माझ्यावरील जबाबदारी वाढली!

परामर्श

Story: स्वाती पेशवे पुणे |
31st January 2021, 05:26 pm
माझ्यावरील जबाबदारी वाढली!

वाचनसंस्कृती लयास जाते की काय, अशी आशंका असणाऱ्या परिस्थितीत दरवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भरणाऱ्या सरस्वतीच्या दरबाराकडे साहित्यिकांबरोबरच सामान्य वाचकांचेही डोळे लागून असतात. तीन दिवसांच्या या भरगच्च समारंभात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे सुरू राहणारा ज्ञानयज्ञ अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. साहित्यिक आणि रसिकांना समोरासमोर आणणाऱ्या, लिखित साहित्याद्वारे भेटणाऱ्या साहित्यिकांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी देणाऱ्या, ग्रंथांच्या खरेदी-विक्रीद्वारे मोठी उलाढाल घडवून आणणाऱ्या आणि नवोदित लेखक तसंच कवींना मोठं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या संमेलनामुळे साहित्यविश्वात वर्दळ वाढते. अर्थातच दरवेळी अध्यक्षनिवडीपासून अध्यक्षीय भाषणांपर्यंत आणि साहित्यिकांच्या प्रवासखर्चापासून व्यासपीठावरील राजकारण्यांच्या उपस्थितीपर्यंत अनेक विषय गाजत असले तरी या निमित्ताने साहित्याची चर्चा होते, हेही नसे थोडके! त्यातच अध्यक्षस्थान योग्य आणि अधिकारी व्यक्ती भूषवत असेल तर कोणत्याही सभेची उंची वाढते. साहित्य संमेलनदेखील याला अपवाद नाही! म्हणूनच साहित्य संमेलनाच्या आयोजनाबरोबरच अध्यक्षस्थान कोण भूषवणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. या पार्श्वभूमीवर यंदा नशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांची एकमताने निवड होणं आश्वासक म्हणायला हवं. म्हणूनच साहित्यवर्तुळात या नावाचं निर्मळ आणि दिलखुलास स्वागत झालं. संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखकाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हेदेखील यंदाच्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे लेखक म्हणून आपण डॉ. जयंत नारळीकर यांना ओळखतो. सध्याच्या तंत्रज्ञानाधिष्ठित युगात साहित्य संमेलनाला नारळीकरांसारखा विज्ञानवादी अध्यक्ष लाभणं हे भाग्यच म्हणायला हवं. कारण एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून असणारी नवी जीवनशैली आणि जीवनपद्धती आत्मसात करुन जगताना आपल्या विचारधारेत मात्र विज्ञानवादाला फार मोठं स्थान अद्यापही दिलेलं दिसत नाही. एकविसाव्या शतकातही आपल्या जाणिवा अंधश्रद्धांना कुरवाळणाऱ्याच दिसतात. विज्ञाननिष्ठा वाढवण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. आजही विज्ञानवादाचा प्रसार करणाऱ्यांना प्रखर समाजरोषाला सामोरं जावं लागतं. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असणं हे आजच्या समाजानं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं आहे. म्हणूनच विज्ञानासारखे विषय परभाषेतून शिकताना आपल्या मुलांना त्रास होतो, हे त्यांच्या तथाकथित समंजस पालकांना समजत नाही. आजही आपली शिक्षणपद्धती अनेक चुकीच्या संकल्पनांवर आधारित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संमलनाच्या मंचावरुन डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे विज्ञानवादी लेखक परखड मत मांडतील यात शंका नाही. ‘सोनाराने कान टोचलेले चांगले’ हे वाक्य प्रमाण मानलं तर आपल्या अध्यक्षीय भाषणात नारळीकर सरांकडून मांडले जाणारे विचार निश्चितच उपदेशात्मक ठरतील, अशी आशा आहे. त्यांच्या विचारधारेची छोटीशी झलक दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणातून मिळते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना वेळात वेळ काढून ते प्रश्नांना उत्तरं देतात आणि त्यातून आपली विचारधारा तसंच आगामी वर्षातलं कार्यनियोजन स्पष्ट करतात तेव्हा त्यांच्यातल्या उत्साहाला आणि कार्यप्रवणतेला सलाम करावासा वाटतो. कदाचित या छोट्या मुलाखतीतच त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची बीजं सापडतील.

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया काय?

- पहिली प्रतिक्रिया देताना मी एवढंच म्हणू शकेन की मिळालेल्या या सन्मानामुळे माझ्यावर नक्कीच काही दडपणं आली आहेत. ही निश्चितच फार मोठी जबाबदारी आहे. या पदावर बसवून लोकांनी माझ्याकडून काही तरी वेगळं करुन दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कारण प्रथमच साहित्यक्षेत्राच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या जागी नेमणूक झाली आहे. त्यामुळेच आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे.

* साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने सहित्यप्रेमींना आपल्याकडून काय मिळेल? हा नवा पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभराचं काही नियोजन आहे का?

- पुढील वर्षभराचं नियोजन नक्कीच आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांशी अधिकाधिक संवाद साधण्यास प्राधान्य असेल. विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी विचार करण्यास प्रवृत्त करणं आणि संवादातून विज्ञानविषयक काही माहितीपूर्ण पुस्तकांची तोंडओळख करुन देणं हे माझं एक महत्त्वाचं काम असेल. याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी पाठांतरावर भर न देता अथवा त्यावर विसंबून न राहता हसत-खेळत विज्ञान शिकावं असं मला वाटतं. याद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानवादी विचार करण्यास तसंच विज्ञानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणं हाच माझा प्रयत्न राहील.

* मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि वाढावी यासाठी कोणते प्रयत्न होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?

- मुलांची प्रत्येक प्रतिक्रिया अनेक बाबींवर अवलंबून असते. वाचनाच्या आवडीविषयी बोलायचं झाल्यास मुलांना अभ्यासातून कोणत्या गोष्टी किती रंजक पद्धतीने दाखवल्या जातात, त्यांच्या मनात साहित्याप्रती प्रेम आणि कुतूहल निर्माण होईल यासाठी शिक्षक आणि पालक कोणता मार्ग अवलंबतात यावर विद्यार्थ्यांच्या बर्याच प्रतिक्रिया अवलंबून असतात. खेरीज मुलांनी कोणत्या गोष्टी आत्मसात करणं आवश्यक आहे हे आधी शिक्षक आणि पालकांना स्पष्ट असावं लागतं. या सगळ्यानंतर मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळणं गरजेचं ठरतं. त्यांना वेळ मिळावा यासाठी त्यांच्यावरचा इतर दबाव शक्य तितका कमी करणं आणि साहित्यप्रेमाकडे नेणारा मार्ग प्रशस्त करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.

* सध्या ई-बुक्सचा जमाना आहे? ऑडिओ बुक्सना अनेकांची पसंती मिळत आहे. हा बदल सकारात्मक वाटतो की नकारात्मक?

- माझ्या मते वाचनासाठी कोण कोणता मार्ग अवलंबतो हे महत्त्वाचं नाही. शेवटी लोकांना वाचनाची गोडी लागणं महत्त्वाचं आहे. तुम्ही वाचता ते चांगलं असलं पाहिजे. काहीही वाचावं आणि स्वत:ला वाचनप्रेमी म्हणावं असं असता कामा नये.

* वाचन समृद्ध करणारं असावं असं म्हणताना वाचकांनीही काही बाबींची दक्षता घेणं गरजेचं असतं. वाचकांनी अशा कोणत्या गोष्टींची दखल घ्यायला हवी?

- वाचनाकडे केवळ वाचनाच्या दृष्टीने पाहता कामा नये तर जे काही वाचतो त्याचे उपयोग काय, याचाही विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. एखादा विषय केवळ वाचून नव्हे तर समजून घेतला तरच समजतो. म्हणूनच वाचलेल्या आणि भावलेल्या एखाद्या विषयासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी अन्य स्त्र्रोतांचा अवश्य आधार घ्यावा. शाळेमध्ये प्रत्येक क्लासमध्ये आठवड्याचं वेळापत्रक असतं. त्यात कोणत्याही एका दिवशी एक अतिरिक्त तास असावा आणि त्या वेळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारावेत आणि शिक्षकांनी उत्तरं द्यावीत. हा प्रयोग यशस्वी होईल आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या बर्याच शंकांचं निरसन होण्यास मदत होईल, असं मला वाटतं. आठवड्यातल्या या एका अतिरिक्त तासाच्या निमित्ताने विद्यार्थी विचार करण्यास प्रवृत्त होतील. त्यानिमित्ताने त्यांची वाचनातली एकाग्रता वाढेल आणि शिक्षकांशी होणाऱ्या संवादातून तसंच शंकानिरसनातून ज्ञानवर्धन होईल याबाबत शंका नाही. अर्थातच यातूनच विषयाची समज वाढण्यासही मदत होईल.

* साहित्य संमेलनाकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता?

- मी साहित्य संमेलनाकडे अत्यंत उत्सुकतेनं पहातो. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. मी संमेलनस्थळी येणाऱ्यांना नवीन विचार करण्यास प्रवृत्त करु शकेन, अशी आशा आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)