भाकीत

ऐन मोसमात करोनाने आम्हाला कोंडूनच ठेवले घरात आणि वार्षिक फळ-मेव्याचा स्वाद तेवढा चाखता आला नाही खरा! आपलं भाकीत कसं खरं ठरलं हे मोठ्या तोऱ्यात सांगत राहिला भाकितवाला मित्र...

Story: मिश्किली/ वसंत भगवंत सावंत |
25th July 2021, 12:23 am
भाकीत

मित्राने सांगितलेली गोष्ट ऐकून मी ही हसलो मनापासून. भाकितवाल्या मित्राची खोड जिरवायला सांगितली होती ती गोष्ट. कुणाचंच फारसं चांगलं मत नाही,  त्या भाकितवाल्या मित्राविषयी.त्याच्या बोलण्यात नेहमी कसलं ना कसलं भाकीत  हे असतेच. नेहमी छातीठोकपणे सांगून सोडतो तो,  मनात जे काय येईल  ते.खरंतर बहुतेकदा  त्याची भाकिते खुळचट वाटण्याजोगीच असतात.चुकून कधीतरी खरं उतरले तर मग  चेवच येतो त्याला. कालचीच गोष्ट, एखादा तज्ञ असल्याच्या अविर्भावात म्हणाला तो,'‘असा पाऊस आला आहे  म्हणजे उद्या अळंबी खायला तयार रहा तुम्ही !’' तसे मित्राच्या तोंडून दर वर्षी बऱ्याचदा ऐकत असतो आम्ही हे वाक्य.जेव्हा आषाढ-श्रावण महिन्यात  विशिष्ट लयीत पावसाच्या सरी कोसळतात आणि खास करून एखादा सण तोंडावर आलेला असतो,तेव्हा खरंतर प्रत्येक गोमंतकीय अंदाज काढतोच अळंब्याविषयीचे.  एवढी साधी गोष्ट असूनही मोठं अनुमान काढल्यासारखे दाखवले  त्याने.'‘ह्याची आतां  जिरवायलाच पाहिजे’' दुसरा मित्र पुटपुटला माझ्या कानात. मी म्हटलं त्याला,“तो सुधारायचा नाही,  अळवावरचे पाणी ते,आपलं भाकीत चुकले ह्याची खंत असती तर एव्हाना सुधारला असता.” तसे बहुतेकदा त्याचे भाकीत शंभर टक्के चुकलेलेही असते.आता तरी त्याचा आवेश ओशाळलेला असेल, असा अंदाज बांधतो आम्ही.पण त्याची खोड काही जात नाही, छातीठोकपणे अंदाज वर्तवण्याची. इतक्या वर्षांचा अनुभव आहे  पाठीशी, असा वरून टेंभा असतो त्याचा.

त्याची काही काही भाकीतं तर पुऱ्या  वर्षासाठी केलेली असतात. मी खात्रीने सांगतो “यंदा पाऊस-पाण्याचं काही खरं दिसत नाही मला '‘पाण्याचे फारच दुर्भिक्ष सोसावे लागेल, दुष्काळच असेल समजा. वातावरणात जे बदल जाणवतात त्या  अनुभवावरून सांगतो मी.”असे तो ज्यावेळी म्हणतो तेव्हा खरंतर त्याने कुठंतरी बातमी वाचलेली असते. अशा बातम्यांना व्यवस्थित मुलामा लावण्याची हातोटी जमलीय त्याला. तशी ती हवामान खात्याने दिलेली बातमी आम्हीही वाचलेली असते, पण त्याच्या तोंडून ऐकताना ते त्याचेच भाकीत असावे असे वाटते खरे. 

त्याचे अंदाज तसे बऱ्याच वेळा भन्नाट म्हणण्याजोगेही असतात.समुद्राच्या दिशेने आभाळात विशिष्ट रंगाची उधळण दिसली की, '‘उद्या बांगडा भरपूर पडणार आहे बघा’' असं तो आकाशात बघून म्हणतो, पण त्याचा सांगण्याचा अंदाज पाहून असं वाटते ऐकणाऱ्याला की बांगडे समुद्रातून नव्हे तर आकाशातूनच कोसळणार आहेत खाली.तसं  ते  अनुमानही त्याने कुणा जाणकाराच्या तोंडून ऐकलेले असते. “बोला फुलाला गाठ” म्हणतात तसा योगायोगही घडतो कधीकधी. दोन वर्षांआधी त्याने भाकीत केले होते ते समुद्रातील मासळीविषयी, “आपण विविध प्रकारे समुद्रावर जे अत्याचार चालवलेले आहेत ना..त्याचे गंभीर परिणाम लवकरच भोगावे लागतील आम्हाला, पाण्याविना मासळी तडफडते, तसे मासळीसाठी तडफडावे लागेल आम्हाला.”खरं तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी वेड्यातच काढलं होतं त्याला. समुद्रातील मासळीच्या अस्तित्वाविषयी  ह्याला अंदाजच नाही म्हणत. पण त्याच वर्षी फोर्मालीन प्रकरणाने धुमाकूळ घातला; आणि त्याच्या भाकिताप्रमाणे आम्हाला मासळीसाठी तळमळावे लागले खरे. महत्त्वाचे म्हणजे वर्षभर कान किटले आमचे, त्याच्या फुशारक्या ऐकून. “काजू-आंब्याच्या मोहराची गत  पाहिली आहे का तुम्ही यंदा? गोड फळ चाखता येईलच ह्याची खात्री नाही मला” गेल्या वर्षीही योगायोगाने त्याचे हे ही भाकीत झाले खरे, ऐन मोसमात करोनाने आम्हाला कोंडूनच ठेवले घरात आणि  वार्षिक फळ-मेव्याचा स्वाद तेवढा चाखता आला नाही खरा! आपलं  भाकीत कसं खरं ठरलं हे मोठ्या तोऱ्यात सांगत राहिला तो वर्षभर.

काल मात्र त्याने हद्दच केली, उद्या खात्रीने अळंबी येतीलच म्हणत,नाही आली तर भाकिते करणं सोडून देतो म्हणाला उद्यापासून. त्याचा तोरा पाहून मित्राने सडेतोड बजावले त्याला," तुझ्या ह्या भाकितात काही अर्थच नाही मुळी, ते कोणीही सांगू शकेल, भाकिताच्या बढाया मारायला तू काही ज्योतिषी नाही की सिद्धपुरुष, भाकिते कशी खरी ठरतात त्याची गोष्ट सांगतो तुला समजावून" अनिंसवाल्या श्याम मानवांनी सांगितली होती ती  आपल्या भाषणातून. एका माळरानावर एका चित्रपटाचे शुटींग चालू होते म्हणे, विविध साधन सुविधांसह बराच मोठा लवाजमाही होता. शुटींग पहायला गावची मंडळीही जमली होती, कुतूहलाने. दुपारच्या वेळी एक धनगर आपल्या शेळ्या हाकीत उतरला डोंगरावरून. गर्दी पाहून तोही घुसला गर्दीत आणि हबकला विखुरलेले सामान पाहून." अहो लवकर आटपा, पाऊस येणार आहे संध्याकाळी पांच  वाजता," तो ओरडला तसं सर्वांनी मुर्खातच काढलं त्याला आभाळात पाहून.आभाळ तर निरभ्र आहे आणि  हा वेडा तर म्हणतो,  पाऊस येणार ...

त्या युनिटमध्ये एक वयस्कर माणूस होता, तो थोडा विचारात पडला.पाऊस-पाण्याविषयी खेडवळ लोकांना चांगला अनुभव असतो, असं त्याने ऐकलं होतं,म्हणून त्याने आग्रह केला, सामान आवरण्याचा. युनिटला पटलं नाही,  तरी त्यांनी आटोपून घेतलं नाखुशीनेच आणि तेवढ्यात ढग दाटून आले आणि पाऊसही झाला सुरु. मग मात्र हायसे वाटले युनिटला, कौतुकही वाटलं त्या धनगराचं. त्याच्या अनुभवामुळे  आपलं नुकसान झालं नाही  हे पटल्यामुळे दुसऱ्या दिवशीही शुटींग सुरु झालं,  आभाळही निरभ्रच होते. तरीसुद्धा युनिटच लक्ष लागलं होते ते त्या धनगराकडे.दुपारी तो आला तेव्हा परत एकदां त्याने कालचाच संदेश दिला. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन सगळं सामान आवरून घेण्यात आलं आणि खरोखर त्याने सांगितलेल्या वेळेवर नेमका वारा-पाऊस आला.

आतां युनिटला पुरतं महत्त्व पटलं त्या धनगराच्या अनुभवाचे. युनिटच्या प्रमुखाने तर ठरवलेच त्या दिवशी, शुटींगच्या शेड्युलविषयी. यापुढे शुटींग आटोपण्याची वेळ ठरवायची ती त्या धनगराचे ऐकूनच.तिसऱ्या दिवशी सगळे युनिट धनगराची वाट पाहू लागले. तो येताच मोठ्या सन्मानाने विचारण्यात आले त्याला पावसाविषयी. तेव्हा तो धनगर जरा खजील झाला आणि शांतपणे म्हणाला,"आज पाऊस येईल का नाही, येईल तर किती वाजता येईल,ह्या विषयी खरेच आज  मला नेमके सांगता यायचे नाही" युनिट प्रमुख म्हणाला, तुमच्या अनुभवावरून सांगा ना ...

तेव्हा तो धनगर जरा बावरलाच, म्हणाला "अनुभवाचा प्रश्न आहेच कोठे? मी रोज हवामानाचा अंदाज ऐकतो सकाळी रेडीओ वरून. आज आमचा रेडिओ ट्रान्जीस्टर बिघडला आहे, त्यामुळे आज मी हवामानाचा अंदाज काही ऐकू शकलो नाही. म्हणून आज पाऊस किती वाजता येईल हे काही मला सांगता यायचे नाही". गोष्ट ऐकून हसत मी भाकितवाल्या मित्राकडे पाहिले, तो थोडा वरमला होता. बहुदा त्या गोष्टीमागील  मर्म त्याला समजलं असावं.