समाजासाठी योगदान महत्त्वाचे : देविदास कोटकर

ज्येष्ठ पत्रकार उदय सावंत यांचा गौरव


03rd March 2021, 12:30 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वाळपई : समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाने समाजाच्या विकासात आपले योगदान देणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या विकासात समाजाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे आपले उत्तरदायित्व निभावणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन वाळपई सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोटकर यांनी केलेे. 

वाळपई वन प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात सम्राट क्लबने ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते उदय सावंत यांच्या गौरव समारंभ आयोजित केला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उद्योजक प्रवीण सबनीस, वाळपई सम्राट क्लबच्या अध्यक्षा अनुराधा म्हाळसेकर, सम्राट क्लबचे सचिव अंकुश धुरी, कोषाध्यक्ष सुभाषचंद्र गावस, माजी अध्यक्ष गौरेश गवस, दीपक पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सावंत यांचा गौरव हा उचित असून सम्राट क्लबने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोटकर यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. पत्रकार उदय सावंत यांचा प्रवीण सबनीस यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार उदय सावंत यांनी सांगितले की, गेल्या पंचवीस वर्षांत अनेक प्रकारच्या अडचणी, समस्या आणि संघर्ष निर्माण झाले. मात्र प्रत्येकवेळी समाजातील अनेक मित्रांनी सहकार्य दिल्यामुळे सर्व प्रकारची आव्हाने व संघर्ष पार करून समाजाच्या विकासासाठी कर्तव्य तडीस देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. सावंत यांनी सम्राट क्लबचे आभार मानले. प्रवीण सबनीस यांनी विचार व्यक्त केले. 

संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा म्हाळशेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांची ओळख संजय हळदणकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले, तर अंकुश धुरी यांनी आभार मानले.

हेही वाचा