गळ्यातील ताईत ते 'गले की हड्डी'!

स्पॉटलाइट

Story: राहूल गोखले ९८२२८ २८८१९ |
10th January 2021, 01:06 pm
गळ्यातील ताईत ते 'गले की हड्डी'!

अब्जावधींची उलाढाल असणाऱ्या 'अलिबाबा' या चीनी ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा हे गेल्या दोनेक महिन्यांपासून 'गायब' आहेत अशी वृत्ते आली आणि जगाच्या काळजाचा ठोका चुकला. चीनमध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्यांची काय स्थिती होते, याची जगाला कल्पना असल्याने आणि मा यांनी अलिकडेच सरकारी धोरणांवर टीका केली असल्याने त्यांच्या या कथित गायब होण्याचा संबंध सरकारी हडेलहप्पीशी लावला गेला नसता तरच नवल. अर्थात मा 'गायब' नसून ते प्रकाशझोतापासून दूर राहू इच्छितात, अशा बातम्या आता आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही मा यांची ही स्थिती आर्थिक सुबत्तेपेक्षाही चीनमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना असणाऱ्या मर्यादा किती ठळक आहेत, हेच अधोरेखित करणारी आहे.

अपघाताने देखील एखाद्या क्षेत्रात शिरून कल्पकतेने, उद्यमशीलतेने, चिकाटीने आणि जिद्दीने कशी भरारी घेता येते याचे जॅक मा हे मूर्तिमंत उदाहरण. मा युन हे त्यांचे मूळ नाव. मात्र, इंग्रजी शिकण्याच्या उर्मीने ते लहानपणी हँगझाऊ आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये उतरणाऱ्या इंग्रजी भाषक पर्यटकांना आपल्या सायकलवरून सफर घडवून आणत आणि ते करताना इंग्रजीचा सरावही करीत असत. नऊ वर्षे त्यांनी हे केले आणि त्यातूनच त्यांना जॅक हे नाव मिळाले. कारण त्यांचे चीनी नाव उच्चारणे त्या इंग्रजीभाषकांना अवघड जात असे. महाविद्यालयात शिक्षणासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली. पदवीधर झाल्यावर त्यांनी प्रतिष्ठेच्या हार्वर्ड बिझनेस स्कुलमध्ये दाखला घेण्यासाठी दहा वेळा अर्ज केला आणि प्रत्येकवेळी त्यांना नकार मिळाला. नंतर नोकरीसाठी त्यांनी तीस ठिकाणी अर्ज केले आणि तेथेही प्रत्येक वेळी नकारच स्वीकारावा लागला. १९९४ मध्ये मा यांनी पहिल्यांदा इंटरनेट, हा शब्द ऐकला आणि अमेरिकेला गेले असता त्याचे सामर्थ्य काय असते याची वर्णने त्यांनी त्यांच्या काही मित्रांकडून ऐकली.

यातूनच 'चायना पेजेस' या चीनविषयक व्यापाराची माहिती देणाऱ्या साईटची सुरुवात केली, एवढेच नव्हे तर १९९५ मध्ये त्यांनी चायनापेजेस या 'डोमेन'ची नोंदणी अमेरिकेतही केली. पुढच्या तीनेक वर्षांत त्यांनी आठ लक्ष अमेरिकी डॉलरचे उत्पन्न कमविले. मग चीनमध्ये काही कंपन्यांना त्यांच्या वेबसाईट तयार करून देण्याचा व्यवसाय मा यांनी सुरु केला. मात्र या सगळ्या वाटचालीत मैलाचा दगड सिद्ध झाला तो अलिबाबा हा प्रयोग. आपल्या काही मित्रांसमवेत मा यांनी या ई -कॉमर्स साईटची सुरुवात केली. मुख्यतः चीनमधील सूक्ष्म आणि लघुउद्योगांना आपली उत्पादने विकण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी हा प्रयोग होता. तो कमालीचा यशस्वी झाला; इतका की टाओबाओ मार्केटप्लेस, अलिपे इत्यादींमधून जागतिक स्तरावर त्यांनी भरारी घेतली. या वाढत्या आलेखाचे आकर्षण वाटून ई-बे या प्रख्यात ई कॉमर्स उद्योगाने मा यांची कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, मा यांनी नकार दिला. २०१४ मध्ये अलिबाबाने अमेरिकी स्टॉक एक्सचेन्जमध्ये तब्बल २५ अब्ज डॉलरचा आयपीओ उभारला.

ई कॉमर्समधील घवघवीत यशानंतर मा यांनी चित्रपटनिर्मिती, आरोग्यक्षेत्र, क्रीडाक्षेत्र, माध्यमे या क्षेत्रांत देखील विस्तार केला. मात्र, येथेच नेमकी मेख होती. चीनच्या हुकूमशाही राजवटीला ही आर्थिक सुबत्ता कितीही मोठी वाटत असली तरी त्यापायी येणारी कोणाची मक्तेदारी मात्र सलते आणि त्यातही कोणी सरकारविरोधात टिप्पणी केली तर ती खुपते. मा यांच्या बाबतीत तेच झाले आहे. वास्तविक मा हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आहेत. चीनमध्ये अनेक पुरस्कारांचे ते धनी ठरले आहेत. पण 'आहे सोबत तोवर आहे तुमचे सर्व पसंत' हे हुकूमशाही राजवटीचे व्यवच्छेदक लक्षण. काही महिन्यांपूर्वी मा यांनी चीनी बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक नियंत्रकांवर टोचणारी टिप्पणी केली. या संस्था म्हणजे म्हाताऱ्यांचे क्लब झाले असून त्या सावकारी मनोवृत्तीने काम करीत आहेत अशी टीका केली. बँकिंगच्या कालबाह्य पद्धती आणि धोरणांमुळे कल्पकता आणि नावीन्य यांचे खच्चीकरण होते, असे मत त्यांनी मांडले. या पद्धतींमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे असे त्यांचे प्रतिपादन होते. पण, चीनच्या सरकरला हे रुचणे शक्य नव्हते. मा यांनी अलिबाबा पुरस्कृत अँट ग्रुपची स्थापना केली होती आणि त्यासाठी ते ३७ अब्ज डॉलरचा आयपीओ उभारण्याचा तयारीत होते. पण, त्यांनी केलेल्या टीकेनंतर चीनमधील स्टॉक एक्स्चेंजने त्यांना हा आयपीओ उभारण्यास मनाई केली. अलिबाबावर देखील मक्तेदारी कायद्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. एका अर्थाने सरकारची मा यांच्यावर खप्पामर्जी झाली आहे हे उघड आहे.

या सर्वाचे मूळ हे मा यांनी परखड बोलण्यात आहे. मा यांनीच सुरु केलेल्या एका टीव्ही शोमध्ये ते सहभागी झाले नाहीत तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण त्याला मा यांच्या त्या विधानांची आणि सरकारने केलेल्या कारवाईची पार्शवभूमी होती. १९८९ मध्ये चीनच्या तिआनमेन चौकात निदर्शकांवर सरकारकडून रणगाडे घालण्यात आल्याच्या कारवाईचे काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत मा यांनी समर्थन केले होते. मा यांना आता त्याचे स्मरण होत असेल. २०१९ मध्ये अलिबाबाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले, ४८ अब्ज डॉलरची संपत्ती असणारे, करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मदत म्हणून नायजेरियाला मास्क आणि चाचण्या करण्याचे हजारो किट्सचे दान करणारे जॅक मा आता कधी मोकळेपणाने बोलू शकतील का हा प्रश्नच आहे. त्यांना अटक झालेली नाही असे म्हटले होते; बहुधा मा यांचे प्रस्थ एवढे मोठे आहे की चीन सरकारला ते शक्य नसावे. तथापि त्यांच्या संचारावर आणि बोलण्यावर चीन निर्बंध लावू शकतेच. त्याची सुरुवात आता झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट मा यांनी घेतली होती, तेव्हाही मा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे लाडकेच होते. पण, आता काळ फिरला आहे. एके काळी जे जॅक मा चीन सरकारच्या गळ्यातील ताईत होते तेच मा आता 'गले की हड्डी' बनले आहेत. चीनमधील राजवटीला असे लोक गुहेतच राहिलेले आवडतात!

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)