आमची खादाडी

नीज गोयकार कितीही छान सुग्रास चवीचे दूध - तूपयुक्त सात्त्विक शिवराक जेवण खाऊन राहिल, मनापासून देवधर्म, रीती, रुढी पाळील ,पण तेवढा अवधी संपला की माशांसाठी धाव घेईल...

Story: ललित । डॉ. शिल्पा डुबळे परब ८२०८८५१६२ |
08th October 2021, 10:28 Hrs
आमची खादाडी

असे म्हणतात की गवय्या चांगला खवय्या असतो किंवा असला पाहिजे! गायला - वाजवायला ताकद नको का? आणि ज्या ज्या गवय्यांच्या/ कलाकारांच्या संपर्कात आले ते उत्तम खवय्ये तर आहेतच पण उत्तम स्वयंपाक करणारी माणसेही आहेत. आपल्या कलेसोबत खाण्याचीही  उत्तम जाण आणि आवड असलेली आहेत.माझे मित्रमंडळ सगळे असेच छान खवय्येगिरी करणारे आहे.तब्येत पाहून सहज त्याची कल्पना येते. अर्थात स्थूल या जमातीत न मोडता सुदृढ जमातीत आम्ही मोडतो.खाते पिते खानदान से आहोत ते समजते!Jokes apart! शेवटी सगळे पोटासाठी चाललेले असते नाही का ?..आता तुम्ही म्हणाल की, "पोटासाठी जगू नका." म्हणजे "खाण्यासाठी जगू नका...जगण्यासाठी खा" .हो हो ! अगदी बरोबर आहे.जगण्यासाठीच खातो आम्ही आणि थोडकेच खातो.पण जे खातो ते मात्र उत्तमच!सगळे उत्तम चवीचे,उत्तम प्रतीचे.

आता सकाळचा चहाच घ्या."चहा" या विषयावर काही कुणी पुस्तक लिहिलेले नसेल (पाकशास्त्र सोडून!).पण तुम्ही एखाद्याशी गप्पा मारायला जा.तिथे "चहा" लागतोच!

प्रत्येकाची चहाची वेळ आणि टेस्ट वेगळी.कुणाला कडक लागतो,कुणाला कोरा,कुणाला दुधाचाच,कुणाला आल्याचा,कुणाला वेलची आणि गवती चहा घालून,कुणाला मसाला चहा तर कुणाला गुळाचा आणि शेवग्याची शेंग छाप तब्येत जपणाऱ्या zero फिगर वाल्यांना "ग्रीन टी".कित्ती बाई चोचले त्या चहाचे आणि जिभेचे...आहे ना गंमत!!पुन्हा चहाच्या वेळा तर बघा..कुणाला उठल्या उठल्या नाही मिळाला तर "कॉल" येत नाही म्हणे!कुणाला नाश्त्यासोबत, कुणाला वाचताना, अभ्यास करताना ,कुणाला दुपारी - सायंकाळी,रात्री,पाऊस पडू लागला की,जागरण करायचे असले की, भजी सोबत असली की ! काय नी काय!!

    जेवणाचे देखील असेच ... आमच्या गोव्यात "शिवराक" जेवण अंदाजे आठवड्यातून एकदा आणि जास्तीतजास्त दोन दिवस म्हणजे सोमवार गुरुवारचे असते. अहो जन्मजात मासेखाऊ आम्ही.मग त्या शिवराक (शाकाहारी) जेवणाची कोण अपूर्वाई.त्यात जर श्रावण पाळणारी मंडळी असेल तर आम्ही कित्ती मोठा त्याग करतो बुआ असा आविर्भाव चेहऱ्यावर घेऊन त्या जेवणाच्या तऱ्हा तऱ्हा करायच्या. नेहमीच्या शिवराक जेवणात डाळ,वरण,आमटी, पोळी, भाजी व्यतिरिक्त मग विविध लोणची,पापड,चटण्या कोशिंबिरी. "लोणची" वरून आठवले. लोणच्याच्या कितीतरी तऱ्हा असतात.कैरी,लिंबू,मिरची हे झाले नेहमीचे,पण त्याबरोबर कच्ची हळद,आले,लसूण,करवंदे, आवळे,कारले,गाजर,मुळा या मंडळीलाही आम्ही सोडत नसतो!(मांसाहारी मंडळी बांगडा  आणि सुंगटाचेही लोणचे करतात). त्याशिवाय व्होड्यो, कापा त्यात मग सर्वसमावेशक बटाटा आहेच पण त्याशिवाय वांगे, निरफणस,सुरण,भोपळा,भेंडी,भोपळ्याची फुले, माडी अशा साऱ्यांना fry करून try केले जाते. खतखते, रोस(आमटी) ,सासाव(रायते) ,पातोळ्यो, अळू,कडण,गाठी,खीर, सोलकढी असे सगळे प्रकार आमच्या गोव्यात करतात. सासाव/रायते करताना त्यात पुन्हा घोटाचे,पिकल्या आंब्याचे,अननसाचे असे प्रकार असतात. अहो हे तर काहीच नाही खवय्येगिरी मधील creativity बद्दल काय बोलावे;तुम्हा आम्हाला फणसाच्या आठल्यांची  भाजी माहिती आहेच किंवा उकडून खाणे, डाळ,भाजीत त्यांचा उपयोग आपण करतो पण इथवर आम्ही थांबत नाही त्याची खीर आणि पुडींग पण करतो बरं का! मग काय बिशाद माशांची आठवण येईल!

    पण श्रावण वा गणेश चतुर्थी झाली की हुश्श!!असा मोठ्ठा सुस्कारा टाकून मासळीच्या शोधार्थ नीज गोंयकार निघतो.(पूर्णपणे शाकाहारी लोकांची माफी मागते).आमचा जन्मसिद्ध अधिकार तो.कितीही छान सुग्रास चवीचे दूध - तूपयुक्त सात्त्विक शिवराक जेवण खाऊन राहिल, मनापासून देवधर्म रीती रुढी पाळील ,पण तेवढा अवधी संपला की माशांसाठी धाव घेईल. शेवटी मासे ते मासे!त्याशिवाय आमची "उणी"(घास) उतरत नाही. गोव्यात माशांचे प्रकार आणि करण्याची पद्धत प्रत्येक भागात आणि समाजात वेगवेगळी उत्तमोत्तम आणि खास आहे. प्रत्येकांनी आपले cuisine कसोशीने जपले आहे.नुसत्या   "हुमणाच्याच" किती तरी पद्धती आणि चवी. इरडाचे, हळदीचे पान आणि तिर्फळ घातलेले सुक्के,तीसऱ्यो, खुब्याचे धब्दबित,भरलेले बांगडे आणि माणक्या,शिनाण्यो,सुक्या सुंगटाची किस्मुर ,चणक ,मोडसो, बोंबील,तामसो,मुद्दुसो,पापलेट,इस्वण fry... आणखी किती काय काय... आता बोला?!त्याशिवाय चिकन मटणचे तर वेगळे प्रकार आहेतच .पण "मासे"हा विशेष जिव्हाळ्याचा आणि आमचे staple food असल्याने त्यावर अतोनात प्रेम.

   आम्ही गवय्ये मंडळी corona पूर्व काळात विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचो.माझेही असेच आहे.जिथे ज्या भागात जाते तिथल्या local cuisine ची चव घेण्याचा प्रयत्न असतो.त्यातून त्या भागातील माणसांचे खानपान ,राहणीमान आणि गुणधर्म यांचा ढोबळमानाने अंदाज येतो. मात्र ज्यांना खवय्येगिरी विशेष आवडत नाही असे लोक जिथे जातील तिथे आपल्या नेहमीच्या जेवणाच्या शोधात असतात आणि त्यामुळे ते वेगळ्या चवीला आणि त्या चवींच्या आनंदाला मुकतात असे मला वाटते.

     अशाच एका कार्यक्रमाची आठवण झाली.उदयपूर येथे काही वर्षांपूर्वी संगीत नाटक अकादमी तर्फे युवा संमेलनात मी गायले होते.तिथे आमची उत्तम सोय होती आणि जेवण्यासाठी एका खास हॉटेलमध्ये सोय केली होती.अर्थातच शाकाहारी. मी आणि माझे तबला साथीदार वादक तिथे जेवायला गेलो.मोठ्ठ्या ताटात अनेक वाट्या आणि बराच वेळ ते एकेक करून त्या प्रत्येक वाटीमध्ये पदार्थ आणून भरत होते.साजूक तुपात बनवलेले अतिशय चविष्ट जेवण होते आणि त्यातील एक भाजी खूपच आवडली.unlimited ताट असल्याने ती दोन वेळा मागितली.शेवटी न राहून त्या वेटर दादाला विचारले की कसली भाजी आहे ही...आणि त्याचे उत्तर ऐकून थक्कच झाले! ती कारल्याची भाजी होती .कडूपणाचा लवलेश नसलेली अतिशय चविष्ट!त्यांना recipe विचारली तेव्हा हसून विनम्रपणे त्यांनी ती देण्यास नकार दिला.असो! तर असे छान खवय्येगिरीचे अनुभव आमच्या संगीत भ्रमंतीमुळे मिळतात.

   गावाकडे अनेक ठिकाणी agro tourism सुरू झालेला आहे.तिथे शेतावर राहून,निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदी बागडण्याचे,चुलीवरच्या गरमगरम गावरान अन्न ,भाकरी ठेचा,झुणका,भरीत, हुरडा असे अन्न खाऊन पाहण्याचे सुख अनुभवले पाहिजे.रानमेवा स्वतः शोधून तोडून खाल्ला पाहिजे.ज्या व्यक्तीला भटकंतीची आवड असते त्यांना हे सारे अनुभव असतीलच.देशभरात फिरताना  तिथल्या खाद्य संस्कृतीची ओळख होते.आणि त्यातील वैविध्य पाहून अवाक व्हायला होते. जसे राजस्थानात फिरायला गेला तर शीत कडी शोधू नका. दाल बाटी , चुर्मा खा,गुजरातेत त्यांचे खाक्रे, ढोकळे खा,बंगालात त्यांच्या अप्रतीम मिठाया चाखून पहा,केरळकडे गेलात तर डोसे,तांदळाचे पुट्टू खाऊन पाहा.आपल्या देशात इतके काही वैविध्य आहे आणि तेच वैविध्य जेवणा खाण्यात देखील आहे. संधी मिळताच त्याचा आस्वाद नक्कीच घेतला पाहिजे.नाहीतर जीवनातल्या एका मोठ्या आनंदाला आपण मुकतो असे मला वाटते. आपल्या देशात इतके सारे  वैविध्य आहे म्हणून इथे जगण्यात आनंद आहे. आपले सणवार,खाद्यसंस्कृती,वेशभूषा,भाषा,संगीत,कला सगळ्यांमध्ये वैविध्य अमाप भरलेले आहे.म्हणून तर जीवनात आनंद आहे .नाही का?  तुम्हाला काय वाटते?!