इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स

रोहित खांडेकर, युगांक नायक, विनय भट, हेरंब नाईक, फिरोज शेख, मॅल्कम डिकोस्टा यांनी मिळून सुरु केलेल्या इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स या युट्यूब चॅनलविषयी...

Story: युट्यूबची जादूगिरी | स्नेहल कारखानीस |
21st June 2021, 06:58 pm
इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स

लोकांनी लोकांसाठी सादर केलेली लोकांची कला म्हणजे लोककला होय. लोककला ही पूर्वी श्राव्य होती. मग ती शब्दबद्ध झाली. त्याच्यावर संस्कार होत, ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होऊ लागली.  लोककलेतूनच लोकसंस्कृती समृद्ध होत असते. गोमंतकीय भूमीला अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. बदलत्या काळानुसार आपली संस्कृती जपणे, तिचे संवर्धन करणे तेवढे सोपे नाही. पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आलेली लोकसंस्कृती, लोककला टिकवून ठेवणे म्हणजे आजच्या तरुणपिढीसमोर एक आव्हानच आहे. परंतु हे आव्हान, इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स  (ISHTUQUTOOR PRODUCTIONS) या युट्युब चॅनलने स्वीकारलेले दिसते.

प्रोडुसाओ दे इश्टुकुटुर (Producao De Ishtuqutoor) हा एक स्टुडिओ आहे. शूटींग, एडिटींग, एनिमेशन, व्हि.एफ.एक्स. यासारख्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स हा युट्यूब चॅनल रोहित खांडेकर,  युगांक नायक, विनय भट, हेरंब नाईक, फिरोज शेख, मॅल्कम डिकोस्टा यांनी मिळून सुरु केला. युट्यूब हे असे माध्यम आहे, जिथे नवनवीन कलागुणांना प्रदर्शित केले जाते. प्रामुख्याने इथे गोव्यातील लोकसंस्कृतीच्या संबंधित वेगवेगळे प्रयोगशील प्रकार व्हिडिओ स्वरुपात पहायला मिळतात. 

इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स स्वतःचे व्हिडिओ प्रदर्शित न करता, इतर कलाकारांच्या कॉलेबोरेशन्सना प्राधान्य देतात. लोकसंगीत, लोकगीत, लोककाव्य आदी प्रयोगात्मक किंवा प्रयोगशील लोककलांचा अंतर्भाव येथे दिसून येतो. या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ मधील प्रयोगात्मक लोककलांचे आविष्कार हे नित्य नवीन असून, एक आविष्कार दुसऱ्या आविष्कारासारखा दिसत नाही. प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापरीने वैविध्यपूर्ण वाटतो.

गोव्याच्या लोकसंस्कृतीसंदर्भातील, 'एकचाराचे नमन', 'आयले आमी खेळ खेळोवपाक', 'धालो', 'ओवयो', १८ जून कलेक्टीव', '३० मे कलेक्टीव (जुगलबंदी), 'युवा कला मोगी (थीम सोंग), तसेच परिक्रमा ०.१, ०.२, ०.३ चे प्रमोशनल व्हिडिओ इथे प्रदर्शित केले आहेत.  यातील काही व्हिडिओमध्ये २० हून अधिक कलाकारांचा समावेश दिसून येतो. एकूण लोककलेतील बहुतांश आविष्कार सामूहिक असतात. लोककलांची निर्मिती व्यक्तीची असली तरी तिच्या निर्मितीमागची प्रेरणा समूहमनाची असते.

आजवर ऐकलेले लोकसंगीत, इथे नवीन स्वरुपातील प्रयोगात्मक आविष्कार बघत असताना, गोव्याची परंपरा, संस्कृती अजूनही किती बळकट आहे याची प्रचिती येते. नवल म्हणजे, आजचा युवावर्ग लोककलेकडे वळलेला दिसतो. आपल्या लोककलेविषयी असलेला अभिमान, आदर, प्रेम इथे व्यक्त होताना दिसते. लोककला सादर करताना प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावरील भाव,  उत्साह प्रत्यक्ष जाणवतो. त्यातील लोककलेविषयीचे व्हिडिओ बघत असताना, ते आपल्या मनाला भिडल्यावाचून राहणार नाहीत. आपल्या संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन, लोककलेची प्रयोगशील निर्मिती इथे होताना दिसते. प्रत्यक्ष  कलाकारांना लोककलेतील अवीट गोडी आणि निरागस चैतन्य यांची मनस्वी ओढ असलेली दिसून येते. 

लोककला सादर करणे हा अत्यंत कौशल्याचा भाग आहे. पण त्याहून महत्त्वाचे ही परंपरागत कला जगासमोर आणणे आणि ही महत्त्वाची जबाबदारी इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स या युट्यूब चॅनलने हाती घेतली आहे. कलाकारांनी सादर केलेल्या लोककलेच्या कार्यक्रमांचे शूटिंग, एडिटींग करुन अत्यंत प्रभावी असे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी प्रदर्शित केले आहेत. 

इश्टुकुटुर प्रॉडक्शन्स हा चॅनल एकाच व्यक्तीच्या हाताखाली नसून, हा सहा जणांचा सामूहिक युट्यूब चॅनल आहे. लोककलेची निर्मिती, संगोपन आणि संवर्धन जसे समूहाधिष्ठत प्रेरणेने होते, तशीच समूहाधिष्ठता इश्टुकुटुर युट्यूब चॅनलबाबतीत दिसून येते. यामुळेच चॅनलचे प्रेक्षक आणि सबस्क्रायबर्स वाढत गेले. आजवर चॅनलचे ३.९८ हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत. दृश्य-श्राव्य माध्यमातून आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना तांत्रिक सहाय्य करणे,  गुणात्मक कार्य प्रदान करणे, नाविन्यपूर्ण विशिष्ट दर्जाची लोककला प्रदर्शित करणे हे इश्टुकुटुर चॅनलचे उद्दिष्ट दिसून येते. 

लोककला आणि रसिकप्रेक्षक यातील दुवा म्हणजे इश्टुकुटुर. गोमंतकीय लोककलेला युट्यूबच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोचविण्याचे काम इश्टुकुटुरने केले आहे. पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आलेली लोककला अखंडितपणे चालू राहील यात शंकाच नाही. लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याची संकल्पना घेऊन वाटचाल करणाऱ्या इश्टुकुटुर चॅनलच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 

https://youtube.com/c/PRODU%C3%87%C3%83 ODEISHTUQUTOOR