Goan Varta News Ad

मतदान केंद्रे सज्ज, मडगावात आज मतदान

६६ हजार ४१३ मतदार बजावणार हक्क

|
23rd April 2021, 12:47 Hrs

फोटो : मडगाव पालिका निवडणुकीसाठी सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आलेले मतदान केंद्र. (अजय लाड)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : पालिका निवडणुकीसाठीचा प्रचार २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात आला आहे. यानंतरही काही ठिकाणी विविध आमिषे दाखवून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे काम उमेदवार करताना दिसत आहेत. निवडणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेत मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत.
आरक्षणात झालेल्या घोळामुळे मडगावातील पालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाचा निकाल आल्याने या निवडणुकांसाठीची प्रक्रिया पुन्हा करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता होती; मात्र राज्य सरकारने सर्व काळजी घेऊन निवडणुका घेण्याचे ठरवल्याने आता पालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडणार आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ हा कालावधी मतदानासाठी ठेवण्यात आलेला आहे. मडगाव पालिका निवडणुकीसाठी एकूण ६६,४१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ३२,२५५ पुरुष तर ३४,१५८ स्त्री मतदार आहेत. मडगावातील करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार गेलेला असल्याने मतदारांमध्ये भीती निर्माण झाली असून मतदानाला किती प्रतिसाद मिळतो, हे पहावे लागणार आहे.
वॉर्ड १५ मध्ये सर्वाधिक पाच मतदान केंद्रे
मडगावातील २५ वॉर्डसाठी हे मतदान होत असून ९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक १५ मध्ये सर्वाधिक पाच मतदान केंद्रे आहेत. याशिवाय एक, दोन, चार, सात, नऊ, दहा, बारा, सोळा, वीस या वॉर्डमध्ये प्रत्येकी चार केंद्रे, वॉर्ड क्रमांक तीन, पाच, सहा, आठ, अकरा, तेरा, चौदा, सतरा, अठरा, एकोणीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस व पंचवीस येथे प्रत्येकी तीन मतदान केंद्रे आहेत.