तात्या पाण्यात

पूर्वार्धात आपण पहिले की तात्या गणपती विसर्जन करायला मानशीच्या पाण्यात गेले असता मत्स्यकन्या निराली तात्यांचे अपहरण करुन आपल्या राजमहाली आपल्या वडीलांच्या समोर हजर करते. आता पुढे…

Story: तात्यांच्या बाता/ दीपक मणेरीकर |
19th September 2021, 12:30 Hrs

मला 'त्या' मत्स्यकन्या सेविकांनी मत्स्यराज खवलसींगांच्या समोर हजर केला आणि निराली बोलू लागली. " तात्या, आम्ही रोज ज्या ठिकाणी खेळायला जातो, तिथे मला हा मानव दिसला व माझं त्याच्यावर प्रेम जडलं. मला या मानवाशी लग्न करायची इच्छा आहे" हे शब्द ऐकून मला त्या पाण्यातसुध्दा घाम फुटला. मी काही बोललो आणि त्या खवलसींगाला राग आला तर शिक्षा म्हणून तो मला तिथेच तैनात असलेल्या पिऱ्हाना जातीच्या मत्स्यसेवकांच्या तोंडी देईल अशी मला भीती वाटली म्हणून मी घाबरून, पुढे काय होतंय याची वाट पहात शांत राहिलो. आपल्या कन्येचं बोलणं ऐकून, खवलसींग म्हणाले " हे मानवा, एरवी आम्ही मानव जातीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण माझ्या लाडक्या मुलीला तू आवडल्याकारणाने मी तुला माझ्या मुलीशी विवाह करण्याची विनंती करत आहे. माझ्या विनंतीला मान देऊन जर तू लग्नाला तयार झाला नाहीस तर मी जबरदस्तीने तुझं लग्न तिच्याशी लावून देईन. बोल तुला हे मान्य आहे का? " मी फारच घाबरलो होतो. तरीही, जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या नवविवाहित वधूशी प्रतारणा करून मी या निरालीशी अजिबात लग्न करणार नाही असा दृढनिश्चय मी मनोमन केला आणि भीतभीतच, खवलसींगांकडे न बघता, मान खाली घालून, बोलू लागलो, " महाराज तुम्ही दिलेली ऑफर एवढी जबरदस्त आहे की पृथ्वीवरील एकापेक्षा एक सुंदर व श्रीमंत युवक ती स्विकारायला एका पायावर तयार होतील पण मी एकपत्नी व्रत घेतलेला एक साधा व सरळमार्गी गृहस्थ आहे. माझ्या घरी यावेळी फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली असेल. माझ्या मृत्यूच्या भीतीने माझे आईबाबा व माझी नवविवाहित पत्नी यांची फार बिकट स्थिती झाली असेल. माझी माणसं टाहो फोडून रडत, ईश्वराचा धावा करत, विलाप करत असतील. मी तुमची ही ऑफर स्विकारू शकत नाही. मला माफ करा व मला माझ्या घरी जाऊ द्या अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. " एवढं बोलून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात रामरक्षा म्हणत, पुढे खवलसींग महाराज काय करतात याची वाट पाहू लागलो. 

आता मी मान वर करून एकवार महाराज खवलसींगांकडे नजर टाकली व माझी भीती काहीशी कमी झाली. मत्स्यराज खवलसींग माझ्याकडे बघून प्रसन्न हास्य करत असलेले बघून मला जरा बरं वाटलं. पण माझी भीती संपूर्णपणे गेलेली नव्हती. कारण आपल्या नाटक सिनेमातील खलनायक कितीही राग आला तरी हसत असलेले मी बघितले होते. पण तेवढ्यात महाराज खवलसींग बोलू लागले. ते म्हणाले, " बेटा निराली, आपल्या मत्स्यलोकात मानव जातीविषयी अतिशय तिटकारा आहे. तशात जर तुझं लग्न मी या मानवाशी लावून दिलं तर आमच्या बिरादरीत खळबळ माजेल. इतर राज्यातील राजे माझ्यावर आक्रमण करतील. केवळ तुझ्या इच्छेखातर मी या मानवाशी तुझं लग्न लावून द्यायला तयार झालो. पण या मानवपुत्राचं बोलणं ऐकून मला त्याची कणव आली आहे. तुझ्याशी लग्न केल्याने धन, ऐश्वर्य व मानमरातब प्राप्त होईल हे माहीत असूनही तो त्या मोहाला बळी पडला नाही. ही गोष्ट मला फार आवडली. त्याच्यावर अन्याय करून तुला सुखी करणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही आणि म्हणून मी माझ्या सेवकांना आज्ञा करतो की, या मानवपुत्राला, आमच्या मुदपाकखान्यात नेऊन, भरपूर जेवण देऊन, किमती भेटवस्तू देऊन, त्वरित, त्याच्या राज्यात नेऊन सोडण्यात यावं. " मत्स्यराज खवलसींगांचं बोलणं संपल्यावर ' महाराज खवलसींगांचा विजय असो' अशा आरोळ्यांनी तो राजमहाल अक्षरशः दुमदुमून गेला. 

मत्स्यराज श्री खवलसींग महाराजांची आज्ञा होताच दोन सेवकांनी मला त्यांच्या सोबत निघण्याची विनंती केली. पडत्या फळाची आज्ञा मानून, मी त्यांच्या मागून निघालोच. मागे परतताना मी निरालीकडे अजिबात बघितलं नाही कारण तिचा रडवा चेहरा मी बघूच शकलो नसतो. त्या मत्स्यसैनिकांनी देऊ केलेलं भोजन व भेटवस्तू घ्यायला , सन्मानपूर्वक नकार देत मला माझ्या गावी जाण्याची वाट दाखवण्याची मी त्यांना विनंती केली. माझ्या विनंतीला मान देऊन, कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता त्या बिचार्‍यांनी मला लगबगीने, त्या राजवाड्याच्या बाहेर आणला. एक रक्षक माझ्या पुढे व दुसरा माझ्या मागे असा आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. अवघ्या पाच सहा मिनिटात समुद्र किनाऱ्याजवळ पोचल्याची लक्षणं दिसल्यावर मी त्या रक्षकांना मागे फिरण्याची विनंती केली व मी समुद्र किनाऱ्यावर दाखल झालो. चहूबाजूंनी मिट्ट काळोख पसरला होता. माझं संपूर्ण अंग माणसाचंच आहे हे चाचपणी करून मी निश्चित केलं. मी नक्की कुठे आहे हेसुध्दा समजणं कठीण होतं  म्हणून रात्रभर मी त्या वाळूवर पडून राहिलो. पहाटे जरासा उजेड पडल्यावर, आजूबाजूला नजर टाकली तेंव्हा मी, मिरामारच्या किनाऱ्यावर असल्याचं माझ्या लक्षात आलं. अंगावर बाहेर घालायचे चांगले कपडे नसल्याने, संपूर्ण सुर्योदय होण्यापूर्वीच मी घराची वाट धरली व आडबाजूने वाट काढत कसाबसा दुपारपर्यंत माझ्या गावात पोचलो. मला पाहताच माझ्या गावकऱ्यांची व माझ्या घरच्यांची काय परिस्थिती झाली हे मी आत्ता इथे व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर साधारण एक वर्षापर्यंत, मला पाजलेल्या त्या द्रव्याचा परिणाम जशासतसा शिल्लक होता. त्या दिवसात मी पाण्यात कितीही वेळ पोहू शकत होतो व मला मासे आपापसात काय बोलत आहेत हे ही समजत असे. मग कधीतरी हळूहळू त्या द्रव्याचा, माझ्यावरील अंमल कमी होत होत नाहीसा झाला. पण तेवढ्या कालावधीत मी त्या मत्स्यराज्याच्या जवळपाससुध्दा कधी फिरकलो नाही. " तात्या थांबले.... आम्ही तात्यांकडे अचंब्याने बघत बसलो.... तात्या ,एखाद्या घनघोर लढाईत प्रचंड पराक्रम गाजवून आल्याच्या आविर्भावात आम्हा सर्वांवर नजर फिरवत आरामखुर्चीतून उठले...