नरकासुर : तेव्हाचा आणि आत्ताचा

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
14th November 2020, 11:48 am
नरकासुर : तेव्हाचा आणि आत्ताचा

गोव्यात तरी दिवाळी आणि नरकासुर यांचे समीकरण अतूट आहे. नरकासुराशिवाय दिवाळी ही कल्पना निदान गोव्यात तरी करता येणार नाही. नरकासुर, बाणासुर, शंखासूर यासारखे राक्षस हे दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. दहा तोंडे, डोक्यावर शिंगं, अक्राळविक्राळ दात यासारखी त्यांची केलेली वर्णने किंवा दाखविलेली चित्रे ही काल्पनिक आहेत. दुष्ट प्रवृत्तीचे रौद्ररूप दाखविण्यासाठी ती केलेली आहेत. मुळात या कथा बालमनावर संस्कार करण्यासाठी आहेत. माणसांमध्ये सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रवृत्ती असतात. दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो आणि सत्प्रवृत्तीचा विजय होतो हा संस्कार रुजविण्यासाठी अशा कथा सांगितल्या जातात. मुलं सुसंस्कारित व्हावीत हा त्यामागचा उद्देश असतो. एखाद्याला दहा तोंडे कशी असतील किंवा डोक्यावर शिंग कसे असेल असले विज्ञानवादी प्रश्न या ठिकाणी विचारायचे नसतात. लहान मुलांना चमत्कृतीपूर्ण किंवा अद्भुत गोष्टींचे आकर्षण असते आणि मुलं ती लक्ष देऊन ऐकतात हे लक्षात घेऊन या गोष्टींची रचना केलेली असते. यातले तत्त्व महत्त्वाचे असते. तपशील नव्हे.

साधारण चाळीस -पंचेचाळीस वर्षांपूर्वी केले जाणारे नरकासुर हे अगदी लहान आणि काहीसे दुर्लक्षित होते. लहान मुलांचा खेळ या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाई. आजच्या सारखी प्रतिष्ठा (?) आणि लोकमान्यता त्यांना नव्हती. साधारणपणे दसरा झाला की नरकासुर करण्याचा विचार सुरु होई. वाड्यावरची दहा- पंधरा वर्षे वयोगटातील मुलं एकत्र येत. नरकासुर कसा करायचा, कागद कोणी आणायचे, खळ कोणी आणायची या सारख्या कामाची विभागणी होई. प्रथम नरकासुराचा बांबूपासून तयार केलेला सांगाडा आणायचा. मग जमा केलेले कागद, पुट्ठे, जुने कपडे इत्यादी साहित्याने त्याला सजवायचं. वाड्यावरची कलाकार मुलं मुखवटा करून देत. तीन- चार दिवस रोज रात्री येऊन काम करायचे आणि नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवसापर्यंत तो पूर्ण करायचा. तो पूर्ण झाला की रात्री त्याला वाड्यावर नाचवायचे आणि पहाटे दहन करून घरी जायचे आणि स्वच्छ आंघोळ करायची. घरातल्या स्त्रिया तोपर्यंत देवापुढे, तुळशीपुढे पणत्या लावायच्या.... आणि मग त्या पोह्यांच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात होई.

त्यावेळच्या नरकासुराचे स्वरूप एवढे आहे, सरळ आणि मर्यादित स्वरूपाचे. पण, गोव्याची प्रगती होऊ लागली आणि नरकासुरालाही आपली प्रगती करून घ्यावी असे वाटू लागले. वाड्यापुरता मर्यादित असलेला नरकासुर गाव पातळीवर आला. नरकासुराचा आकार आणि प्रभाव हळूहळू वाढू लागला. तो पंचायत पातळीवर पोहोचला. नरकासुराच्या निर्मितीत लहान मुलांबरोबरच मोठी माणसेही रस घेऊ लागली. नरकासुर करण्याची कला अधिक रुजावी, त्यांना उत्तेजन मिळावे म्हणून नरकासुराच्या स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. स्पर्धा अधिक रोचक व्हाव्यात म्हणून मग बक्षिसे ठेवण्यात येऊ लागली. पंचायत पातळीवर मिळणारा प्रतिसाद पाहून नरकासुराच्या अपेक्षा अधिक वाढल्या. पंचायत पातळीवरून त्या तालुका पातळीपर्यंत पोहोचल्या. नरकासुरांच्या प्रतिमांचा आकार, सजावट, स्पर्धा, बक्षिसे यात वाढ होऊ लागली. तालुका पातळीवर मिळणारा प्रतिसाद, नरकासुरांची वाढती संख्या पाहता त्यांना तालुकाही अपुरा पडू लागला आणि आता नरकासुर संस्कृती राज्य पातळीपर्यंत पोहोचली.

राजधानीत पोहोचल्यावर नरकासुराला अधिकच बळ आले. जनतेमध्ये सुद्धा त्यांना प्रतिष्ठा मिळू लागली. नरकासुर अधिक आकर्षक व्हावेत म्हणून तो तयार करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येऊ लागले. त्यासाठी विविध ठिकाणाहून साधन सामग्री गोळा करण्यात येऊ लागली. आपला नरकासुर भव्य व्हावा या साठी गटागटांत स्पर्धा सुरु झाल्या. पण, त्यासाठी पैशाची कमतरता भासू लागली. अशा वेळी कला आणि संस्कृती (?) यांना उत्तेजन मिळावे म्हणून आम्ही हे कार्यक्रम प्रायोजित करत आहोत, असा दावा करून पैशांचा पुरवठा करणारे प्रायोजक पुढे आले. नरकासुराच्या मोठ्या मिरवणुका काढण्यात येऊ लागल्या. नरकासुर या शब्दात सूर हा शब्द महत्त्वाचा. त्यामुळे त्याचा मान राखत यथेच्छ सुरापान करून मिरवणुकीत नागरिक सहभागी होऊ लागले. आकर्षक प्रकाश योजना, प्रखर प्रकाशझोत, कानठळ्या बसविणारे संगीत यामुळे सारा परिसर दणाणून जाऊ लागला. याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होईल याची क्षिती बाळगण्याचे कारण नरकासुराला नव्हते. प्रभू रामचंद्र अयोध्येत आले तेव्हा प्रजेने त्यांच्या येण्याच्या मार्गावर रोषणाई केली होती. आता नरकासुर येत असलेल्या मार्गावर रोषणाई करण्यात येऊ लागली.

सुरुवातीला राज्य पातळीवर नरकासुरांच्या फक्त प्रदर्शनीय मिरवणुका निघत. त्यासाठी तालुक्यातील नरकासुर एकत्र येत. यात सर्वात बलवान म्हणजे आकर्षक नरकासुर कोण हे ठरविण्यासाठी स्पर्धा घ्याव्यात असे ठरले. प्रत्येक तालुक्यातील नरकासुर आपणच स्पर्धा जिंकावी यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊ लागला. (म्हणजे तो तयार करणारे लोक मेहनत करू लागले.) आपण अधिक आकर्षक दिसावे यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून वस्तू गोळा करू लागला. दिवसा लोकांची वर्दळ असते. त्यामुळे आपण करत असलेली मेहनत लोकांच्या नजरेत भरू शकते. कुणाची नजर लागू शकते. रात्रीच्या काळोखात सराव केला तर कुणाला कळणार नाही त्यामुळे रात्रीचा सराव मोठ्या प्रमाणात सुरु झाला. भरपूर मेहनत केल्यामुळे नरकासुर बलाढ्य म्हणजे अधिक आकर्षक होऊ लागले. पूर्वीचे नरकासुर सामान्य माणसाएवढे आणि सामान्य माणसात खपून जाणारे असत. पण, आताचे नरकासुर आकाशाला गवसणी घालू लागले.

या सर्व धामधुमीत नरकासुर एवढा मोठा झाला की सामान्य माणसातल्या श्रीकृष्णाचे अस्तित्वच कुठे जाणवत नव्हते. प्रकाशझोत नरकासुरावर, श्रीकृष्ण कुठेतरी काळोखात. रथावर विराजमान नरकासुर आणि श्रीकृष्ण रस्त्यावर उभा. श्रीकृष्णाने नरकासुराला मारले आणि प्रजेने श्रीकृष्णाचा जयजयकार केला, असे म्हणतात. पण इथे तर वाद्यवृंदांच्या साथीत ‘नरकासुरा रे नरकासुरा...’ असा नरकासुराचा जयजयकार. वातावरण इतके नरकासुरमय की त्याचेच राज्य आहे काय, असे वाटावे. हे सर्व पाहिल्यानंतर मनात विचार येतो, ‘संभवामी युगे युगे’ म्हणणारा भगवान श्रीकृष्ण खरोखरच अवतार घेईल का? आणि घेतला तर केव्हा?

(लेखक साहित्यिक आहेत.)