Goan Varta News Ad

विशाल दृष्टिकोनातून ‘व्हिजन’ची जनसेवा!

- डिचोलीत मोफत नेत्र तपासणी शिबिर : ३०७ जणांना लाभ; ९० रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd November 2020, 12:41 Hrs
विशाल दृष्टिकोनातून ‘व्हिजन’ची जनसेवा!

डिचोली : शिक्षा व्हिजन संस्था डिचोली आणि व्हिजन हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे येथील तारी सभागृहात रविवारी मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात ३०७ नागरिकांची मोफत तपासणी तसेच औषधे देण्यात आली. ९० जणांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार असून, ती व्हिजन हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे. एकूणच शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला.
उद्घाटन डॉ. दयानंद राव, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रशांत चणेकर, दीनानाथ तारी, नारायण बेतकीकर, रिधिमा पळ आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. राव म्हणाले, प्रत्येकाला उत्तम नितळ दृष्टी मिळावी असा दृष्टिकोन बाळगून व्हीजनचे डॉ. शेट्ये हे अनेक वर्षे गावागावांत मोफत सेवा देत आहेत. केवळ आत्मकेंद्रित न होता विशाल दृष्टी बाळगून जनसेवेचे हे व्रत समाजासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यातून शेकडो गरजूंना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य व्हिजन हॉस्पिटल व शिक्षा व्हिजन संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, टप्याटप्याने अशी शिबिरे पूर्ण डिचोलीत होणार आहेत. शिबिरे फक्त डिचोली तालुका मर्यादित असली तरी त्याचा लाभ अनेकांना होणार आहे. या शिबिरांमार्फत सगळ्यांची मोफत नेत्र तपासणी आणि ज्यांना मोतिबिंदू आहे, त्यांचे मोफत ऑपरेशन व्हिजन हॉस्पिटलमध्ये होईल, अशी ग्वाही डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.
शिबिरात डॉ. चंद्रकांत शेट्ये, शुभमिता परब, महानंदा नाईक, डॉ. व्यंकटेश के., डॉ. सिद्धी तेंडुलकर, क्लेटा ब्रागांझा, डॉ. मयूर पत्की, डॉ. वैष्णवी चणेकर, प्रिया काटकर, सुनिता पळ आदींनी तपासणी व सहकार्य केले. सूत्रसंचालन दिलीप धारगळकर यांनी केले. प्रशांत चणेकर यांनी आभार मानले.