Goan Varta News Ad

पोदेर ... एक वेगळंपण!

अनुभूती

Story: सागर मच्छिंद्र डवरी, ९६३७० ७१४६४ |
31st January 2021, 05:35 Hrs
पोदेर ... एक वेगळंपण!

गोव्यात नोकरी लागल्यापासून हळूहळू मी इथल्या वातावरणात रमू लागलोय. सहा- सात वर्षे होताहेत आता. इथली निसर्गसंपदा मनाला भुरळ घालते तर संस्कृती मन प्रसन्न करते. शिगमोत्सव (वा शिमगोत्सव), कार्निव्हल, लोकनृत्ये, जत्रा या सर्वांनी गोव्याचे वेगळेपण अजूनही जतन करून ठेवलंय. विविधतेने ओतप्रोत असलेला गोवा बाहेरच्या जगाला मात्र किनाऱ्यापुरताच मर्यादित वाटतोय. बाहेरच्यांना अजून गोव्याची खरी ओळख झालेली नाही, असे अनेकदा माझ्या निदर्शनास आले आहे. गोव्याविषयी अनेकांच्या मनात गैरसमज पसरले असल्याचेही जाणवले.

ब्रिटिशांनी देशावर जवळपास दीडशे वर्षे शासन केले तर गोवा हा जवळपास साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या जोखडात होता; आणि तरीही आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे जिकिरीचे काम गोमंतकीयांनी पार पाडले. खूपशी उलथापालथ झाली या चार शतकांत. सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, साहित्यिक..! ही यादी आणखीही वाढवता येईल कदाचित! पोर्तुगीज राजवटीने इथल्या बऱ्याच गोष्टींवर परिणाम केला अथवा त्याचा प्रभाव झाला, असे म्हणावे लागेल. इथले खानपान, वेषभूषा, राहणीमान, दैनंदिन व्यवहाराच्या पद्धती, भाषा काही प्रमाणात बदलले.

पोर्तुगीजांसोबत आला आणि इथे रुजला तो म्हणजे बेकरी व्यवसाय. मग साहजिकच त्याच्याशी निगडीत इतर गोष्टीही आल्याच. त्यातल्या एकाविषयी आज थोडंसं लिहावंसं वाटतंय..!

सकाळी सकाळी आपण सगळेच छान झोपेत असतो, बाहेर उजाडल्यामुळे पाखरांचा किलबिलाट कानावर येत असतो आणि तेवढ्यात गजर वाजावा तसा पों.. पों.. आवाज झोपेतून जागा करतो. बाहेर पाव घेऊन पोदेर आल्याचे कळते. वाड्यांवरील माणसांची पाव घेण्यासाठी लगबग वाढलेली दिसते. एक सायकल, तिच्यामागे टोपलीचा भला मोठा पेटाराच जणू बांधलेला असतो. त्यावर निळ्या रंगाचे प्लॅस्टिक, कागदाचे कव्हर..! हातात पों.. पों... करायचा रबरी फुगा असलेला हाॅर्न! तो फुगा दाबला की आवाज यायला सुरू. त्यामध्येही एक ताल असतो. निळा कागद बाजूला सारला की त्या जादूच्या पेटाऱ्यांतून गरम गरम पाव, उंडे, काकणं बाहेर पडायला लागतात. लहान- मोठे सगळेच त्याच्याभोवती जमतात. पाव घेऊन सगळे गेले की पुन्हा अलगद कागद झाकला जातो आणि हा जादूचा पेटारा पों.. पों.. करत पुढच्या वाड्यावर जातो.

सुरुवातीच्या काही दिवसात त्या आवाजाकडे कुतूहल म्हणून लक्ष जायचे. आज मात्र सवयीने लक्ष जाते. पोदेर हा इथल्या खानपान संस्कृतीतला एक महत्त्वाचा घटक, जो सर्वांना पाव पुरवायचं काम करतो. पाव हा इथल्या न्याहारीचा, जेवणाच्या ताटातला महत्त्वाचा पदार्थ, ज्याशिवाय जेवण किंवा इथले खाणे अपूर्णच! पाव हा गोमंतकीय जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणावा लागेल!

मला आठवतंय, काही वर्षे मी नागेशीत (बांदोडा- फोंडा) राहायला होतो. तेव्हा तिथंच शेजारी एक बेकरी होती. तिळवे बेकरी! बेकरीत पाव भाजले की खमंग वास सुटायचा. मग बेकरीत जाऊन पाव, खारी, वेगवेगळी बिस्किटं असं काही ना काही घेऊन यायचं. ताजे, गरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते.

भल्या पहाटे उठून हे पोदेर बेकरीतून सर्व साहित्य घेऊन आपला पेटारा भरून घेतात आणि मग यांची सायकल झोके घेत वळणा- वळणाची वाट वाड्या- वस्त्यांमधून चालत पुढे जात राहते. आज काही पोदेर स्कूटरवरूनही येतात, पण त्यांच्या हातातला तो पों, पों.. आवाज मात्र बदललेला नाही. तो आहे तसाच आहे! कारण तो आवाज हीच तर त्यांची लांबूनही होणारी ओळख! त्यांना ती बदलता येणार नाही हे मात्र निश्चित...!

पावसाळ्यातही हे पोदेर अगदी ठरल्या वेळेत येतात. रेनकोट घालून आणि तो पेटारा निळ्या कागदात झाकून. तेव्हाही ते पाव तेवढेच ताजे आणि उबदार असतात. ही ऊब वर्षानुवर्षे आपुलकीने, प्रेमाने सर्वांपर्यंत पाव पोहचवायच्या धडपडीची आहे. बऱ्याचवेळा मी या पोदेरना चक्क रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांनाही पाव खायला घालताना पाहिले. पेटाऱ्यासारखंच त्याचं मनही मोठं होऊन जातं. जसा सकाळी तसाच संध्याकाळी हा पेटारा डौलात फिरतो.

फोंडा कार्निवलमध्ये गोव्याच्या संस्कृतीचे देखावे खूप वेळा पाहिले आणि त्यातही हा पोदेर गोव्याची एक ओळख, एक वेगळेपण म्हणून मिरवताना आघाडीवर दिसला. त्याची ती सायकल.. तो जादूचा पेटारा आणि पों.. पों.. आवाज अजूनही या गर्दीत आपलं वेगळेपण राखून आहे. सध्या मला हरमलला दोन वर्ष होताहेत आणि इथंही सकाळी पोदेरच्या पों.. पों.. आवाजानेच जाग येते; आणि नकळत पावाचा खमंग वास श्वासात भरल्याचा भास होतो. तो आवाज जणू आपल्या सोबतच सारं घेऊन येतो.

अशा वेगवेगळ्या नाविन्याने भरलेला गोवा, आपली ओळख माझ्या मनःपटलावर नेहमीच कोरतो. अशा एक-एक गोष्टींतून तो सांगत असतो की मी फक्त झगमगाटाने नटलेल्या बीचवर नाही तर अशा कित्येक गोष्टी माझ्यात सामावल्या आहेत. तो आपलं वेगळेपण माझ्यासमोर मांडत असतो आणि त्यातलाच एक हा पोदेर...! आपला पेटारा सोबत घेऊन फिरणारा!

(लेखक प्राध्यापक आहेत.)