑनलाइन बाल 

लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित अल्तामॅश अन्सारी याच्या विरोधात पणजी येथील 

उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात तथा पोक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले 

आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २५ रोजी होणार आहे.

या प्रकरणी सीबीआयच्या ऑनलाइन बाल लैंगिक शोषण विभागाने आंतरराष्ट्रीय 

पोलिसांच्या (इंटरपोल) माहितीवरून दि. २२ जून २०२० रोजी संशयित अल्तामॅश अन्सारी 

याच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याच्या (पोक्सो) 

कलम ४, ६, ८, १०, १२, १४ आणि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ ‘बी’ 

अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर संशयित गोव्यात असल्याची 

माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने दि. ६ जुलै २०२१ रोजी संशयित अल्तामॅश अन्सारी 

याला पणजीतून ताब्यात घेऊन अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याच्या भाड्याच्या 

खोलीची झडती घेऊन मोबाईल, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या  होता. 

त्यानंतर संशयिताला न्यायालयात हजर करून प्रथम १४ दिवस पोलीस कोठडी मिळवली. 

त्यानंतर संशयिताला गोव्यात तसेच महाराष्ट्रात नेऊन अत्याचार झालेल्या मुलांची जबानी 

घेऊन खातरजमा करण्यात आली. त्यानंतर संशयिताला पणजी येथील पोक्सो न्यायालयात 

उपस्थित करण्यात आले असता, न्यायालयाने संशयिताला न्यायालयीन कोठडी ठोठावली  

आहे. 

या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयिताचे विदेशी मित्र भारतात येऊन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्याकडून 

आणखी मोबाईल आणि तीन कॅमेरा जप्त करण्याची आवश्यकता असल्याची माहिती 

सीबीआयने न्यायालयात सादर केली आहे. या व्यतिरिक्त पीडित मुलांनी 

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर संशयिताची ओळख पटवून आणखी महत्त्वाचे पुरावे सादर 

करण्यात आले. या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने पणजी येथील पोक्सो 

न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.