Goan Varta News Ad

चित्रपटांवर बोलता मग प्रश्नांवर का नाही?

आमदार विजय सरदेसाईंचा राज्यपालांना सवाल

|
26th January 2021, 12:03 Hrs
चित्रपटांवर बोलता मग प्रश्नांवर का नाही?

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चित्रपटांवर भाषण दिले. पण, त्यांना गोव्यात ज्या कामासाठी पाठवले आहे, ते मात्र त्यांनी केले नाही. सभागृहात कोळशाचा विषय उपस्थित होणार म्हणून सरकारने राज्यपालांना ‘शॉर्टकट’ मारायला लावला, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
विधानसभेत निवडून गेलेले आमदार लोकांचे प्रतिनिधी असतात. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देणे आमदारांचे कर्तव्य आहे. पण सरकार जाणीवपूर्वक लोकांचे प्रश्न विधानसभेत येऊ देत नाही. गोमंतकीय जनतेसह एक तृतियांश संख्याबळ असलेल्या विरोधी आमदारांचा सत्ताधारी सामना करू पाहत नाहीत. इफ्फीत चित्रपटांवर भरभरून भाषण करणारे राज्यपाल गोमंतकीय जनतेसमोरील प्रश्नांवर भाष्य करत नाहीत. सरकारला असेच धोरण पुढे सुरू ठेवायचे असेल तर अधिवेशन घेताच कशाला, हिमत असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घ्या, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.
मागील एकदिवसीय अधिवेशनावेळी कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत पुढील अधिवेशन दीर्घकालीन घेण्याची मागणी आपण केली होती. पण आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करून सरकारने यावेळी केवळ पाच दिवसीय अधिवेशन घेतले. त्यांतील तीनच दिवस चर्चेसाठी मिळतात. गोव्याला सध्या अनेक प्रश्न भेडसावत आहेत. ते विधानसभेत उपस्थित करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. अधिवेशनात केवळ तीन दिवसांचा वेळ मिळत असेल तर आम्ही लोकांचे प्रश्न मांडायचे कसे, असा सवाल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उपस्थित केला. बुधवारी म्हादई, मोले आणि गांजा या तीन लक्षवेधी सूचना विरोधी आमदारांनी संघटितपणे मांडल्या असून, त्यावर चर्चा घडवून आणण्याची हमी सभापतींनी आम्हाला दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
भर सभागृहात राज्यपालांसमोर विरोधी आमदारांनी जे कृत्य केले, ते चुकीचे आहे. विरोधात बसलेले बहुतांशी आमदार ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडून राज्यपालांसमोर बॅनरबाजी होणे सभागृह नियमांत बसत नाही. त्यांच्या कृत्याबाबत सभापतींनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.