सहृदयी व परोपकारी योगिता पैंगीणकर

सर्वांच्या मदतीला धावणारी, स्वतःतले कलागुण व कल्पकता जपणारी पैंगीण गावची कु. योगिता पैंगीणकर.

Story: प्रीती केरकर । प्रीती केरकर |
23rd July 2021, 10:52 Hrs
सहृदयी व परोपकारी योगिता पैंगीणकर

कुमारी योगिता पैंगीणकर ही लहानपणापासून खूप कष्टी व लोकांच्या मदतीस सदैव तत्पर राहणारी. कुणाच्याही लहान-सहान गरजा पूर्ण करण्यास तिला खूप आनंद होई. तिच्या या स्वभावामुळे ती सर्वांची आवडती व आई-वडिलांची लाडकी बनली. मोठा भाऊ व लहान बहिण यांच्याबरोबर तिचे लहानपण आरामात गेले.

२०१६ मध्ये सी. आर. पी म्हणून तिची निवड डी. आर. डी. ए.  च्या एन.आर. एल. एम. या योजने अंतर्गत पैंगीण पंचायत ( काणकोण तालुका) येथे करण्यात आली. तत्पूर्वी ती चार वर्षे  फिलिप्स कंपनीत रेडिओ आणि डेक यांची चाचणी व तपासणीचे काम करत होती. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिकवणी वर्ग घ्यायची. कधी एखाद्या पालकांना शिकवणीची फी देण्यासाठी अडचण असली, तर ती त्या विद्यार्थ्याला विनामुल्य शिकवणी द्यायची. पावसाळ्यात मुले भिजून आल्यास त्यांना गरम चहा किंवा काढा (कसाय) देऊन अभ्यासाला बसवायची.

जेव्हा तिची सी. आर. पी म्हणून निवड झाली तेव्हापासून आजपर्यंत तिने अनेक कार्यशाळा घेतल्या. वेगवेगळ्या GSRLM विषयावर योजनेबद्दल महत्त्व पटवून दिले. प्रामुख्याने कोविडच्या काळात मिंटीग व काही कार्यक्रम घेण्यास अडथळा आला, तेव्हा तिने तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आवाज ध्वनीमुद्रित करून व्हॉटस्अपद्वारे सर्व ग्रूपमधील सभासदांना पाठविले. शक्य आहे तेथे सभा घेऊन कोविडपासून आपण कसे वाचू शकतो किंवा हा संसर्गरोग आपल्याला होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दलची माहिती दिली. काही सेल्फ हेल्प ग्रूप कार्यरत नव्हते. अशा गटांना बचतगटाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर अंगणवाडी, आरोग्य, ग्रामसभा, स्वच्छता अभियान तसेच पंचायत सर्व गटातील सभासदांना सहभागी होण्यास ती प्रवृत्त करते.

मुळातच कु. योगिताचा स्वभाव प्रेमळ, समंजस्य व सगळ्यांना आपलंस करणारा. त्यामुळे सी. आर. पी म्हणून वावरताना तिला फार त्रास झाला नाही. योगिताच्या अंगी खूप चांगले गुण आहेत. त्यातला एक गुण म्हणजे परोपकाराचा. ती लग्नकार्य असल्यास नवरीला सजवण्याचे, तिचे केस विंचरण्याचे, साडी नेसवण्याचे, मेहंदी लावण्याचे काम कोणताही मोबदला न घेता करते. कारण हा खर्च सर्वांनाच परवडणारा नसतो आणि तिच्या स्वभावात पैशासाठी जर काही काम अडत असल्यास ती स्वत:हून ते काम करून त्यांना मदत करते. काहीजण तिला प्रेमाने १०० ते २०० रूपये भेट म्हणून देत. ती त्यांचा आशीर्वाद समजून ती भेट धार्मिक कार्यासाठी वापरते .

‘निर्मिती’सेल्फ हेल्फ ग्रूपची ती सभासद होती. ग्रूपाची सर्व पुस्तके व हिशोब हेही काम ती पहायची. बंद पडलेले सेल्फ हेल्प ग्रूप तसेच नविन ग्रामसंघ हे आपल्या बी.आर. पी. बरोबर तिने स्थापन केले. रांगोळी, चित्रकला आणि डिझाइनिंग याची तिला आवड आहे. विणकाम व शिवणकाम माफक दरात, कमी किंमतीत लग्न ठरलेल्या नवरीमुलींना करून देते . त्याचबरोबर खाद्यपदार्थ करून त्यांची विक्री करून आपल्या आई - वडिलांना थोडीफार मदत करते. प्रामुख्याने लाडू, चिवडा, भेळ आणि लोणचे करण्यात ती तरबेज. योगिताला लिहिण्याचा छंद म्हणून तिने थोड्या कवितापण लिहिल्या आहेत. पण आजपर्यंत त्या प्रकाशित झाल्या नाहीत.

गटात आल्यानंतर तिला खूप काही शिकायला मिळालं व तिला दुसऱ्यांना काहीतरी चांगले शिकवण्याची संधी पण मिळाली त्यामुळे योगिताला स्वत:विषयी खूप अभिमान वाटतो. सी. आर. पी म्हणून काम बजावताना तिला आलेला अनुभव ती सांगते की, ‘इथे मला चांगले किंवा मी केलेल्या कामाची कुणी प्रंशसा करावी म्हणून मी हे काम करत नाही; तर मला समाजासाठी आपल्याकडून काही सत्कार्य घडत आहे'  त्याबद्दल ती देवाची आभारी आहे. ह्या क्षेत्रात कार्य करत असताना काही चांगले व काही वाईट अनुभव तिने घेतले. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे डी. इ. डी. ए. च्या एन.आर. एल. एम.  या योजने अंतर्गत तिला जी संधी दिली त्याबद्दल ती डी. आर. डी. ए. विभागाचे आभार व्यक्त करते.

(जिल्हा ग्रामीण विकास संस्था (DRDA) 

यांच्या सौजन्याने)