गोव्यातील बेरोजगारीचे सरकारसमोर आव्हान!

मायकल लोबो : शिवोलीत संधीची प्रतीक्षा, इच्छुकांना माघारीसाठी विनंती करू शकतो


22nd September 2021, 11:29 pm
गोव्यातील बेरोजगारीचे सरकारसमोर आव्हान!

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : गोव्यात बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. विद्यमान व आगामी सरकारसमोर ही समस्या हाताळण्याचे मोठे आव्हान असेल, असे मत ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. तसेच निवडणूक लढण्यापासून आम्ही कुणालाच अडवू शकत नाही पण, शिवोलीमध्ये आम्हाला पाच वर्षे लोकांसाठी प्रत्यक्षात काहीतरी करून दाखविण्याची संधी हवी आहे. त्यासाठी जनहितार्थ आपण इच्छुकांना माघार घेण्याची विनंती करू शकतो आणि हे लोक आमच्यासोबत राहतील, असेही लोबो म्हणाले.
पर्रा येथे मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते. सध्या सरकारने दहा हजार नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत पाच हजार सरकारी नोकर्‍यांची जाहिरात केली आहे, पण निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत अडीच हजारपर्यंत नोकर्‍यांची प्रत्यक्षात नियुक्तीपत्रे उमेदवारांच्या हाती पडतील, असे लोबो म्हणाले.
विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत ही अडीच हजार पदे भरली जातील. उर्वरित पदांची भरती नवीन सरकारमध्ये होईल. पोलीस खात्याशी निगडित जास्त पदे आहेत. त्यांच्या शारीरिक चाचण्या वगैरे यांना वेळ लागेल. त्यामुळे संबंधितांना आचार संहितेनंंतरच नियुक्तीपत्रे मिळतील, तर परिचारिका वगैरे आदी पदांची भरती लवकर होईल.
करोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले. हॉटेलमधील ५० टक्के कर्मचारी वर्ग सध्या कामाअभावी घरी आहे. त्यांना पुन्हा रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रशिया, युरोपमधील चार्टर विमाने गोव्यात सुरू करावीत, अशी विनंती आपण करणार आहे, असे लोबो म्हणाले.
गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची गरज आहे. करोना लसीचे दोन डोस आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्या पर्यटकांना गोव्यात पर्यटनासाठी येण्यास परवानगी द्यावी. यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल, असे लोबो म्हणाले.
गोव्यात आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या घोषणा व्यावहारिकदृष्ट्या राबविणे शक्य नाही. दिल्ली हे व्यवसाय क्रियाकलापचे केंद्रस्थान आहे. तेथे पैशांची उलाढाल मोठी होते. येणार्‍या कराच्या उत्पन्नातून योजनांची खैरात करणे त्या सरकारला शक्य आहे, पण गोव्यातील खनिज व्यवसाय ठप्प आहे. करोनाची पर्यटनाला झळ बसली आहे. अशा स्थितीत कर्ज काढून योजना राबविणे किंवा मोफत योजनांची खैरात करणे सरकारला जमणार नाही, असे मत लोबो यांनी व्यक्त केले.
निवडणुका येण्यापूर्वी अनेक राजकीय पक्ष उदयास येतात. अनेकजण उमेदवारीसाठी धडपडतात. साडेचार वर्षे ही मंडळी काहीच करीत नाहीत, पण ऐन निवडणुकीवेळी डोक वर काढतात. ज्यांना उमेदवारी मिळत नाही, ते मग पर्यायी पक्षांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करतात. गोव्यात टीएमसी पक्ष येऊ पाहात आहे, अशी चर्चा आहे. अनेकजण आमदारांच्या विरोधात वातावरण आहे का हे तपासतात. मात्र गोव्यातील जनता सुजाण आहेत. कळंगुटमध्ये अद्याप कुणीही हॅट्रिक केलेली नाही, पण कळंगुट मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभी राहील, याची मला खात्री आहे, असे मंत्री लोबो म्हणाले.
निवडणुका लढण्यापासून आम्ही कुणालाच अडवू शकत नाही, पण शिवोलीमध्ये आम्हाला पाच वर्षे लोकांसाठी प्रत्यक्षात काहीतरी करून दाखविण्याची संधी हवी. त्यासाठी जनहितार्थ मी इच्छुकांना माघार घेण्याची विनंती करू शकतो आणि हे लोक आमच्यासोबत राहतील, असे ग्रामीण विकास मंत्री लोबो यांनी सांगितले.