वायला डिसोजाची यशस्वी वाटचाल

"हॅलो! मी लंडन वरून बोलतोय. तुमची केक ची जाहिरात फेसबुक वर पाहिली. मला केकची आर्डर द्यायची आहे! " असा जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर...नक्कीच तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल..हो ना!

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
17th July 2021, 06:08 Hrs
वायला डिसोजाची यशस्वी वाटचाल

खरंच असे घडले आहे ते आमच्या ‘हॉली क्रॉस’ सेल्फ हेल्प ग्रूपच्या सभासद सौ. वायला डिसोजा यांच्या बाबतीत.

वायलाचा जन्म ४ नोव्हेंबर, १९७३ साली मारना - शिवोली येथील फर्नांडिस कुटुंबात झाला. वडील लहानपणापासून अबूधाबी येथे शेफ होते व आई घर काम करता करता शिवणकाम व कापडापासून फुले बनवणे अशी कामे करायची. तसेच ४ मुलगे आणि वायलाला धरून दोन मुली यांचा सांभाळ करायची. आपल्या आईला लहानपणापासून हे काम करताना पाहून तिलासुद्धा नवे काही तरी करण्याचे प्रोत्साहन मिळायचे. लहानपणापासूनची ही कला तिला तिच्या पुढील उभ्या आयुष्यात उपयोगी पडली. जेमतेम ११ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर २००८ मध्ये जून महिन्यात तिच्या विवाह मोरजी  येथील डिसोजा कुटुंबात झाला. वायला आता वायला डिसोजा बनली. 

चार वर्षे म्हापसा येथील सौंदर्य प्रसाधनगृहामध्ये सराव करून २०१६ मध्ये तिने स्वत:चे पार्लर शिवोली येथे उघडले.

२०१८ मध्ये सी. आर. पी. सौ. प्रतिभा सडेकर यांच्या नेतृत्वाखाली डी.आर.डी.ओ. (GSRLM) च्या अंतर्गत ‘हॉली क्रॉस’ सेल्फ हेल्प ग्रूपाची स्थापना शिवोली-मारना येथे करण्यात आली. वायला ग्रूपची अध्यक्षा म्हणून निवडली गेली. येथून वायलाच्या करीयरची खरी सुरूवात झाली. कारण फक्त घर आणि पार्लर येवढेच तिचे विश्व होते पण ग्रूपमध्ये आल्यानंतर तिच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झाली. तिच्या अंगी आई - वडिलांचे गुण होतेच आणि तिच्या कलागुणांना यश देण्यात सेल्फ हेल्फ ग्रूपाचा तिला फार उपयोग झाला. ग्रूपमध्ये असल्याकारणाने वेगवेगळ्या ग्रूपशी तिचा संपर्क येत गेला व त्यातूनच तिने आपण तयार केलेले खाद्य पदार्थ म्हणजे  स्नॅक्स , बातीक, पॅन केक, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट व खूप वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट केक बनवून विक्री करू लागली. वेगवेगळ्या मॉलमधील प्रदर्शनांमध्ये आपली उत्पादने ठेऊ लागली. दिवाळी,नाताळ या सणानिमित्त शिवोली - मारना येथे स्टॉल लावून आपण तयार केलेल्या जुट बॅग, मेणबत्या, क्रॅशेट बॅग तसेच कापडी व कागदी फुले, घरी तयार केलेले खाद्यपदार्थ इत्यादी माल विक्रीस ठेवून आपल्या संसाराला हातभार लावी.

महामारीच्या काळात स्टॉल व प्रदर्शने बंद झाली, तसेच पार्लर पण बंद असल्याने पुढे काय करावे हे सुचेना. तेव्हा आपल्या लहान मुलाच्या सांगण्यावरून व्हॉटसप तसेच फेसबुक, इंनस्ट्राग्राम वर केक व इतर जिन्नसाचे फोटो अपलोड करू लागली. याचा परिणाम असा झाला की, कळंगुट, म्हापसा, शिवोली व इतर ठिकाणाहून तिला केकच्या व इतर पदार्थांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या.केक गोव्यात अमूक जागी डिलीवर कर म्हणून लंडनहून तिला केकसाठी कॉल आला. त्याप्रमाणे तिने केक तयार करून सांगितल्या ठिकाणी वेळेवर पोहचवला. त्या लोकांनी केक अप्रतिम झाला आहे,असे सांगताच तिला खूप आनंद झाला. तिने तिथून सुद्धा केक आणि बिस्किटाची ऑर्डर घेतली. ग्रूपमध्ये असल्याकारणाने इतर ग्रूपमधील महिला तिला केकच्या व पार्लरच्या ऑडरी देऊ लागल्या.

कोविड - १९ च्या महामारीत तिने शिवोलीतील गरजू कुटुंबाना स्वत:हून अन्न व गरजेच्या वस्तूचे वाटप केले व अजूनसुद्धा हे कार्य चालूच आहे. मास्क स्वत: शिवून तिने सभासदांना तसेच इतरांना वाटले. वायला म्हणते जर आज मी सेल्फ हेल्फ ग्रूपमध्ये नसते तर या महामारीच्या काळात खूपच त्रास सहन करावा लागला असता.

(जिल्हा ग्रामीण विकास संस्था (DRDA) 

यांच्या सौजन्याने)