Goan Varta News Ad

बिजू नाईक यांची दोन महिन्यांत तिसऱ्यांदा बदली

सात अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:55 Hrs

पणजी : नागरी सेवेतील अधिकारी बिजू नाईक यांची गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा बदली करण्यात आली आहे. प्रथम मडगाव पालिका मुख्याधिकारी, त्यानंतर सात दिवसांत सहकारी सोसायट्यांच्या निबंधक आणि आता त्यांची सर्वसामान्य प्रशासन खात्याचे सहसचिव म्हणून बदली झाली आहे. नाईक यांच्यासह सात अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश कार्मिक खात्याचे अव्वर सचिव शशांक ठाकूर यांनी शुक्रवारी जारी केला आहे.
आदेशानुसार, सेटलमेंट आणि जमीन नोंदणी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांची पर्यावरण खात्याचे संचालक म्हणून, तर पर्यावरण खात्याचे संचालक असलेल्या जॉन्सन फर्नांडिस यांची सेटलमेंट आणि जमीन नोंदणी खात्याचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य लॉटरी विभागाचे संचालक संतोष कुंडईकर यांची गोवा पुनर्वसन मंडळाचे सचिव, तर पुनर्वसन मंडळाच्या सचिव असलेल्या सुषमा कामत यांची लॉटरी विभागाच्या संचालिका म्हणून बदली झाली आहे. दक्षिण गोवा फोंडा विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-तीन अरविंद खुटकर यांची सहकारी सोसायटींचे निबंधक म्हणून, तर हल्लीच सहकारी सोसायटींचे निबंधक म्हणून बदली झालेल्या बिजू नाईक यांची सर्वसामान्य प्रशासन खात्याच्या सहसचिव म्हणून बदली झाली आहे. सर्वसामान्य प्रशासन खात्याचे सहसचिव असलेल्या गौरीश कुट्टीकर यांची दक्षिण गोवा फोंडा विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-तीन म्हणून बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याच्या प्रशासकपदी बदली झालेल्या संजीव गडकर यांच्याकडे मोपा विमानतळाचे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. ग्रामविकास खात्याच्या दक्षिण गोवा प्रकल्प अधिकारी मीना गोलतेकर यांच्याकडे अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक व मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून अतिरक्त ताबा देण्यात आला आहे.