शेतकऱ्यांच्या हानीभरपाईचे १,२८८ अर्ज प्रलंबित

कृषिमंत्री कवळेकर : १ ऑगस्टपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचणार मदत

|
30th July 2021, 01:01 Hrs
शेतकऱ्यांच्या हानीभरपाईचे १,२८८ अर्ज प्रलंबित

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : मागील अधिवेशनातील पुढे ढकलेले प्रश्न गुरुवारी चर्चेसाठी आले होते. करोना महामारीमुळे नुकसान भरपाई वितरणाला उशीर झाला. आता ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्वांना नुकसान भरपाईचे वितरण केले जाईल. शेतकरी आधार निधीखाली पूर्वी प्रतिहेक्टर २५ हजार रुपयांची अार्थिक मदत दिली जात होती. ही रक्कम वाढवून आता ४० हजार केली आहे. जास्तीत जास्त एक लाखापर्यंत असलेली मदतीची रक्कम वाढवून आता ती १ लाख ६० हजार केली आहे. पुरामुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होत असते. शेतीसाठी विमा योजना लागू करण्याची मागणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली.
पणजी : राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे १,२८८ अर्ज प्रलंबित आहेत. सर्व शेतकऱ्यांना १ ऑगस्टपर्यंत हानीभरपाई निश्चित मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी गुरुवारी सभागृहात दिले. आमदार विनोद पालयेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर सदस्यांनी बराच वेळ चर्चा केली.
केंद्राकडून शेतकरी आधार निधीचे पैसे येण्याला विलंब होतो. तुमच्या योजना यशस्वी होत नाहीत, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. धनादेशाद्वारे दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. चेक बाऊन्स होतात, असे रवी नाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. धनादेशाचे पैसे मिळत नसतील तर माझ्याकडे तक्रार करा. लागलीच दुसरा चेक दिला जाईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत खूपच कमी पैसे मिळतात. नुकसान भरपाईचा हिशोब कसा केला जातो, अशी विचारणा रोहन खवंटे यांनी केली.