गदारोळाने सुरुवात!

राज्यपालांचे तीन मिनिटांचे भाषण; विरोधक आक्रमक


26th January 2021, 12:06 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे केवळ तीन मिनिटांचे भाषण आणि त्यात कोळसा, रेल्वे दुपदरीकरण, तमनार प्रकल्प आदी राज्यातील धगधगत्या प्रश्नांवर भाष्य नसल्याचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवाय भर सभागृहात राज्यपालांसमोरच त्यांनी कोळसा विरोधीची बॅनरबाजीही केली.
राज्यपाल सभागृहात पोहोचण्याआधीच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेस आमदार लुईझिन फालेरो, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगावकर, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर तसेच अपक्ष आमदार रोहन खंवटे व प्रसाद गावकर काळ्या फिती आणि ‘गोव्यात कोळसा नको’चे फलक घेऊन सभागृहात दाखल झाले होते. ११.३६ वाजता राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषणास सुरुवात केली. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. करोना तत्काळ नियंत्रणात आणून राज्य सरकारने विकासप्रक्रिया गतिमान केली, असे म्हणत राज्यपालांनी सरकारचे कौतुक केले आणि तीन मिनिटांतच त्यांनी अभिभाषण संपवले. राज्यपालांच्या भाषणात गोव्यातील ज्वलंत विषयांवर भाष्य नसल्याचा मुद्दा पुढे करत विरोधी आमदारांनी सभागृहातच कोळसा नकोच्या घोषणा आणि बॅनरबाजीही केली.
सभापतींकडून चर्चेची हमी
राज्यपाल सभागृहातून बाहेर पडताच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह विजय सरदेसाई, लुईझिन फालेरो, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर यांनी अधिक आक्रमक होत सरकारवर हल्ला चढवला. या प्रश्नांवर पुढील तीन दिवसांत चर्चा घडवून आणण्याची हमी देत सभापती राजेश पाटणेकर यांनी श्रद्धांजली ठराव घेतला व सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केले.

हेही वाचा