जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने...

अनादी काळापासून निसर्गाला देवत्व बहाल करून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार जपणारे आपण कालांतराने विकासाची कास धरुन सृष्टीवर करत असलेले आघात आणि त्यातून पेरावे तसे उगवावे या उक्तीप्रमाणे आपल्यावर आलेली संकटे याचा ऊहापोह, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने...

Story: शुभदा चारी |
05th June 2021, 11:46 pm
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने...
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें, पक्षी ही सुस्वरे आळवितीसंत तुकारामांचा हा अभंग आपण नेहमीच ऐकतो.... आणि प्राणिमात्राविषयी, सजीव सृष्टीविषयी काही क्षणांपुरता का असेना, आपण नेहमीच विचार करतो. मला संतांचे नेहमीच अप्रृप वाटत आले आहे. आज आपल्या सभोवती किती तरी अशा गोष्टी घडत असतात त्या संदर्भात त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी आपल्या अंभगांतून, आपल्या साहित्यातून सांगून ठेवलेले आहे. उदाहरणार्थ वृक्षवल्ली आपले सगे सोयरे आहेत त्यामुळे आपण त्यांच्याशी नातेवाईकांप्रमाणे वागणे गरजेचे आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाचा विचार करणे गरजेचे आहे. त्याचे संवर्धन होणे तेवढेच गरजेचे आहे . अन्यथा अनर्थ हा ठरलेला आहे .निसर्गाशी आपण जेव्हा निसर्गाचा भाग होऊन वागतो, तेव्हा निसर्गही आपला विचार करतो. आपल्या देशाला पर्यावरणीय संस्कारांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. आपल्या देशातील प्रत्येक प्रदेश आपल्याला निसर्गातील देवत्त्वाची गोष्ट सांगेल आणि त्यामुळे अनादी काळापासून आपल्यावर पर्यावरणीय संस्कार होत गेले, हे सिंधु संस्कृतीतून समजते. दिवस बदलले. आपण माणसाने विकसित संस्कृतीचे पाईक असूनसुध्दा नव्याने विकासाची कास धरली आणि सृष्टीवर कळत नकळत अनेक अत्याचार केले, तिला ओरबाडली. खनिज उत्खनन, वृक्षतोड, जंगलतोड, रेती उत्खनन, कचरा सांडपाणी सरळ नदीत, ओहळामध्ये, जंगली प्राण्यांचं लोकवस्तीत घुसणे, प्रदुषण, असे एक ना अनेक प्रश्न माणसाला सतावू लागले आणि त्यामुळे अनेक आजारांचा ही प्रादुर्भाव होऊ लागला. माणसाचे वसुंधरेवरती अत्याचार वाढत राहिले. त्यामुळे वसुंधरेच्या गर्भात चलबिचल निर्माण होऊ लागली आणि त्सुनामी चक्रीवादळ, पूर, भुकंप अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येत आहेत . याची जाणीव माणसाला व्हावी, आपण निसर्गाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे  हे माणसाला पटवून देण्यासाठी आपण त्याचे संवर्धन केले पाहिजे, म्हणून राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर निसर्गातील वेगवेगळ्या घटकाच्या नावे पर्यावरण दिन, वसुंधरा दिन, नदी संवर्धन दिन, वाघ दिन .… असे अनेक दिवस साजरे केले जातात. ज्यामुळे लोकप्रबोधन व्हावे हा त्यापाठीमागचा हेतू.५ जून जागतिक पर्यावरण दिन. जागतिक स्तरावरती हा दिवस मोठया उत्साहाने साजरा केला जातो आणि यंदाही तो साजरा केला जाईल. आपण काय केले पाहिजे पर्यावरण संवर्धनासाठी? यावर चर्चा केल्या जातील. त्या योजना अंमलात आणल्या जातील. पण काही गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर करणे ही तेवढेच गरजेच आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरण आणि पर्यावरणीय विचार आणणे गरजेचे आहे.आपण आपल्या घरातील साधनांचा उपयोग काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. घरातील सर्व मंडळी जर एकाच खोलीत बसलेली असतील तर इतर खोल्यांतील पंखा आणि वीज बंद करणे, त्याचबरोबर खोलीतून बाहेर निघताना आपण पंखा, वीज बंद केल्याची खात्री जरूर करून घ्यावी.  पाण्याचा उपयोग होईल तेवढा कमी करणे. जिथे एक बादली पाण्याने काम होईल तिथे उगाच कशाला पाणी वाया घालवायचे? नद्यांचे अस्तित्व आज माणसाच्या खिजगणतीत नाही असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपल्याला नदी हवी, परंतु आपल्या घरातील कचरा टाकण्यासाठी, सांडपाणी सोडण्यासाठी आणि अशा बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी . आपण नद्यांना एकेकाळी मातेचा दर्जा दिलेला याचा विसर आपल्याला पडलेला आहे की काय? असे प्रश्नचिन्ह अनेक वेळा डोळ्यांसमोर उभे राहते. नद्या स्वच्छ ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे. आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेची वाट बघण्यापेक्षा, आपणच थोडे परिश्रम घेतले पाहिजे असे नाही का वाटत तुम्हाला? आपल्या कचऱ्याचे विलगीकरण आपण घरीच करूया. ओला कचरा स्वतंत्र आणि सुका कचरा स्वतंत्र करावा. ओला कचरा एकत्र केला तर तीन ते चार महिन्यानंतर आपल्याला खत मिळेल. त्यामुळे मातीची सुपिकता वाढण्यास मदत होईल. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचा विषय आहे ' परिसंस्थेचे संवर्धन' (Ecosystem Restoration). आज नैसर्गिक घटकांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ खूप गाजत होता ज्यात मोठाले ट्रक तोडलेल्या झाडांचे बुंधे आणि प्राणवायूचे सिलिंडर घेऊन जात होते आणि ' ..… .. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे  ईश्वर' हे गीत पार्श्वसंगीत म्हणून वाजत होते. सरळ हृदयाचा ठाव घेणारा असा व्हिडीओ होता तो. कोविड १९ मुळे माणसाला प्राणवायूचे महत्त्व समजले असेल . निसर्गानुरूप असणाऱ्या आपल्या खाण्यापिण्याच्या, रहाण्याच्या सवयी आपण बदलल्या. घनदाट जंगल असो वा खोल समुद्र प्लॅस्टिकचे राज्य आज सर्वत्र पसरलेले आहे. " जे पेराल ते उगवेल" या म्हणीप्रमाणे आपण जे निसर्गाला देऊ, निसर्ग आपल्याला त्याची परत फेड करतो. म्हणूनच तर आपण जेवढे प्लॅस्टिक नदया, नाले, समुद्रात फेकून दिले ते सर्व पाहिजे तर व्याजासकट म्हणा ; निसर्गाने आपल्याला तोक्ते चक्रीवादळाने परत दिले. तोक्ते वादळानंतर आपले समुद्र किनारे कित्येक टन प्लॅस्टिक कचऱ्याने भरलेले होते .आज निसर्गाला शरण जाणे गरजेचे आहे असे मला वाटते. निसर्गाशी अनुरूप जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. चला संकल्प करूया निसर्गाने दिलेला वारसा जपूया आणि संवर्धनासाठी एकजूट होऊया.