Goan Varta News Ad

विश्वजीतच्या यू-टर्ननंतर भाजप बचावाच्या पवित्र्यात

मुख्यमंत्र्यांचे मौन; राणे गोव्यात परतताच भाजप करणार चर्चा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
13th January 2021, 11:59 Hrs
विश्वजीतच्या यू-टर्ननंतर भाजप बचावाच्या पवित्र्यात

पणजी : शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पावरून स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनी यू-टर्न घेत मुख्यमंत्री आणि पक्षाविरुद्ध बंड पुकारल्याने बुधवारी भाजपमध्ये खळबळ माजली. मंत्री राणे यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी एक शब्दही काढला नाही. तर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विश्वजीत राणे गोव्यात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
सांगेतून सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली येथे हलविण्यात आलेल्या आयआयटी प्रकल्पाचे गेल्या सोमवारपर्यंत स्थानिक आमदार विश्वजीत राणे समर्थनच करीत होते. आयआयटी प्रकल्पामुळे सत्तरीचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प आपण शेळ-मेळावली येथे उभारणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मंत्री राणे यांचे आयआयटीला ठाम समर्थन असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजपनेही स्थानिकांचा विरोध मोडून काढत प्रकल्पाला गती देण्याचा चंग बांधला.
आयआयटी प्रकल्प रद्द करा आणि प्रकल्पासाठी निश्चित केलेली जमीन स्थानिकांच्या नावावर करा, अशी मागणी करीत गेल्या काहीच दिवसांपूर्वी शेळ-मेळावलीवासीयांनी तीव्र आंदोलन छेडले. दहा जणांच्या शिष्टमंडळाला सरकारकडे चर्चेसाठी पाठवा. चर्चेअंती सकारात्मक तोडगा काढून प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी वारंवार केले. तरीही स्थानिक ऐकायला तयार होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करत भूमापनाचे काम सुरू केले. त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पोलिस आणि स्थानिक यांच्यात युद्ध पेटले. यात पोलिसांनी आंदोलक महिलांच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या प्रकरणानंतर तिघांना अटक करण्यासह काही आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.
या प्रकरणानंतर मात्र विश्वजीत यांनी मंगळवारी अचानक आपला निर्णय बदलत आयआयटीबाबत आपण स्थानिकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. लोकांचा विरोध पत्करून सरकार प्रकल्प पुढे रेटू शकत नाही. त्यामुळे आपण हात जोडतो पण आयआयटी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली आहे. शिवाय आपण आमदार असेपर्यंत प्रकल्पाचा एक दगडही रचू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी केला आहे.
विश्वजीत राणे यांच्या यू्-टर्नमुळे सरकार आणि भाजप आयआयटीप्रश्नी संकटात सापडले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपनेही तूर्त बचावात्मक पवित्रा घेतला आहे. बुधवारी दिवसभरात प्रदेशाध्यक्ष तानावडे वगळता भाजपच्या एकाही नेत्याने किंवा मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने यावर भाष्य केले नाही. पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केवळ ‘मी त्यावर बोलेन’ एवढेच उत्तर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिले आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
वाळपईचे आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे सध्या गोव्याबाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सध्या बोलता येत नाही. राणे गोव्यात परतल्यानंतर आयआयटीबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष