यूपीतून व्हीडिओ कॉलवर बोलण्यास पत्नीचा नकार; गोव्यात पतीने संपवले जीवन!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 04:25 pm
यूपीतून व्हीडिओ कॉलवर बोलण्यास पत्नीचा नकार; गोव्यात पतीने संपवले जीवन!

मडगाव : पत्नीने व्हीडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याचा राग धरून पती अमर नागेंद्र शर्मा (३२, मूळ रा. मिर्झापूर, उत्तरप्रदेश) याने बाळ्ळी येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. 

उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेला अमर हा दीड महिन्यापूर्वी गोव्यात कामानिमित्ताने आला. बाळ्ळी येथे त्याच्या मेव्हण्याचे केशकर्तनालय होते. त्या ठिकाणी अमर हा सध्या कामाला होता. पत्नी व दोन मुलांना त्याने उत्तरप्रदेश येथील घरीच सोडून तो गोव्यात आला होता. त्याने बुधवारी मध्यरात्री पत्नीला व्हीडिओ कॉल केला असता पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. या कारणाने अमरला राग आला व त्याने भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

अमर दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांना कळवण्यात आले होते. कुंकळ्ळी अग्निशामक दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता अमरने आत्महत्या केल्याचे दिसून आले. अमरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवलेला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान पत्नीने बोलण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव अमर रागावला व त्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याचे कारण पुढे आले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा