पद्मश्री परशुराम गंगावणेंसोबत एक ग्रेट भेट

Story: माणसासम वागणे/ स्नेहा सुतार |
25th July 2021, 12:43 Hrs

जंगलात राहणारे ठाकर आदिवासी त्या काळात आजूबाजूच्या वेगवेगळ्या उपलब्ध नैसर्गिक माध्यमातून स्वतःचे मनोरंजन करीत असत. कधी पंगेऱ्याचं लाकूड वापरून बाहुल्या बनवून किंवा कधी कोणी जनावरांच्या चामड्यापासून बाहुल्या बनवून ( ज्याला शॅडो पपेट म्हणून आपण ओळखतो ) त्यांचा खेळ करून ही लोकं स्वतःची करमणूक करून घेत असत. अशाप्रकारे अकरा प्रकारच्या लोककला या आदिवासींनी जतन केल्या. या जंगलातल्या ठाकर आदिवासी लोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांची नजर गेली. या एवढ्या कला गुणसंपन्न परंतु दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी लोकांना छत्रपतींनी राजाश्रय दिला. मालवणच्या किल्ल्यातील भवानीच्या मंदिरात सर्वप्रथम गोंधळ घालायचा मान याच ठाकर आदिवासींना मिळाला. खेम सावंतांच्या कारकीर्दीत त्यांनी या सगळ्या लोककला एकत्रित करून सर्वप्रथम प्रत्येक ठाकर लोकांच्या कुटुंबासाठी एक एक मंदिर दिले, ज्यात दसऱ्याच्या वेळी नऊ दिवस हे ठाकर तुमचं मनोरंजन करतील असे स्थानिक लोकांमध्ये जाहीर केले. दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातला हा राजाश्रय संपल्यानंतर या कलेची दयनीय अवस्था झाली. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या पिढीने ही कला सोडून शिक्षणाचा मार्ग पकडून, पोटापाण्यासाठी ते शहराकडे वळले.

परशुराम सर जेव्हा बारा वर्षांचे होते त्यावेळी त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. पदरी नीट शिक्षण नाही, या खेळात अर्थार्जनही राहिले नाही, त्यामुळे ही कला बाजूला ठेवून पोटापाण्यासाठी आपणही नोकरीला जावे म्हणून त्यांनी आपल्या आईकडे हट्ट धरला. शेवटी त्यांच्या आईने देवीचा कौल घ्यायचं ठरवलं. त्यासाठी कुडाळच्या केळबाई मंदिरात त्या त्यांना घेऊन गेल्या. राजाने दिलेला मंदिरातला हा मान सोडून देण्यासाठी त्यांनी देवीला कौल लावला. मात्र देवीने काही त्यांच्या बाजूने कौल दिला नाही आणि ठाकर समाजाची ही परंपरागत लोककलेची धुरा गंगावणे सरांच्या खांद्यावर आली ती कायमचीच. सरांनी या कलेला पुन्हा नवजीवन दिले. कुडाळमधील पिंगुळी इथले 'ठाकर आदिवासी कला अंगण ' ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिलीच आर्ट गॅलरी. गेली पन्नास वर्षे गंगावणे सर कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन करत आहेत. आदिवासी ठाकर समाजाच्या परंपरागत लोककलांच्या जतनाबरोबरच, या कला लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून २००६ साली स्वतःची गुरं विकून गुरांच्या गोठ्यात त्यांनी हे कलांगण सुरू केले. गंगावणे यांचे हे संग्रहालय पाहायला व अभ्यासायला देश-विदेशातले पर्यटक येतात. कळसूत्री बाहुल्या, चित्रकथीच्या माध्यमातून महाभारत, रामायण यासारख्या कथा चित्रांमधून इथे पाहता येतात.

गंगावणे सर बोलत असताना आमच्या इतर गप्पा गोष्टींनाही ऊत आला होता. एक लोककलाकार म्हणून त्यांना जरी आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असलं तरी या कलेकडे आत्तापर्यंत प्रशासन उदासीनच प्रतिसाद देणारे. तत्कालीन राजाश्रय ते आताच्या कष्टाने मिळवलेल्या या ठाकर आदिवासी समाजाच्या लोककलेच्या सन्मानाचा प्रवास म्हटला तर अतिशय खडतर. अजूनही या पद्मश्रींच्या घराकडे- कलांगणकडे जाणारा रस्ता ओबडधोबडच,खाचखळग्यांनी भरलेला. याचे बोचरे दुःख अजूनही सरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

मनमुराद गप्पा झाल्यानंतर ॲमेझॉन प्राईमवरच्या 'लाखों मे एक'नावाच्या सीरिजमध्ये चित्रकथी पाहिलेली मला आठवली आणि मी त्याविषयी बोलून गेले. त्या सिरीजमध्ये मांडलेले या लोककलाकारांचे दुःख आज जिवंत माझ्यासमोर उभे होते.

चेतन दादाने आता आमचा मोर्चा कलादालनाकडे वळवला . तत्कालीन मनोरंजनात्मक अशा या लोककलांविषयी आम्ही एवढ्या वेळ नुसतं ऐकत होतो, त्या आता आम्हाला समोर साक्षात अनुभवायला मिळत होत्या. चेतन दादा आपुलकीने प्रत्येक गोष्टीचे स्वतः प्रात्यक्षिक स्वरूप दाखवत होता, आम्हाला त्या त्या काळात घेऊन जात होता. त्याची कला दाखवत होता. मघाशी गंगावणे सरांशी बोलताना, " आम्ही आता सगळी जबाबदारी मुलांच्या खांद्यावर दिली आहे. तेच आता हा सगळा पसारा सांभाळतात " असं सांगताना सरांच्या बोलण्यात, डोळ्यात जो त्यांच्या मुलांविषयीचा अभिमान, विश्वास दिसत होता तो कितपत सार्थ होता हे चेतन दादा हे कलादालन आम्हाला दाखवताना दिसून येत होता. आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दादा न कंटाळता देत होता.उलट आम्ही प्रश्न विचारल्यावर दादाचा चेहरा उजळून निघत होता.

हे कलादालन बघून झाल्यानंतर आता वेळ होती ती कळसूत्री बाहुल्यांचा खेळ बघायची. त्यासाठी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासाठी लागणारा लवाजमा असलेला छोटासा रंगमंच आणि त्यासमोर प्रेक्षकांसाठी खुर्च्या - अशी मांडणी केली होती. आम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन बसलो आणि खेळ सुरू झाला. चेतन दादा व त्याचा छोटा सहकारी खेळ दाखवत होते. खेळ रंगात आला होता. इतक्यात आमच्यासमोर कोकम सरबताचे ग्लास असलेला ट्रे आला. खेळात रंगलेले आम्ही ट्रे समोर आल्याबरोबर एका क्षणासाठी खेळापासून नजर हटवून तो ट्रे घेऊन आलेल्या माणसाकडे बघितलं तर खुद्द पद्मश्री परशुराम गंगावणे तो ट्रे घेऊन, वाकून आमच्या समोर उभे होते. (समाप्त)