Goan Varta News Ad

पत्रकार, साहित्यिक व्हिक्टर रांजेल रिबेरो

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
14th November 2020, 11:49 Hrs
पत्रकार, साहित्यिक व्हिक्टर रांजेल रिबेरो

व्हिक्टर रांजेल रिबेरो हे प्रसिद्ध कादंबरीकार, पत्रकार, संगीतशास्त्री म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म सुकूर- पर्वरीचा. ३ नोव्हेंबर १९२५ रोजी ते जन्मले. त्यांना कोकणी, पोर्तुगीज, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश व इटालियन या भाषा कळतात. त्यातील पहिल्या तीन ते आपल्या मातृभाषा मानतात. मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयातून ते पदवीधर झाले.

‘ब्लिट्ज’ मासिकाचे १९४७ साली सहसंपादक होते. तशेच नॅशनल स्टँडर्ड, कोलकाताच्या टाईम्स आॅफ इंडियाच्या रविवार पुरवणीचे, इलेस्ट्रेडेट विकलीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. १९५० साली त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे ते संगीत समीक्षक होते. १९४०-५० च्या दशकात त्यांच्या लघुकथा अमेरिकेतील अनेक नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. १९५६ साली त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. रांजेल यांनी १९५५ साली ते जे. वाॅल्टर थाँप्सन या आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत काम केले. तेथे काॅपी रायटिंग विभागाचे प्रमुख झालेले ते पहिले भारतीय होते.

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. द मिस्क्रिअंट, तिवोलें, फेरी क्रॉसिंग, मदोना ऑफ द रेनड्राॅप्स अँड डे ऑफ द बाप्तिस्ट, सेन्होर एवजेबियो हॅज हिज ड्रिम्स अँड एंजल विंग्स, लविंग आयेशा अँड अदर टेल्ज. त्यांचे शेवटचे पुस्तक २००२ साली आले. त्यात व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी चित्रे काढली आहेत. अमेरिकेत या पुस्तक चांगली विक्री झाली आहे.

१९६४ साली त्यांनी एक संगीत दुकान विकत घेतले. नंतर त्याचा शास्त्रीय संगीत विभागात बदल केला. जगभरातील ग्राहक त्या दुकानात येतात. न्यूयॉर्क फाऊंडेशन फार द आर्टतर्फे रांजेल यांना १९९१ साली फिक्शन फेलोशिप देण्यात आली. १९९८ साली त्यांच्या ‘तिवोलें’ कादंबरीला मिल्क्वीड नॅशनल फिक्शन पुरस्कार मिळाला.

रांजेल येत्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सौझा यांचे चरित्र प्रकाशित करणार आहेत. ‘द फायर्ज आॅफ गंगापूर’ हे त्यांचे पुस्तकही तयार आहे. त्यांनी बारोके म्युझिक, क्लँबर म्युझिकल क्लासिकल बाॅल सेरटो व इतर कार्यक्रमांचे ‘संगीताच्या भाषेत’ अनुवाद केले आहे. संगीताचे शिक्षणही त्यांनी दिले आहे. इंटरनॅशनल चेंबर ऑर्केस्ट्राचे ते प्रमुख होते. १९७० साली त्यांनी न्यूयॉर्कच्या बिथोवन सोसायटीच्या संगीत संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

रांजेल यांची काही पुस्तके येल व गोवा विद्यापीठात शिकवली जातात. साहित्यिक म्हणून त्यांची ओळख असली तरी सल्लागार, शिक्षक म्हणून त्यांनी बराच काळ काम पाहिले आहे. न्यूयॉर्क लिटररी वोलंटियर्स संस्थेत ते सहा महिने स्वयंसेवक होते. त्यांनी प्रौढ निरक्षरांना वाचन, लिहिणे व गणित शिकवले आहे. सध्या ९५ वर्षे वयाचे रांजेल अमेरिकेत राहतात. 


(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)