आला आला दसरा सारा क्षीण विसरा

दसरा या सणाची माहिती देणारा विशेष लेख.

Story: लोकसंस्कृती/ पिरोज नाईक |
09th October 2021, 11:29 pm
आला आला दसरा सारा क्षीण विसरा

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा. दसरा हा दहा दिवसांचा सण आहे. नवरात्र संपून दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या नऊ दिवसात नऊ रूपांनी प्रगट झालेल्या आदिमाया, आदिशक्ती नवदुर्गेची रुपे पुजली जातात. नवरात्र हा दुर्गामातेचा उत्सव. दुर्गापूजा ही शक्ती पूजा आहे. देवाधिकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या, देवांचा राजा इंद्र याच्यावर  स्वर्गलोकीचे सिंहासन सोडून इतस्तत: वणवण भटकण्याची पाळी आणणाऱ्या महिषासुराचा आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेने वध केला व आपल्या पराक्रमाने देवांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे आश्विन शु. दशमी हा दिवस देशभरात आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो. हिंदू बांधवांचा हा पवित्र सण साडेतीन मुहुर्तापैकी एक या दिवशी नवीन वस्तू, वाहने, सोने यांची खरेदी केली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते. नवे संकल्प करण्याचा हा दिवस.

विजयादशमीला दसरा असेही म्हटले जाते. दसरा हा पराक्रमाचा व पौरुषत्वाचा दिवस आहे. या दिवशी रामाने रावणाबरोबर युद्ध करून त्यांच्या दहा शिरांचे छेदन केले रावणाचा वध केला. म्हणून या दिवसाला दशहरा असे म्हटले जाते. दसरा हा हमखास विजय मिळवून देण्याचा दिवस. पूर्वी अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करून दुसऱ्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी जात असत त्याला सिमोल्लंघन असे म्हणत. विजयादशमीच्या दिवशी ज्ञानाची देवता सरस्वती मातेची पूजा केली जाते. घराघरातून शस्त्र, अवजारे, वह्या पुस्तकांची पूजा करतात. शेतकरी पीक घरात आणून शेतावरील आयुद्यांची पूजा करतो.

अत्रुंज महालातील सावई वेरे गावात दसरोत्सवाच्या दिवशी पारंपरिक वाद्य संगीताबरोबर श्री मदनंताची पालखी सोने लुटण्यासाठी आपट्याच्या झाडाकडे जाते. तेथे आपट्याच्या झाडाची पूजा अर्चा झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. आपट्याची पाने एकमेकांना सोन्याच्या रुपात देतात व एकमेकांना नमस्कार करून एकमेकांना शुभेच्छा देतात. यावेळी येथे कोहळा कापतात व प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. नंतर पालखी परत मंदिराकडे येण्यास निघते. त्यावेळी प्रत्येकाच्या दारादारात पालखी थांबते व भक्तजनांकडून तळी स्वीकारते पालखी मंदिरात पोहोचल्यावर आरती होते.

आपले वैर, भांडण, हेवेदावे विसरून उदार व उदात्त भावनेने आदान प्रदान करण्याचा हा दिवस या दिवशी सोने लुटण्याची प्रथा आहे. आपट्याची पाने सोने स्वरुपात एकमेकांना देतात ही प्रथा का पडली यासाठी एक कथा सांगितली जाते. आपल्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरेनुसार विद्यार्थी गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. १४ वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरू त्याची परीक्षा घेत व घरी जाताना शिष्यसुद्धा गुरूला भेट म्हणून काहीतरी गुरूदक्षिणा देत. वरतंतू ऋषीमुनीकडे कौत्स नावाचा एक शिष्य शिक्षण घेत होता. १४ वर्षी शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्वगृही परतण्यासाठी आपल्या गुरुकडे परवानगी मागितली त्याकाळी ‘फी’ देण्याची पद्धत नव्हती. गुरूगृही पडेल ते काम करून शिक्षण घ्यायचे व शिक्षण पूर्ण झाल्यावर काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची अशी प्रथा होती. त्यामुळे कौत्स गुरूंना म्हणाला गुरूभक्त तुम्ही आम्हाला ज्ञान देऊन शहाणे केले त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय गुरूदक्षिणा देऊ त्यावेळी गुरू वरतंतू म्हणाले बाळ कौत्सा अरे ज्ञान हे दान करायचे असते त्याचा सौदा करायचा नसतो. तुम्ही शिकून ज्ञानी झालात हिच माझी गुरुदक्षिणा आहे. पण कौत्स काही केल्या ऐकेना तेव्हा ऋषीमुनी म्हणाले मी तुला चौदा वर्षे शिक्षण दिले वर्षाकाठी एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मला गुरुदक्षिणा म्हणून मिळाव्यात. हे ऐकून गरीब बिचारा कौत्स गांगरून गेला त्याला काय करावे ते सुचेना. एवढ्या मुद्रा कोठून आणू असे प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर आवासून उभे ठाकले. इतक्यात त्याला दानशूर रघुराजाची आठवण झाली. कौत्स रघुराजाकडे गेला. पण कर्म धर्म संयोगाने विश्र्वजित यज्ञ केल्यामुळे त्याचवेळी राजाचा खजिना संपला होता. हे ऐकून कौत्स निराश झाला. पण याचकाला रिक्त हस्ताने पाठविणाऱ्यापैकी रघुराजा नव्हता. त्याने कौत्साजवळ तीन दिवसांची मुदत मागितली आणि लगेच इंद्रावर स्वारी करण्याचा बेत निश्चित केला. ही बातमी इंद्रदेवाच्या कानावर गेली. त्याला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकिकत सांगितली कुबेराने मागचा पुढचा विचार न करता राजवाड्याजवळ असलेल्या आपट्याच्या झाडावरून सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन आपल्या गुरूजवळ गेला व गुरूदक्षिण घेण्याची विनंती केली. गुरूंनी त्यापैकी फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा स्विकारल्या शिल्लक राहिलेल्या मुद्रा घेऊन कौत्स राजाकडे गेला पण राजाने त्या सुवर्णमुद्रा घेण्यास नकार दिला. त्यावेळी कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटून नेण्यास सांगितले. लोकांनी त्या मुद्र लुटून नेल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. त्या दिवसापासून आपट्याच्या झाडाची पूजा करून आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा सुरू झाली.

विजयादिशमी हा दिवस निसर्गाची पूजा करण्याचा व निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्याची प्रथा आहे. पांडवांनी विराट नगरीत अज्ञातवासात जाताना आपली शस्त्रास्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली. अज्ञातवास संपताच शमीचे पूजन करून आपले काम निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करून पुन्हा आपल्या ताब्यात घेतली तो दिवस विजयादशमीचा होता.