Goan Varta News Ad

एक संधी जगण्याची…

नजरेतलं जग

Story: गौरी भालचंद्र |
10th January 2021, 01:02 Hrs
एक संधी जगण्याची…

प्रत्येकाला सोबतीची गरज असते. कधी सुखात चांदणे वेचायला, तर कधी दु:खाची समजूत घालायला. आपलं काय होतं, या सुखाच्या नि दु:खाच्या व्याख्या व्यक्ती व्यक्तीनुसार बदलत असल्याने नि त्यातही अग्रक्रमाचा हटवाद आड येत असल्याने कुणी कुणाचा सोबती व्हायचे. त्यात लहानपणी कट्टी झाल्यावर बट्टी करताना कुणी पहिले नाव घ्यायचे यावरून जसे रुसवेफुगवे होत होते, याबाबत आपण मोठे न झाल्यामुळे सोबत्यांच्या भाऊगर्दीत आपण एकटे पडतो.

काही वेळा आपल्याला कोडं उलगडत नाही की आपण कितीही पडती बाजू घेतली तरी सोबतीला यायला कुणी राजी होत नाही. यावेळी आपण आतूनबाहेरून खिळखिळे होऊन जातो. आपल्या जगण्यावर आपण नाराज होत जातो. आपल्याला यावेळी उमजत नाही की हे आपल्याला देऊन विधात्याने आपल्या आतली शक्ती आजमावण्याची आपल्याला एक संधी दिलेली असते. दहाही दिशा हात उंचावून आपल्याला साद घालीत असतात. कुणी सोबतीला नसल्याने आपल्यापुढे सगळे पर्याय खुले असतात.

अशावेळी आपण आपली वाटचाल सुरु ठेवून आयुष्यात येणाऱ्या परीक्षा दोन पावले पुढे जाऊन द्यायला शिकलं पाहिजे. आपण एक गोष्ट विसरता कामा नये की आयुष्यात जे जे काही आपले साध्य असेल त्याच्या प्राप्तीसाठी आपण पहिले पाऊल उचलले पाहिजे आणि त्या साध्याची प्राप्ती होईपर्यंत चालणं सुरु ठेवलं पाहिजे. कारण आयुष्यात अपयशी माणसं ती असतात की ज्यांनी लढाई अर्ध्यावरती सोडली वा सुरुवातीलाच पांढरे निशाण दाखवून शरणागती पत्करली. कुणी सोबतीस मिळाले तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कुणी शुभेच्छा दिल्या तर त्यास परमेश्वराची कृपादृष्टी या नजरेने पाहिले पाहिजे आणि अगदी कुणी शाप दिले तरी त्यांना न बोल लावता, त्या शापातून बाहेर पडण्याचे उ:शाप ओळखण्याइतपत आपल्या मनाची अध्यात्मक बैठक घालता आली पाहिजे. काही घटका आपल्याला आपल्याच सावलीत चालावे लागते.

प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आयुष्य तसं फार सरळ, साधं, सोपं असतं आणि ते आहे तसं स्वीकारण्याची जर आपल्याला सहजता लाभली तर फार उत्तम. आपलं जगणं केवळ माणूसपण जपण्यासाठीच असलं पाहिजे इतकी सोपी मनुष्य जन्मामागची आपली तात्त्विक बैठक असायला हवी. आपल्या सर्वांचे आयुष्य आकारात असते ते आपण वेळोवेळी पर्याय देत असलेल्या निवडीवर. परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे. ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं. हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं, तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं. आपलं आयुष्य म्हणजे जीवनाची सकाळपासून दिवस मावळेपर्यंत चालेलेला दिनक्रम आहे.

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नि त्याच्यासोबतचं आपलं नातं हे स्वतंत्र पानावरची वेगळी नोंद असते. या अफाट जगात कोट्यांवधी चेहऱ्यात किती चेहरे आपल्याला भेटतात. त्यातले किती आठवणीत ठेवण्यासारखे असतात. किती पटकन विसरावयासारखे असतात. काही विसरता येतात. काहींना नाही विसरता येत. काही पुन्हा पुन्हा भेटावयास येतात. काही आठवू म्हणले तरी नाही आठवत. 

माणसाला आपला स्वभाव कसा का असेना, पण त्याला समोरच्या माणसाचा स्वभाव हा पुस्तकात वर्णन केल्यानुसार आदर्श असावा असे वाटते. याचे कोडे मला आजतागायत उमगले नाहीये. जितका जास्त अंधार तितकं जास्त कौतुक प्रकाशमान किरणाचं. जितका जास्त खडतर प्रवास तितकं जास्त समाधान मुक्कामावर पोहोचल्याचं. ईश्वराच्या प्रत्येक कृतीमागं काहीना काही हेतू आहे. ईश्वर दयाळू आहे. त्याच्याकडे प्रत्येकासाठी काही ना काही उपहार असतो. आपण फक्त योग्य वेळ येईपर्यंत धीर धरावा नि त्याच्यावरील श्रद्धा ढळू देता कामा नये. त्यानं खोडकरपणे वेळोवेळी घेतलेल्या परीक्षेत यशस्वी व्हावं.

आयुष्यात भेटणारे लोक नि घडणाऱ्या घटना सारं काही असते आपल्यासाठी लिहिलेली नाटकाची एक संहिता. आपण जरी आपले संवाद सडेतोड पाठ केले असले तरी नाटकातील इतर पात्रांच्या चुकीच्या संवादफेकीचा तुमच्या भूमिकेवर परिणाम झाल्यावाचून रहात नाही.

आपणाला आयुष्यात भेटणारी माणसं, आयुष्यात घडणाऱ्या घटना, या साऱ्या गोष्टींमागे परमेश्वराचा काही हेतू दडलेला असतो. सारं काही पूर्वनियोजित संहितेप्रमाणे घडत असतं. कुणी याला योगायोग म्हणो, कुणी प्रारब्ध  म्हणो, कुणी संचित म्हणो, कुणी विश्वास ठेवो, अगर न ठेवो....परमेश्वराला स्वत:ला काही त्याचं अस्तित्व सिद्ध करावयाचा सोस नाही. त्याला नाकारणाऱ्या चेहऱ्यांची त्याला चीड नाही की कीव नाही.

माणसाच्या स्वभावाची एक मोठी गंमत असते. त्याला आपल्या  हातातल्या गोष्टीचं मोल नसतं नि हाताबाहेरच्या गोष्टींची किंमत ठाऊक असते. मोल हे नगदी आहे नि किंमत ही फसवी आहे, हे त्याच्या गावी नसते. दुसऱ्याच्या ताटातील पुरण –पोळी पहात बसतो तेव्हा त्याला त्याच्या ताटातील ज्वारीची सुंदर गरमागरम भाकर थंड होत जाते याची जाणीव नसते.

कुठेतरी कधीतरी विसाव्यास थांबून शरीर नि मनही हलकं करणं गरजेचे आहे आणि ते विसावे प्रत्येकाच्या आयुष्यात पावलो-पावली ईश्वराने पेरलेले असतात. आपणच आपल्याला भावणारे संवाद, दुसऱ्याच्या मुखातून यावेसे वाटणारे आपल्या तोंडी म्हणायचे. आपणच आपली टाळी आपल्याला देण्याचीही भूमिका पार पाडावयाची. असं आयुष्य जगता आलं की मग वेगळाच आनंद अनुभवता येतो आपल्याला. आयुष्य आपल्याला प्रत्येकाला एक संधी देत असतं उत्तम जगण्याची. म्हणतात ना जीवन जगणं म्हणजे एक कला आहे. हे खरेच आहे अगदी. आपली संधी आपणच घेऊन आणि परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याची कला अवगत केली पाहिजे.

(लेखिका साहित्यिक आहेत.)