अग्रलेख। वाढत असलेली अस्वस्थता

नेत्यांनी प्रत्येक मंत्री, आमदाराला स्वतंत्रपणे भेटण्यास सुरूवात केली. असे तेव्हाच होते जेव्हा सरकारचे नेतृत्व, पक्ष नेतृत्व किंवा मंत्र्यांच्या विरोधात तक्रारी पोहचतात किंवा सरकारचा कारभार डळमळीत होतो.

Story: अग्रलेख |
11th June 2021, 12:43 am
अग्रलेख। वाढत असलेली अस्वस्थता
धाक नसल्यामुळे मंत्र्यांचे एकमेकांविरोधांत आणि आपल्याच सरकारच्या विरोधात बोलण्याचे प्रकार वाढले आहेत. काही मंत्र्यांची निष्क्रियता, काही खात्यांचा थंडावलेला कारभार यामुळे लोकांमध्येही काही मंत्र्यांविषयी चांगले मत नाही. पक्षातील काही नेत्यांकडून मंत्र्यांना टार्गेट करण्याचे वाढलेले प्रकार, पक्षात असूनही पुढील निवडणुकीपर्यंत पक्षात राहतील की नाही असा काही आमदारांविषयी असलेला संशय यामुळे सत्ताधारी भाजप आतापासूनच अस्वस्थ झाला आहे. काही मंत्री मुख्यमंत्र्यांना बायपास करण्याचा प्रयत्न करतात तर काही मंत्री पक्षापेक्षा मोठे समजतात त्यामुळेच आपल्या ध्येयधोरणांच्या विरोधात काही गोष्टी होऊ लागल्यानंतर भाजप अस्वस्थ होतो. पण त्या अस्वस्थतेवर योग्य वेळी औषध करण्याची पद्धत भाजपात आहे.  आत्ता भाजप औषधपाणी करण्याच्याच विचारात आहे. ते औषधपाणी करताना शस्त्रक्रिया करावी लागते का त्याची चाचपणी पक्षांतर्गत सुरू आहे.  पक्षाच्या गोव्यातील नेत्यांवर एक प्रकारचा ताण आहे, कारण आयात केलेल्या आमदारांमुळेही काही समस्या निर्माण होत आहेत.  निवडणुका समोर असताना सरकार किंवा पक्षात धुसफूस परवडणारी नसते. त्यामुळे काही गोष्टी मार्गावर आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत असेच दिसते. आधीच कोविडमुळे काम पुढे सरकत नसताना काही मंत्र्यांच्या खात्यांमधून फलदायक असे काही होत नसल्यामुळे निवडणुकीला आठ महिने असताना मंत्रिमंडळात फेरबदल करावेत का ? की खात्यांमध्ये बदल करावा अशा विवंचनेत भाजपश्रेष्ठी आहेत. गोव्यात भाजपमध्ये चाललेल्या अंतर्गत धुसफुसीची कल्पना दिल्लीतील भाजप नेत्यांना दिली गेली. हल्लीच केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केली होती. काही मंत्र्यांशीही चर्चा झाली होती. मुख्यमंत्रीही मध्यंतरी दिल्लीला जाऊन शहा यांना भेटून आले. प्रदेश भाजपमधील नेमक्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल.संतोष, भाजपचे गोवा प्रदेश प्रभारी सी.टी.रवी यांना पक्ष श्रेष्ठींनी गोव्यात पाठवले आहे. ह्या नेत्यांनी प्रत्येक मंत्री, आमदाराला स्वतंत्रपणे भेटण्यास सुरूवात केली. असे तेव्हाच होते जेव्हा सरकारचे नेतृत्व, पक्ष नेतृत्व किंवा मंत्र्यांच्या विरोधात तक्रारी पोहचतात किंवा सरकारचा कारभार डळमळीत होतो. भाजपच्या दिल्लीतून आलेल्या वरिष्ठांनी मंत्री आमदारांना भेटण्याचा कार्यक्रम ठरवल्यामुळे सरकारमध्ये काही बदल होताहेत का असे तर्क काढले जात आहेत. निवडणुकीला आठ महिने बाकी आहेत. अशा वेळी भाजप आपल्या कार्यपद्धतीत काही बदल करू पाहत आहे असे स्पष्ट संकेत सध्याच्या स्थितीवरून मिळत आहेत. 
गोव्यातून दिल्लीपर्यंत तक्रारी करणाऱ्यांमध्ये फक्त भाजपचेच लोक आहेत असेही नाही. एनडीएचा भाग असलेल्या आणि डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारमधून हकालपट्टी केलेले काही घटकही आपल्या दिल्लीतील सुत्रांना धरून सरकारविरोधात वारंवार तक्रारी भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडे पोहचवत असतात. सरकारमधील मतभेदांमुळे अशा तक्रारी केल्या जात आहेत. सरकारमधील मतभेद हे ह्या असंतोषाचे मूळ कारण आहे पण त्यावर उपचार कसे केले जातात ते पाहावे लागेल. बी.एल.संतोष आणि सी.टी.रवी हे ह्या असंतोषाचे मूळ शोधतानाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का त्याचीही चाचपणी करून दिल्लीत पक्षश्रेष्ठींना अहवाल देतील. भाजपचे जे आमदार गोव्यात आहेत त्यात कॅडरमधील सक्षम नेते कमी आहेत. डॉ. प्रमोद सावंत हेच सध्या सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना काही मंत्र्यांकडून खो घालण्याचा प्रयत्न होतो. भाजपश्रेष्ठींकडून अशा मंत्र्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला जात आहे. पण काही मंत्र्यांविषयी पक्षामध्येही नाराजी असल्यामुळे निवडणुकींचा विचार करून काही बदलही सरकारमध्ये होऊ शकतात. भाजपच्या वरिष्ठांनी मंत्र्यांच्या कामासह त्यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगानेही चर्चा केल्यामुळे ह्या घटनेने तूर्तास मंत्रिमंडळात अस्वस्थता आहेच. ही अस्वस्थता आता कुठल्या मुद्द्यावर येऊन थांबते ते पहावे लागेल.