श्री बोडगेश्वर जत्रोत्सवाला परवानगी द्या!

राष्ट्रवादी पक्षाचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 10:39 pm

उपजिल्हाधिकारी अक्षय पोटेकर यांना निवेदन सादर करताना संजय बर्डे व राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : गोव्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध श्रीदेव बोडगेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव येत्या २७ जानेवारी रोजी होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या जत्रोत्सवासाठी देवस्थानाला परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने बार्देशचे उपजिल्हाधिकारी अक्षय पोटेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली सितेश मोरे, केशव बर्डे, संजू तिवरेकर, अनिक केरकर व इतरांनी हे निवेदन सादर केले आहे. करोना महामारीमुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने या लोकांना व्यवसायाची संधी मिळते. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही आडकाठी न आणता जत्रोत्सवाला परवानगी द्यावी. तसेच व्यावसायिकांना कुठल्याही बंधना शिवाय स्टॉल्स उभारण्यास मोकळीक द्यावी, असे आवाहन बर्डे यांनी उपजिल्हाधिकार्‍यांना केले आहे.
वागातोर येथे सध्या सनर्बन क्लबतर्फे नियमांची पायमल्ली करून संगीतरंजनींचे आयोजन केले जात आहे. नाशवंत वस्तू हटविण्याचे कारण पुढे करून या पार्ट्यां वाजविल्या जात गेल्या. त्यामुळे उपजिल्हाधिकार्‍यांंनी पोलिसांना सक्त आदेश देऊन या पार्ट्यांवर कारवाईची करावी, अशी मागणीही बर्डे यांनी यावेळी उपजिल्हाधिकारी पोटेकर यांच्याकडे केली.
उपजिल्हाधिकारी पोटेकर म्हणतात...
- जत्रोत्सवासंदर्भात बोडगेश्वर देवस्थानासोबत बैठक झाली अाहे. त्यांना परवानगीसाठी अर्ज करण्याची सूचना केली आहे. देवस्थानाने आम्हाला हमीपत्र द्यावे व त्यानुसार परवानगी दिली जाईल.
- करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने घातलेल्या एसओपींचे पालन करून जत्रोत्सव करावा, हीच आमची अपेक्षा आहे. जत्रोत्सवाला प्रशासनाचा विरोध नाही.
- वागातोर येथे होणार्‍या पार्ट्या बंद करण्याचे निर्दश पोलिसांना यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर पार्ट्यांवर कारवाईची जबाबदारी पोलिसांची आहे.