बी डी डी

कितीदा वरवर गंमतीची वाटणारी ही बाब हळूहळू नकारात्मक प्रवृत्तीत विघटित होऊ शकते याचे भान ठेवून त्यावर योग्य वेळी उपचार होणे गरजेचे असते.

Story: स्टेथोस्कोप/ डॉ. अनिकेत मयेकर |
19th September 2021, 12:25 am
बी डी डी

रोज संध्याकाळी सहा वाजता क्लास सुटून नेहा घरी जायला आणि नेमके ती ज्या बसमध्ये चढायची त्या बसमध्ये एक - म्हटलं तर वयस्कर, पण राहणीमान अगदी तरुण पंचविशीतल्या मुलाला लाजवतील असे एक आजोबा त्या बसमध्ये चढायचे. वय असेल ६५ ते ७०च्या दरम्यानचं. फुलाफुलांचा इंग्लिश रंगाचा छानसा कडक इस्त्रीवाला शर्ट, तशीच कडक इस्त्रीवाली पॅन्ट. बसमध्ये ते असताना छानसा मंदसा - बहुतेक परदेशी अत्तराचा सुगंध बसभर दरवळत असायचा. चेहर्याचवर पावडर लावून, अगदी जराशी फिकिशी लिपस्टिक लावावी असे गुलाबी ओठ. "नक्कीच आजोबा लिपस्टिक लावत असतील" नेहाच्या कानात तिची मैत्रीण अनघा खुसफूसली देखील. सुंदर जाड पोताचे, डाव्याबाजूने भांग पाडून छान सेट केलेले केस. हातात सुंदर सोनेरी पट्ट्याचं घड्याळ. सतत ते आपल्या शर्टाच्या बाहुच्या इस्त्रीची धार दोन बोटांच्या चिमटीत धरून नीट करत राहायचे.केस सतत सेट करत राहून बसमधल्या आरशात किंवा खिडकीच्या काचेतून जिथे मिळेल तिथे बघून केसांवरून हात फिरवत रुबाब झाडायचे. अगदी तरुणांतले तरुण,कॉलेजमध्ये जाणारे सो कॉल्ड हिरोसुद्धा त्या आजोबांना नजर न हटवता बघत बसायचे. एका बस स्टॉपपासून ठराविक अंतरावरच्या जवळच्याच बस स्टॉपपर्यंत जाऊन उतरायचे आणि पुन्हा दुसरी बस पकडून उलट्या दिशेने माघारी फिरायचे. का? कशासाठी? कोणालाच माहीत नसायचं. बरं, कुणाची छेड काढली,विभित्स प्रकार केला, असं काहीच नाही! चेहर्याछवर शांत स्मित ठेवून 'हाय ब्रोवड' आजोबा नेहमीच आपल्या तोऱ्यात रुबाबात बसमध्ये चढायचे. बसायला सीट असल्यास रुबाबात सीटवर बसायचे. अगदी स्टाईलमध्ये खिशातलं भारीतलं लेदरचं काळ्या रंगाचं पाकीट काढून त्यातल्या अगदी नव्या कोऱ्या नोटा काढून कंडक्टर पुढ्यात  आला की काही न बोलता त्याचा समोर धरायचे. कंडक्टरला हे आजोबा रोजचेच असल्यामुळे त्याच्याही हे सवयीचं झालेलं असावं. आजोबा मात्र तसंच चेहऱ्यावर स्मित ठेवून, आपला स्टॉप आला की दिमाखात बसमधून उतरायचे. रस्ता क्रॉस करून पलीकडे जाऊन परतीच्या बसची वाट बघत स्टॉपवर उभे राहायचे. कधी चुकून बसला गर्दी असली तर ड्रायव्हरच्या मागे असलेल्या छोट्याशा जागेत कोणाला न टेकता उभं राहायचा प्रयत्न करायचे आणि त्या दरम्यान बस ड्रायव्हरचा आरसा त्यांना समोर मिळाल्यामुळे आरशात पुन्हापुन्हा बघत बसणं, केसांवरून हात फिरवत राहणं चालूच असायचं.

 एक दिवस मात्र काहीतरी वेगळंच घडलं. ड्रायव्हरच्या मागच्या जागेत आजोबा उभे असताना बसचा उचकटलेला एक स्क्रू त्यांच्या केसात कधीतरी अडकला. ते त्यांच्या स्टॉप आल्यावर उतरायला, इतक्यात काय गडबड झाली आणि इतके दिवस सर्वांना अप्रूप वाटणाऱ्या त्यांच्या केसांबद्दलचं रहस्य सर्वांसमोर आलं.त्यांचा विग बसच्या त्या स्क्रूमध्ये अडकून राहिला आणि ते त्या दरम्यानचे एक ते दोन सेकंद आजोबांचा खरं रूप बसमधल्या किती जणांनी पाहिलंही असेल किंवा  किती जणांनी पाहिलंही नसेल. पण त्या दिवसापासून मात्र आजोबा पुन्हा कधीच दिसले नाहीत. एक घडी कायमची विस्कटली ती अशी!

आपण सुंदर असावं, सुंदर दिसावं, असं कुणाला वाटत नाही? मग त्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनं वापरणं, वेगवेगळ्या स्टाईल्स करणं, कुठल्या कुठल्या सेलिब्रिटिजना फॉलो कारणं अश्या कित्येक गोष्टी आपण सुंदर दिसावं या एकाच ध्येयापायी लोकं करत असताना दिसतात. कित्येकदा लाखोंच्या दिलाची धडकन असणारे मोठमोठे सेलिब्रिटिजसुद्धा या ध्यासापायी प्लास्टिक सर्जरी करुन आपल्या चेहऱ्याची किंवा शरीराची रचना बदलताना आपण पाहतो. अगदी श्रीदेवीपासून आताच्या कतरीनापर्यंतच्या नवनवीन नट्यापर्यंत किंवा नटांपर्यंत हे वेड दिसून येते. अगदी असेच नाही, तर कित्येकदा आपल्या आजूबाजूला एखादी अशी व्यक्ती असते जिला लोकांमध्ये मिसळणं आवडत नसतं, स्वतःचे फोटो काढून घेणं आवडत नसतं. हें नक्की काय? वरवर गमतीच्या किंवा छोट्याछोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आतून एक मनोविकार असू शकतो याची कित्येकजणांना पुसटशी कल्पनाही नसेल!

स्वतःचे रूप, स्वरूप, सौंदर्य  म्हटलं तर जसं आपण सौंदर्याच्या व्याख्या ठरवू, तसे आपण सुंदर. सुंदर, कुरूप या खऱ्या तर आपल्याच कल्पना. आपणच ठरवलेल्या. जन्माला आल्यानंतर माणूस जसा घडत जातो, तसं त्याच्या अनुवंशिकतेने आलेली देणगी म्हणून त्याचे स्वरूप, शारीरिक वैशिष्ट्ये ही त्याची स्वतःची निसर्गतः असल्याने ती आनंदाने स्वीकार्य असणं हे आनंददायी असते. पण कधी कधी स्वतः मध्ये असलेल्या किंवा कधीकधी नसलेल्याही व्यंगाचे पातक लावून किंवा सौंदर्य गुणधर्मातील दोष स्वतःच ठरवून सतत त्यासंबंधी विचार करणे, आपल्या मनाप्रमाणे आपले शारीरिक किंवा सौंदर्याची ठेवण नसल्यामुळे मनात निर्माण झालेली निराशा म्हणजेच बी डी डी- बॉडी डिस्मोरफिक डिसॉर्डर. (Body Dysmorphic Disorder ) या मानसिक आजारात एखादी व्यक्ती आपल्या शरीराच्या फक्त एखाद्या दोषाबद्दल किंवा भागाबद्दल विचार करत असते जे त्यांच्या मनाप्रमाणे नसते.

आपला रंग,चेहऱ्याची ठेवण,जाडेपणा, कृशपणा, त्वचा किंवा कुठल्याही अवयवाबद्दल ही वेगळेपणाची किंवा 'नकोशी' अशी भावना एखाद्याला वाटू शकते. मग स्वतःला सारखं आरशात बघत राहणं, एखादा शरीराचा भाग चाचपडत राहणं, त्यावरुन हात फिरवत राहणं, दुसऱ्या व्यक्तीशी स्वतःची तुलना करणं, फोटो काढण्यासाठी टाळाटाळ करणं, माणसांमध्ये पटकन न मिसळणं , एकलकोंडेपणा येणं  सतत या वाटणाऱ्या व्यंगामुळे गरज नसताना डॉक्टरांना भेटणं यासारखी लक्षणे यामध्ये दिसतात. हे हळूहळू सवयीचे होऊन त्याचे परिवर्तन विकृतीत होण्याची शक्यता जास्त असते. कितीदा वरवर गंमतीची वाटणारी ही बाब हळूहळू नकारात्मक प्रवृत्तीत विघटित होऊ शकते याचे भान ठेवून त्यावर योग्य वेळी उपचार होणे गरजेचे असते.

ही जरी मजेशीर वाटणारी गोष्ट असली तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडंफार हे ओसीडीशी  साम्य आहे. बीडीडीचे रुग्ण सुद्धा मंत्रचळ लागल्यासारखे सतत आरशात बघणे, तीच तीच गोष्ट परत परत करणे असे OCD च्या रुग्णा प्रमाणे करत असतात. दोन्ही बाबतीत मेंदूच्या त्याच भागात बिघाड झालेला असतो आणि औषध उपचार सर्वसाधारण सारखीच असतात.

आता वाटतं आहे ना आपण कसे आहोत?नका काळजी करू! सकारात्मक विचार, हाच खरा  रामबाण उपाय.