मुलांवर लक्ष ठेवण्याची पालकांवरही जबाबदारी!

बाणावली घटनेवरून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य, विरोधकांची टीका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th July 2021, 12:55 Hrs
मुलांवर लक्ष ठेवण्याची पालकांवरही जबाबदारी!पणजी : बाणावली किनाऱ्यावर नुकतीच दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडली आहे. याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही उमटले. यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुले रात्री कुठे जातात, याकडे लक्ष दिले पाहिजे’. या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. गोवा फॉरवर्ड, काँग्रेससह आपने टीका केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत संबंधित घटनेची माहिती देताना म्हणाले, या घटनेत १० अल्पवयीन मुले समुद्रकिनारी पार्टीसाठी गेले होते. यांतील दोन मुले आणि दोन मुली तिथेच थांबल्या होत्या. अल्पवयीन मुलांचे अशा पद्धतीने रात्रभर घराबाहेर राहणे योग्य नाही. एक १४ वर्षांची मुलगी रात्रभर समुद्रकिनारी भटकत असेल तर आई-वडिलांना आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मुले ऐकत नाहीत म्हणून आपण सरकार आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकू शकत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आणि सरकारची आहे. ती पार पाडता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री पालकांवर दोष ढकलत आहेत, हे पाहून धक्का बसल्याची प्रतिक्रिया अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी दिली.
संशयित सरकारी कर्मचारी सेवेतून निलंबित
पणजी : बाणावली बलात्कार प्रकरणातील संशयित सरकारी कर्मचार्‍यांना निलंबित केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सभागृहात दिली. तसेच २०१८ साली बेतालभाटी येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणातील फरारी ईश्वर माखवाना याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या शून्य काळात मुख्यमंत्री बोलत होते. बाणावली प्रकरणातील राजेश माने (३३) हा संशयित कृषी खात्यात चालक आहे. त्याला निलंबित करण्यात आले आहे.

भाजपची मोहीम खोटी!
बलात्कारास मुली आणि त्यांचे पालक जबाबदार असल्याचे लज्जास्पद विधान करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला संरक्षण देण्यास ते असमर्थ असल्याचे सिद्ध केले आहे. या विधानाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ ही भाजपची मोहीम खोटी असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. केंद्राप्रमाणेच राज्यातील भाजप सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी असल्याचे दाखवून देत आहे, अशी जोरदार टीका चोडणकर यांनी केली.
आपनेही केली टीका
विधानसभेत बाणावली प्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर आपनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. भाजपमध्ये नेहमीच स्त्रियांना कमी लेखण्याची संस्कृती आहे. मुख्यमंत्री जर असे विधान करत असतील तर गोव्यात महिला सुरक्षित आहेत काय, असा सवाल सिसिल रॉड्रिग्स यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. ते असाहाय्य असतील, तर ते मुख्यमंत्री पदासाठी अयोग्य आहेत, असे पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.