Goan Varta News Ad

लोककलावंतांची वेदना टिपणारा ‘पिकासो’

लोककलावंत हा नेहमीच उपेक्षित असणारा वर्ग. तोकडी आर्थिक प्राप्ती हीच या कलावंतांची मोठी वेदना. पण त्याही पलीकडे जाऊन लोककलाकारांना अनेक मानसिक द्वंद्वांना सामोरे जावे लागते, हे ‘पिकासो’ या मराठी चित्रपटातून सहजपणे चित्रित केले आहे. यापूर्वी ‘राजा’ या लघुपटातून दशावतारी लोककलावंतांची जगण्यासाठीची धडपड समोर आली होती. आता ‘पिकासो’मुळे ती जगभर पोहोचली.

Story: मनोरंजन | सचिन खुटवळकर |
21st June 2021, 06:56 Hrs
लोककलावंतांची वेदना टिपणारा ‘पिकासो’

निदान हजारभर तरी...’ 

नाटकात राजाची भूमिका करणारा भाऊ ऊर्फ पांडुरंग गावडे अगतिकपणे दशावतारी कंपनीच्या मालकाकडे उधारी मागताना बघून कोणाही दशावतार प्रेमीच्या काळजात चर्र होईल.


‘निदान पाचशेची तरी नाईट मिळेल...’ असं पांडुरंग गावडेची पत्नी मंगल हताशपणे म्हणते, तेव्हा दशावताराची पार्श्वभूमी परिचित असणारा माणूस नक्की हळहळणार.

पण त्याचवेळी जत्रेत पांडुरंग गावडेनं सकारलेला राजा मुचकुंद रंगात येतो, तेव्हा प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे होणारी बक्षिसांची खैरात पाहून हाडाच्या दशावतारी कलाप्रेमीचा हात बक्षीस देण्यासाठी खिशाकडे नक्की जाईल.

दशावतारी नाटकांचे, जत्रेचे गारुड मालवणी माणसाच्या आणि उत्तर गोव्यातल्या रसिकप्रेमींच्या मनावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवतेय. इसवी सन १२०० मध्ये कर्नाटकमधून महाराष्ट्रात आलेला हा कलाप्रकार आज कोकणची खास ओळख बनला आहे. पण तब्बल ८०० वर्षे लोटूनसुद्धा हे लोककलावंत आर्थिक आघाडीवर आजही संघर्षच करतात. कलेचा संसार चालवताना रोजच्या जेवणाचीही भ्रांत असणारे हे कलाकार आज करोनाच्या संकटामुळे आणखी पिचले आहेत. त्यांची सध्याची मेटाकुटीला आलेली स्थिती पाहता, ‘पिकासो’मधील पांडुरंग गावडेच्या जीवनातील सगळेच प्रसंग खरेखुरे असल्याचा प्रत्यय येतो. पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नाहीत, मग मुलाच्या स्पर्धा परीक्षेची फी भरण्यासाठी कुठून पैसे आणणार? जोडधंदा म्हणून सुरू असलेल्या गणेश चित्रशाळेत अनेक जण चांगले गणपती करायला सांगतात, पण आगाऊ रक्कम देत नाहीत. रंगांसाठी पैसे उधारीने आणावे लागतात. श्रावण महिन्यात ऑफ सीझनला दशावतारी कंपनीला एक जत्रा करायची संधी मिळते. पण त्यासाठीचे मानधन तुटपुंजे. त्यात एकूण १५ जण भागीदार. अशा स्थितीत कंपनीच्या मालकाकडे पांडुरंग पैसे उधार मागतो. आधीच १५ हजारांची उधारी अंगावर असलेल्या पांडुरंगला मालक ‘हती बॅग घे आणि निघ इथून’ असे वैतागून सांगतो.

कमीअधिक फरकाने दशावतारी लोककलावंतांची आणि कंपनी चालवणार्ऱ्यांची आजची स्थिती समर्पकपणे ‘पिकासो’त रंगवण्यात आली आहे. वर्षातील सहा महिने चालणारी नाटके, जत्रा आणि अलीकडच्या काही वर्षांत ऑफ सिझनला पावसाळ्यात होणारी संयुक्त दशावतार नाटके वगळता जगण्यासाठी या कलाकारांना मोठी धडपड करावी लागते. ‘निदान पाचशेची तरी नाईट मिळेल...’ या संवादातच सगळे आले. दशावतारी कंपनीतल्या आघाडीच्या नावाजलेल्या कलाकारालाच पाचशेची किंवा त्यावर शंभरेक जास्त अशी एका नाटकासाठी ‘नाईट’ मिळते. इतरांना शंभर रुपयांपासून तीनशे-चारशे रुपये इतकीच काय ती दिवसाची कमाई. इतक्या तुटपुंज्या वेतनात मालकाकडून मिळणारे दोन वेळचे जेवण हीच काय ती जमेची बाजू. त्याचीही तजवीज गावोगावी नाटके, जत्रा झाल्यानंतर ग्रामस्थांकडून मिळणार्याे शिध्यातून होते. थोडक्यात, सगळा कमाईचा डोलारा रसिक मायबापांकडून मिळणार्याे बक्षिसाच्या रकमेवर अवलंबून. सुदैवाने कोकणातील आणि उत्तर गोव्यातील रसिक सहृदयी आणि कलेवर जीवापाड प्रेम करणारे. त्यामुळे काही प्रमाणात कलाकारांना त्यांच्याकडून मिळणार्याी बक्षिसाच्या रकमेतून दिलासा मिळतो. ‘पिकासो’त हाच मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला आहे.

लेखक-दिग्दर्शक असलेले अभिजित वारंग मूळचे कोकणातील. त्यामुळे लहानपणापासून दशावतारी कलावंतांची धडपड त्यांनी अनुभवलेली. काही कहाण्या जाणत्यांकडून ऐकलेल्या. त्यामुळे या मातीतील वेदनांची खोली त्यांनी चांगल्या प्रकारे उलगडून दाखवली आहे. कॅमेराच्या माध्यमातून कुडाळ आणि परिसराचा भुरळ घालणारा हिरवा निसर्ग सुंदररीत्या टिपला आहे. अभिनयाचे बावनकशी सोने म्हणून परिचित असणारे प्रसाद ओक मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा उंचावल्या होत्याच, त्या आणखी उंचावण्याची काळजी प्रसाद ओकनी घेऊन दमदार अभिनयाची झलक पुन्हा एकदा दाखवलीय. गंधर्व गावडेची भूमिका करणारा समय तांबे अंगभूत निरागसतेमुळे मनाला भिडतो. चित्रपटातील खरेखुरे दशावतारी कलाकार पाहून समाधान वाटते. स्त्री पात्रे साकारणारे निळकंठ सावंत, सुधीर तांडेल, नारद पात्र साकारत दशावतारी कलाक्षेत्रात तीन दशके कार्यरत असणारे विठ्ठल गावकर, आसुरी भूमिकेत रंग भरणारे नाना प्रभू, राजपुत्राच्या भूमिकेत शोभणारे विघ्नराजेंद्र उर्फ बच्चू कोंडुरकर आणि लाजवाब वादकांचा मेळ. ही भट्टी उत्तमरीत्या जमून आलीय. इतर छोट्यामोठ्या भूमिकाही लक्षवेधी. जत्रेचा सेटअप, शाळा, ‘पिकासो’ या चित्रपटाच्या नावामागची पार्श्वभूमी आणि एव्हरग्रीन कोकणातील पावसाळी निसर्ग पाहायचा असेल, तर ‘पिकासो’ बघायलाच हवा. मध्येच  दशावतारी कलावंतांमधील आपापसातील चढाओढ अनुभवता येईल.

अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची समीक्षकांतही बरीच चर्चा झाली. मालवणी मुलखात चित्रित होऊनसुद्धा मुख्य पात्रे शुद्ध मराठीतून संवाद साधत असल्याने समीक्षकांत आणि रसिकप्रेक्षकांतही काही प्रमाणात नाराजी दिसून आली. परंतु मुंबईचे कसलेले कलावंत आणायचे म्हणजे ही बाजू सगळ्यांनीच समजून घ्यायला हवी. चित्रपटाची कथा हळूवार उलगडत जाणारी. मुख्य मुद्द्यांना स्पर्श करणारी. चित्रपटाची लांबी कमी असल्यामुळे अधिक परिणामकारक ठरला आहे.

कधी कधी न सुटणार्याण समस्येला आपणच जबाबदार असतो. आपल्याच काही चुका असतात, ज्या आपल्यालाच संकटाच्या खाईत लोटतात. पण त्यातून मार्ग काढायचा असेल, तर विवेकनिष्ठेने कार्यरत राहायला हवं. डोळसपणे आपले काम केले, तर त्याचे फळ मिळतेच. त्यानंतर जगाला दोष देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, हाच संदेश हा चित्रपट देतो. तुम्हाला मुलं असतील आणि त्यांची स्वप्नपूर्ती होण्याचा आनंद अनुभवायचा असेल, तर वेळ काढून पिकासो नक्की पाहा.