हरवलेलं पाखरू

Story: निलिमा भिसाजी |
08th October 2021, 10:26 Hrs
हरवलेलं पाखरू

हरवलेल्या पाखरांपैकी एक तू पण समंजस पाखरू. ज्याने आपला समंजसपणा दाखवून आपली इच्छा आकांशा पूर्ण केली. उंच डोंगर दर्यावर चढला. चढताना अनेक चढ उतार आले. आपल्यावर बंधन घालणारे, संकुचित  करणारे, खोटे आरोप घालणारे, तुच्छ लेखणारे, कुजकट लोक अधिक प्रमाणात भेटले पण त्याकडे दुर्लक्ष केले. पण तो थांबला नाही. मनातील भीती संपली व शक्तीचा जन्म झाला. कुणाचाही आधार न लाभता उंच शिखर यात्रा करुन आला. या यात्रेत दिनक्रमाचे  वैविध्य जाणून घेतले. लहान मोठ्या सोबत कसे वागावे याची दक्षता घेतली. आपली जिथे कदर नाही तिथे आपण कधीही जायचे नाही. असा ठाम निर्णय घेतला. स्वतः गप्पिष्ट असल्याने इतरांशी बोलत राहिला. त्यातून अनेक माणसे संपर्कात आली. नकळत  काही कहाण्या समोर आल्या व वेळ प्रसंगी त्या सूटत ही  गेल्या. वेळ निघून गेला परंतु वेदना मात्र नाही. एखाद्या प्रसंग जरी आठवला , की त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर,  ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी आल्याशिवाय राहत नाही. असे अनेक प्रसंग  आपल्या आयुष्यात आले पण ते काही चिरकाल टिकले नाहीत. कारण वादळे  जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ती निघूनही जातात. आपल्याला वादळ महत्त्वाचे नसते. फक्त  प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी झुंज देऊन त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

तसेच कालांतराने वादळ नष्ट झाले.  वातावरण प्रफुल्लित झाले. नात्यातील जवळीकता उदयास आली. योग्य वेळी आई वडिलाचे पाठबळ लाभल्याने निःस्वार्थपणे आकाशात झेप घेतली. भडकलेले  पाखरू पुन्हा एकदा समंजस पाखरू झाले.