Goan Varta News Ad

नाराजांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उदय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd March 2021, 11:47 Hrs
नाराजांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उदय

पणजी : भाजपमधील नाराज नेत्यांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. आम्ही आमच्या पॅनेलचा प्रचार सुरू केला असून, तीसही प्रभागांत आमचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महापौर उदय मडकईकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात भाजपचे आमदार आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या पॅनेलला भाजपचे समर्थन आहे. यावरून पक्षातील काही नेते नाराज झाले आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे अजिबात वेळ नाही. मनपा निवडणुकीत संपूर्ण पॅनेल जिंकून येण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न आणि प्रचारही सुरू केला आहे. गेल्या कार्यकाळात पणजीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे पणजीतील जनता यावेळीही आमच्यावर विश्वास ठेवेल, असे उदय मडकईकर म्हणाले.
मनपा निवडणुकीत आम्ही पणजीकर पॅनेलच्या बॅनरखाली उमेदवार उभे राहत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. आम्हालाही बिनविरोध निवडणूक नको होती. आमच्याविरोधात उमेदवार उभे राहत असल्याने निकालानंतर आमची कामगिरी आम्हाला समजण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पणजी मनपासाठी आमदार बाबूश यांनी जाहीर केलेल्या पॅनेलला भाजपने समर्थन दिले असले, तरी प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक, सिद्धार्थ कुंकळ्येकर, उत्पल पर्रीकर यांच्यासारखे पक्षाचे मूळ नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दुखावले असून, ते भाजप पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे पणजीत भाजप विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.