फुटबॉलचा शौकीन ‘आगोस्तीन’

आयुष्यात अडथळे येतील, जरी आपण पडलो तरी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण सक्षम आहोत असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, मेहनत, संयम, निश्चय ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे.

Story: मार्ग नवा, ध्यास नवा/ सुश्मिता मोपकर |
18th September 2021, 11:52 pm
फुटबॉलचा शौकीन ‘आगोस्तीन’

आगोस्टीन सावियो डी'मेलो या तरुणाला तथ्यात्मक विचार वाचणे, विनोदी गोष्टी पाहणे, संगीतात रमणे तसेच नवनवीन ठिकाणांना भेट देणे या गोष्टींची आवड आहे. सेंट झेवियर्स विद्यालय, मयडे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कोणत्याही गोष्टीत नेहमी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न तो करत आला आहे. शालेय जीवनात, इतिहास, कोंकणी सारख्या विषयांमध्ये तो उत्तम  होता ज्यात त्याला अनेक शिष्यवृत्त्याही मिळाल्या.

सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा येथे वाणिज्य शाखेतून अकरावी - बारावीचे शिक्षण झाले. वाणिज्य निवडून काय करावे हे त्यावर सुरुवातीला त्याने चिंतनच केले नव्हते. त्याच्या बहिणीने आणि काही मित्रांनी सल्ला दिला होता की वाणिज्य शाखा घे, कारण ते शिक्षण अकाऊंटंट , कॅशियर होण्याचे मूळ आहे. पुढे सेंट झेवियर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेतूनच पदवीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्याला बहिणीच्या व मित्रांच्या सल्ल्याची चीज झाल्याचे जाणवले कारण त्याला कॅशियर म्हणून एचडीएफसी बँकेत नोकरी मिळाली.

सुरुवातीच्या शालेय जीवनात तो खेळात कुठेच दिसला नाही जोपर्यंत त्याला एका चांगल्या आणि नवीन शारीरिक शिक्षकाची साथ मिळाली नव्हती. ज्या दिवसापासून सर शेखर केरकर हे त्यांचे शारीरिक शिक्षक म्हणून रुजू झाले त्यावेळी त्यांनी ह्या मुलांना वेगवेगळ्या खेळांची ओळख करून दिली. तेव्हापासून त्याला खेळात रस आला. त्यांच्या संयम या गुणाने आणि दृढनिश्चयाने मुलांना सर्वोत्तम बनवण्याच्या हेतूने ते झटत राहिले, त्यांना खेळात  चांगले प्रशिक्षण दिले. विशेषतः फुटबॉल या  खेळात.

शाळेत असताना फुटबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल इत्यादी विविध खेळांमध्ये त्याने भाग घेतला. फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. शाळेत तो पहिला विद्यार्थी होता ज्याला सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट अवॉर्ड द्वारे, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला  'सम्राट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड' मिळाला. अशाचप्रकारे  विविध खेळांमध्ये बरेच पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी बहुतेक फुटबॉल या खेळात मिळाले आहेत. उच्च माध्यमिक विद्यालयात फुटबॉल, क्रिकेट, हँडबॉल, टेनीकोइट, अॅथलेथिक्स सारख्या खेळांमध्ये भाग घेतला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरीद्वारे रौप्य पदक व चषक जिंकले आहेत. रिलायन्स फाउंडेशन आयोजित गोल्डन ग्लोव्ह, फुटबॉलसाठी सर्वोत्कृष्ट गोलकीपर पुरस्कार.हँडबॉलमधील विजेते- सुवर्णपदक, हँडबॉलमध्ये दोन वेळा (उपविजेते)रौप्य पदक आणि त्यासाठी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.  दिल्ली, जयपूर, मध्य प्रदेश, मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.  तसेच गँगटोक सिक्किम येथे आयोजित अगापे कपसाठी राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्ण पदक मिळवले.

क्रीडा क्षेत्राच्या प्रवासात त्याच्या आयुष्यात एक वळण आले. जेव्हा तो आठवीत होता आणि शाळेत फुटबॉलच्या प्रशिक्षण सत्रात त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. त्या वर्षी त्याला शाळेसाठी न खेळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे संघात त्याला त्याच्या जागेचा त्याग करावा लागला. दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला बराच संघर्षही करावा लागला, या‌वेळी त्याला कठीण परिश्रमाची जाणीव झाली. हे वळण म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारची हितकारक शिकवणच होती असे तो म्हणतो.

आपल्या ध्येयाबद्दल सांगताना तो म्हणतो, "मला एवढे नाव, आदर आणि प्रसिद्धी मिळाली आहे ती खेळांमुळे आणि विशेषतः फुटबॉलमुळे. मला फुटबॉल किंवा फुटसलमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि भविष्यात तिरंगी झेंड्याचा अभिमान राखायचा आहे. माझ्या आई -वडिलांना मला पडद्यावर पाहून आणि उच्च गोष्टी साध्य केल्याचा अभिमान मिळवून द्यायचा आहे. तसेच, आपल्या वयाच्या तरुणांनाही मोलाचा संदेश देताना, " तुमची आव्हाने मर्यादित करू नका. पण दररोज तुमच्या मर्यादांना आव्हान द्या. आयुष्यात काहीही सोपे नाही. अडथळे येतील,  जरी आपण पुन्हा पडलो तरी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण सक्षम आहोत असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, मेहनत, संयम,  निश्चय ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे."

आपल्या विश्वासानुसार तो म्हणतो की प्रत्येकाकडे एक प्रतिभा, क्षमता आणि कौशल्य आहे जे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःला आधार देऊ शकते. आपण मेहनत केली की एक दिवस असा येईल ज्या दिवशी स्वतःची ओळख करून द्यायची गरज पडणार नाही. लोक आपल्या पाठीमागेसुद्धा आपल्याबद्दल चांगले बोलतील. आपण जेव्हा अशा उच्च स्थानी पोहचू तेव्हा नम्र, कृतज्ञ रहा. जे आपण साध्य केले तसेच जर कोणाला वाटत असेल तर त्यांना ते साध्य करण्यासाठी नेहमी मदत करावी. असा प्रेरक सल्ला तो शेवटी आपल्याला देतो.