Goan Varta News Ad

आझाद मैदानावर पर्यटक टॅक्सीवाल्यांचे बेमुदत आंदोलन

अॅप आधारित टॅक्सी सेवा मागे घेण्याची मागणी

|
09th April 2021, 12:18 Hrs
आझाद मैदानावर पर्यटक टॅक्सीवाल्यांचे बेमुदत आंदोलन

फोटो : आझाद मैदानावर आंदोलन करताना टॅक्सीमालक. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : राज्यभरातील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांनी गोवा माईल्स, अपना भाडा व अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेच्या विरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारपासून टॅक्सीवाल्यांनी पणजी येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शकडो टॅक्सीवाले सहभागी झाले आहेत.
जी गोष्ट प्रत्यक्षात गोव्यात शक्य नाही, ती गोष्ट स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या माथी मारून पर्यटन व्यवसायातून स्थानिकांची हकालपट्टी करण्याचा सरकारने चंग बाधला आहे. त्यामुळेच सरकार अ‍ॅप आधारित टॅक्सीला महत्त्व देत आहे. पण नीज गोंयकार टॅक्सीवाले सरकारची ही कूटनीती यशस्वी होऊ देणार नाहीत, असा निर्धार आंदोलक टॅक्सीवाल्यांनी केला आहे. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करून अन्यायकारी निर्णय बदलण्यास तयार न झाल्यास वाहतूक अडवून सरकारची कोंडी करण्याचा मार्ग अवलंबण्याचा निर्णयही टॅक्सीवाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
गोवा माईल्स व अ‍ॅपआधारिच टॅक्सी सेवा रद्द करावी, निज गोंयकारांना टॅक्सी व्यवसाय मोकळेपणाने करण्याची मुभा द्यावी, टॅक्सी व्यवसायात अडथळे आणू नये, अशा मागण्या आम्ही सरकारकडे केल्या होत्या. पण सरकारने या मागण्या मान्य न करता अ‍ॅप आधारित सेवा गोव्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही टॅक्सी सेवा बंद करून धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालेल. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आझाद मैदानावर हे आंदोलन होईल, असे टॅक्सी संघटनेचे योगेश गोवेकर, चेतन कामत, बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.   

टॅक्सी संघटनेला आझाद मैदानावर आंदोलनासाठी दिलेला परवाना, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी रद्द केला आहे. ८ एप्रिल रोजी ८०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमा झाल्यामुळे १४४ कलमाचा भंग झाला आहे. त्यामुळे दिलेला परवाना त्वरीत रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.