Goan Varta News Ad

ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

- पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

Story: लंडन : |
06th January 2021, 12:13 Hrs
ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

लंडन : ब्रिटनमध्ये करोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे थैमान सुरू आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये सोमवारी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असलेले जॉन्सन यांनी आपला भारत दौराही रद्द केला आहे.
ब्रिटनमध्ये करोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास असमर्थ असल्याचे जॉन्सन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये याबाबतची चर्चा झाली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळला असून, लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशा स्थितीत मला ब्रिटनमध्ये राहणे आवश्यक असल्याचे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले असल्याचे ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
...................................
फेब्रुवारीपर्यंत टाळेबंदी
इंग्लंडमध्ये सोमवारी लॉकडाऊन जारी झाला आहे. करोनाचा नवा स्ट्रेन अधिक फैलावू नये यासाठी कमीत कमी फेब्रुवारी मध्यपर्यंत नवीन स्टे-ऑन-होम लॉकडाऊन लागू राहील. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून शाळा, कॉलेज, विद्यापीठाचे वर्ग ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता लोकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, ज्याप्रकारे करोनाचा संसर्ग फैलावत आहे, त्यानुसार आपल्याला त्याचा सामना करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.