माझं लग्न झाल्यावर मी सासरी जाताना घरच्यांना अश्रू आवरत नव्हते. बाबांची पण तीच गत. त्यांना खूप दुःख झाले होते पण त्यांनी हृदयावर दगड ठेवून जड अंत:करणाने मला निरोप दिला. मी पूर्व जन्मी नक्की पुण्य केले असणार, म्हणून मला असे बाबा लाभले.
‘मातृदेवो भव: पितृ देवो भव:.' आपल्या आयुष्यात आई आणि बाबा दोन्ही देवासमान आहेत. आईवरील लेख, कविता अनेक लिहिल्या गेल्या आहेत. उदा : श्यामची आई. पण वडिलांवार आईच्या तुलनेत भव्य-दिव्य लेखन कमीच झाले आहे. आई घराचे मांगल्य, तर वडील घराचे आधारवड असतात.
मूल जेव्हा लहान असते तेव्हा ते उठल्यापासून झोपेपर्यंत आईच्या सानिध्यात असते. त्याचं उठणं, बसणं, झोपणं, खाणं - पिणं, आजारपण सारं काही आईच बघते. बाबा सकाळी कामाला जातात ते रात्री परत येतात. त्यांना पण मुलांची तेवढीच काळजी असते पण ते वेळ देऊ शकत नाहीत . मायेची सावली देणारे झाड आई असली, तरी त्या झाडाप्रमाणे खंबीर असणारे बाबाच असतात. आईजवळ मुलं हट्ट करतात, तर ते हट्ट पूर्ण करणारे बाबाच असतात. मुलांच्या सर्व गरजा बाबाच पुरवतात. प्रपंच चालावा म्हणून ते कमावतात. बाबांवर लिहावं तेवढं थोडंच आहे.
माझे बाबा धडधाकट प्रकृतीचे, उंचेपुरे व भारदस्त होते. त्यांच्या छत्रछायेत आम्ही सुरक्षित होतो, निर्भय होतो. माझे बाबा कमालीचे शिस्तप्रिय होते. जितके कठोर तितकेच प्रेमळ फणसाप्रमाणे. आमची चूक झाल्यावर आम्हाला रागवायचे पण लगेच त्यांचा राग शांत व्हायचा.त्यांचं शिक्षण फारसं झालं नाही, म्हणून त्यांनी काही आम्हाला शिक्षणापासून वंचित केलं नाही. आम्ही शिकावं, मार्गी लागावं हीच त्यांची इच्छा असायची. आम्हाला त्यांनी नुसतं शिकवलं नाही, तर घडवले सुद्धा! ते आमचे आदर्श होते. माझी चुलत भावंडे राहत्या गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आमच्याकडे शिकायला होती. बाबांनी त्यांचा शिक्षणाचा भार उचलला होता. त्यांच्यावरसुद्धा बाबांनी आमच्याइतकीच माया केली. कधी दुजाभाव केला नाही.
माझे बाबा समाजप्रिय होते. गरजूंना ते नेहमी मदत करत. घरात आम्ही फक्त सहाजण. आई, बाबा आणि आम्ही चार भावंडे. मी सर्वात मोठी. आमच्या घरात वीस लोकांचा राबता. माझे एक मामा कायम नोकरीला होते. माझ्या आजीला बरं नसायचं म्हणून तीसुद्धा आमच्याकडे राहायला होती. काकाचे भुसारी दुकान असल्याने ते पण इथेच होते. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा त्यांच्यावर भार होता. पण त्यांनी कधीच त्रागा केला नाही. सर्व संकटाना हसत हसत सामोरे गेले.
लाथ मारीन तेथे पाणी काढीन एवढी धमक त्यांच्या अंगात होती. माझे बाबा कर्तबगार तसेच धडाडीचे होते. बाबांनी शून्यातून जग निर्माण केले. आळस त्यांना माहीत नव्हता. आम्ही मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त उगाच वेळ वाया घालवलेला त्यांना आवडत नसे. ते म्हणायचे "तुम्ही फक्त शिका". ते शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांना माहीत होतं. ते आम्हांला म्हणायचे "शिकून मोठे व्हा. स्वावलंबी बना व ताठ मानेने जगा "
उन्हाळ्यात नळ व विहिरी कोरड्या पडत. त्यावेळी 'पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरवी जगदीशा' अशी त्यांची स्थिती होई. ज्यांच्याकडे पाण्याने भरलेल्या विहिरी असायच्या, ती माणसं विहिरीतलं पाणी संपेल या भीतीने त्यांना परतून लावायची. आमची अशी एकच विहीर होती जी बाराही महिने पाण्याने तुडुंब भरलेली असायची. पाणी अगदी स्वच्छ. एरवीसुद्धा बायका विहिरीवर पाण्यासाठी येत. त्यांना कधीच कोणी आडकाठी केली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी रांग लागायची. आमच्या विहिरीला आम्ही पाण्याचा पंप बसवला होता. पाण्याला येणाऱ्या बायकांचा वेळ वाया जाऊ नये व त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून बाबा स्वतः त्यांना पंपाने पाणी देत. ते म्हणायचे " राखावी बहुतांची अंतरे भाग्य येई तदनंतरे. "
माझ्या बाबांचा हॉटेल व्यवसाय होता. ते स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देत. कामचुकारपणा केलेला त्यांना आवडत नसे. ते पहाटे ऊन पावसाची पर्वा न करता हॉटेलवर जात. त्यांना माहीत होते आपणच वेळेवर गेलो नाही तर कामगार बेफिकीर राहतील. लोक हॉटेलात चहा प्यायला सहा वाजता येत. कधी कधी हॉटेलात गिऱ्हाईक कमी असल्यामुळे तयार केलेले जिन्नस पडून राहत. ते त्यांना वाया गेलेले आवडत नसत. ते उरलेले जिन्नस ते घरी आणत. नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आम्हाला कंटाळा यायचा. आम्ही ते खात नसे. बाबा त्यांच्या पुरचुंड्या बांधायचे व शेजारी नेऊन द्यायचे शेजाऱ्यांना खूप आनंद व्हायचा. ते म्हणायचे "अन्नाचा आपण कधीच अनादर करू नये. आपण जे अन्न खातो ते आम्हाला फुकट मिळत नाही, त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात.
पणजी गोव्याची राजधानी असल्यामुळे इथे मोठमोठे डॉक्टर, हॉस्पिटले, कोर्ट-कचेऱ्या आहेत. पणजीत कामानिमित्त येणारे लोक दुपारी जेवणाला आमच्याकडे यायचे. आताप्रमाणे पणजीत भोजनलाये व उपहारगृहे नव्हती. डॉक्टरांना भेटायला, हॉस्पिटलात उपचार करून घ्यायला येणारे नातेवाईक बिनधास्त आमच्याकडे यायचे व आपले काम होईस्तर मुक्काम ठोकायचे. वडिलांनी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. बाबांना आईची साथ होतीच. बाबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. बाबा कमावणारे एकटेच. त्यांनी संसाराचा भार समर्थपणे पेलला.
मी माझ्या बाबांची खूप लाडकी होते. मी जन्माला येण्यापूर्वी त्यांची दोन अपत्ये जग सोडून गेली होती. त्यामुळे ते मला खूप जपायचे जरा कुठे मला शिंक आली, की त्यांचा जीव कासावीस व्हायचा. माझ्याकडे आईचे जरा दुर्लक्ष झाले तर आईवर ओरडायचे. ते मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. माझं लग्न झाल्यावर मी सासरी जाताना घरच्यांना अश्रू आवरत नव्हते. बाबांची पण तीच गत. त्यांना खूप दुःख झाले होते पण त्यांनी हृदयावर दगड ठेवून जड अंत:करणाने मला निरोप दिला. मी पूर्व जन्मी नक्की पुण्य केले असणार, म्हणून मला असे बाबा लाभले. आईचे त्याग, कष्ट मी नाकारत नाही. आईचे कौतुक करावे पण बाबांचा त्याग, प्रेम व कष्ट विसरू नये. आई तुझी आठवण येते म्हणण्यापेक्षा मी म्हणेन बाबा तुझी आठवण येते.