एक कप चहा...

श्वासा-श्वासामधलं अंतर जपताना होणारी धडपड...जीव वाचवण्यासाठी चाललेली तारेवरची कसरत याविषयीचा अनुभव...

Story: डॉ. अनिकेत मयेकर |
05th June 2021, 11:48 pm
एक कप चहा...
संध्याकाळची वेळ असल्याने आयसीयूत एक राऊंड घेऊन आरामात रेस्ट रूममध्ये बसलेलो. नामदेव आणि रघु, डॉ.राजकुमार सर  व आयसीयू स्टाफ. संध्याकाळच्या चहाच्या निमित्ताने एकत्र गप्पा मारत बसलेलो. ताण-तणावाच्या  कामात आम्हा आयसीयूमधल्या स्टाफसाठी रेस्ट रूम म्हणजे - अपने दिल की जगह. दिवसभरातल्या कामाचा ताण हलका करायची हक्काची जागा… जिथे अगदी राजकीय घडामोडींपासून अगदी क्रिकेट मॅच, पेशंटविषयीच्या डिस्कशनपासून घरगुती गप्पागोष्टीपर्यंतच्या गप्पा चवीने केल्या जातात…आयसीयूमध्ये काम करणारे मामा,  सिस्टर मावशी, डॉक्टर, RMO… सगळा स्टाफ एक कुटुंब असल्यासारखे जिथं जवळ येतात, आपल्या मनातील दिवसभरातील गुजगोष्टी हलक्या करतात ती ही जागा… दिवसभराच्या ड्युटी नंतर छान गप्पा रंगात आलेल्या. चहा तयार झाला. सगळ्यांनी घेतला. मी मामांकडे बघून डोळ्यांनीच चहाचं विचारलं तर दोघेही उठलेच. "काय नुसता चहा… थांबा जरा, चहासोबत संतोषचा जगप्रसिद्ध समोसा होऊन जाऊदे .." असं बोलता बोलता रघू मामा निघालेच. अशा कातरवेळेच्या निवांत वेळेला एक कप चहा हवाच असतो आणि तो मिळाला म्हणजे  अगदी मरगळलेला चेहरा लखलखीत खुलून येतो हे माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहचाऱ्यांना या आयसीयूमधल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात चांगलंच माहीत झालेलं. आता पण हे असंच झालं "ओहो… थँक यु.. थँक यु.." म्हणत हसत हसत मी चहाचा कप हातात घेतला खरा पण त्यासोबत आमच्या गप्पाही चालू झाल्या…तोपर्यंत रघू समोसे घेऊन हजर! "एवढ्या लवकर?" मी आश्चर्याने विचारलं. "अहो डॉक्टर आणून ठेवलेले. तुम्ही यायची आणि तुमच्या हातात चहा यायची वाट बघत बसलेलो " एकेक समोसे ट्रे मध्ये ठेवत रघू गालातल्या गालात हसत सांगू लागला. सगळेच छान गप्पा करत चहा - समोश्यांचा आस्वाद घेऊ लागलो.गप्पा चांगल्या रंगात आल्या असता अचानकच या निवांत क्षणात मोहोळ उठावा तसा गोंधळ जाणवू लागला. कॅज्युअल्टीच्या दिशेने आवाज येत असताना समोरचा फोन वाजू लागला. डॉ. ओंकार व सूरजचा फोन होता. Emergency ची चाहूल लागली तशी "आलो " एवढंच बोलून फोन कट केला व अर्धा संपलेला हातातला चहाचा कप तसाच तिथे टेबलवर ठेऊन मी झपाझप पाऊलं टाकत कॅज्युअलटीच्या दिशेने निघालो. तिथे दारात नेहमीप्रमाणे काही सिरिअस गोष्ट असल्यावर जे चित्र होतं तेच चित्र! दाराशी ४०-४५ वयाचं दाम्पत्य गदगदित होऊन एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत उभे होते. मी आत गेलो तर पेशंटला छातीत कळा जाणवत होत्या. २६-२७ वर्षांचा तो युवक साहजिकच घाबरेला झाला होता. डॉ. ओंकार  कटाक्ष टाकला तर तो ही चिंतेत दिसला. ECG रिपोर्ट्स तयार ठेऊन तो माझीच वाट पाहत होता. ECG मध्ये inferior wall myocardial इन्फ्राकशन (heart attack ची लक्षणे ) दिसत असल्याने पेशंटला इमर्जन्सी कंडिशन मध्ये आयसीयूमध्ये हलवणं गरजेचं होतं. महत्त्वाचं डिस्कशन करून आम्ही ताबडतोब पेशंटला आयसीयूमध्ये दाखल करून घ्यायची घाई चालवली.बाहेर बातमी समजताच बाहेर असलेले पेशंटचे आईवडील अजूनच रडू लागले. दोघांनाही आत बोलावून सगळं समजवून सांगितलं. एकुलता एक तरुण मुलगा असा अकस्मात आयसीयूमध्ये का शिफ्ट केला जातोय… ऐकून दोघेही हादरलेलेच. " काका, काकू.. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना!!" असं आश्वासन देऊन आवश्यक पेपर्सवर सह्या घेऊन पेशंटला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं व डॉ. भाटे (CARDIOLOGIST ) सर याच्या अंडर ऍडमिट केलं.आता खरी गडबड उडालेली. आमच्या एका ईशाऱ्यासाठी तयार असलेल्या सिस्टर्स आणि वॉर्ड boys मामांनी ताबडतोब धावपळ सुरु केली. नामदेव आणि रघू मामांना इशारा मिळताच एकाने व्हेंटिलेटर तर एकाने पटापट defibrillator आणून ठेवला. जोडून तयारी करून सगळं तयार ठेवलं. इकडे सवयीप्रमाणे सिस्टर emergency tray मध्ये emergency मेडिसिन्स, ऍड्रेनलाईन आणि atropin ETC इंजेकशन्स भरुन तयार ठेवली. पेशंटला बेडवर घेईपर्यंत सर्व तयारी करून आम्ही सर्वच सज्ज होतो. डॉ. भाटे सरांच्या instructions नुसार व डॉ. राजकुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट सुरु झाली. आता पहिलं काम म्हणजे पेशंटला thombolis (शरीरातलं रक्त पातळ करण्यासाठी) इंजेक्शन देण्यात आलं. पण इंजेक्शन दिल्यानंतर अचानकच पेशंटला रक्ताची उलटी होऊन लगेचच मॉनिटरवर सरळ रेषा( Straight line) दिसू लागल्या.  झालं! काही क्षणासाठी आम्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. एक तर पेशंटचं वय काय? तर फक्त सत्तावीस आणि thombolis केल्यानंतर अशी रक्ताची उलटी होण्याचा माझ्या आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवातील पहिलाच प्रकार होता ( complications of thrombolysis). त्यामुळे तातडीने वेळ न घालवता डॉ. राजकुमार सरांच्या सल्ल्यानुसार CPR करायला घेतलं. आयसीयूचा पूर्ण स्टाफ त्या बेडच्या बाजूने गोळा झालेला. Defebrelator जोडून १५० joules चा शॉक दिल्यानंतर मॉनिटरवर पेशंटचे हार्ट बिट्स दिसायला लागले. सगळ्यांच्याच स्ट्रेसचा फुगा क्षणात फुटून कपाळावरच्या आठ्या लुप्त झाल्या.पण काहीच क्षणांत पुन्हा तोच प्रकार! अचानक पुन्हा पेशंटला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. काही कळायच्या आत, आम्ही सावरायच्या आत, बेडभोवती जमलेलो आम्ही सर्वच पूर्णपणे रक्ताने माखून गेलो. त्याच्यातच बघतोय तर पुन्हा मॉनिटरवरच्या लाईन्स सरळ!! एका रेषेचा केवढा छोटासा फरक समोरच्या पेशंटचा जीव खेळवत होता. या रेषेवर जणू काही आम्ही पूर्ण आयसीयू स्टाफ तारेवरची कसरत करत होतो. समोरच्या जीवास वाचवण्यासाठीची कसरत!! आता एक पुन्हा हे मोठं चॅलेंज आमच्यासमोर आ वासून उभं राहिलेलं. तातडीने २०० joules ने defebrelate करायचा इशारा करून आम्ही पुन्हा समोरच्या पेशंटमध्ये प्राण फुंकायच्या तयारीला लागलो. एका क्षणात पुन्हा मॉनिटरवरच्या रेषा हलू लागल्या.  जग इकडचं तिकडे करून, पूर्ण स्वतःला विसरून कामाला लागलेल्या आम्हा सर्वांच्याच कष्टाचे चीज झाल्याने आम्ही सगळेच अगदी सुखावून गेलो. एका एका क्षणाची, पळाची किंमत काय असते ही त्यावेळी कळून आलेली गोष्ट असते. प्रचंड ताण, अनेक तर्कवितर्कातून वाट काढत अंतिम अचूक निर्णयापर्यंत पोहोचायची मेंदूची धडपड आणि लक बाय चान्स म्हणा किंवा पेशंटचा 'काळ आला, पण वेळ नाही' अशा अवस्थेतला तो पूर्ण कसरतीचा वेळ म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, वॉर्डबॉय सगळ्यांसाठी प्रचंड ताणाचा, जबाबदारीचा, कौशल्याचा वेळ असतो आणि अशा सगळ्याचा परिणाम एखाद्या पेशंटचा जीव वाचवण्यात होतो तेव्हा त्याची कीक काही औरच असते!आता या सगळ्या प्रेशरनंतर डोकं घडोघडी एकच मागत होतं… मघाशी अर्धवट सोडलेली चहा!! रक्तात भिजलेला असूनही रेस्ट रूममध्ये जाऊन हात धुऊन, मी पळतच टेबलपाशी गेलो. मघाशी अर्धवट सोडलेला, थंडावलेला चहा अजून माझी वाट बघत होता…