विषाणू

कथा

Story: प्रा. रामदास केळकर |
25th October 2020, 12:49 pm
विषाणू

अंधार पडू लागला तेव्हा मोकळ्या मैदानावरची मुले हळूहळू रेंगाळत... रेंगाळत घरी आली. सर्वांना काही शुभं करोतीची घाई अशी नव्हती, पण येऊन मोबाईलवर संदेश, मिस कॉल आदींचा तपास करायचा होता. मैदानावर खेळत असताना या गोष्टी रेंज नसल्याने जमत नव्हत्या. त्यामुळे मोबाईल असून नसल्यासारखाच. अनंत सध्या आठवीत शिकत होता. लवकरच त्याला फुटबॉलच्या ज्युनिअर गटात संधी मिळणार होती. आज उद्या त्याच्या निवडीची घोषणा होणार होती. या खुशीतच अनंत गेले आठवडाभर होता. शिवाय त्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्येही त्याला खास आमंत्रण देऊन बोलावले होते. तिथे त्याने प्रथमच उच्च दर्जाची सेवा अनुभवली होती. त्याला कोणीतरी रंगीत पेयही प्यायला दिले होते. अर्थात हे सर्व त्याने आपल्या कोचच्या परवानगीनेच केले होते. आईने देखील त्याला कोचच्या भरवंशावर पाठविले होते. 

आज मात्र घरी येताना काही वेगळेच त्याच्या बाबतीत घडणार होते. अनंत व त्याची मित्रमंडळी घरी परतली तो अंधार होत होता म्हणून, पण अनंतला मात्र अजूनही दिसत होते तेही स्प्ष्टपणे. ही गोष्ट त्याला खटकत होती, पण त्याने आपल्या मित्राला याची काहीही कल्पना दिली नाही. हो नाहीतर ते थट्टा करायला मोकळे! अनंत घरी आला आणि लाईट न लावता हातपाय धुवून आपल्या खोलीत गेला. सर्व काही त्याला स्प्ष्ट दिसत होते. हा बदल त्याच्या बाबतीत का बरे घडत होता? अति मोबाईलचा तर परिणाम नसावा ना? लाईटशिवाय तो आरामात घरात फिरत आहे, याचे प्रथम कुणाला नवल वाटले नाही. पण, नंतर मात्र आईच्या मनात शंका आली. ती त्याला म्हणालीसुद्धा, अरे तुला लाईट शिवाय सहज कसे जमू लागले आहे? अनंत यावर उत्तर देणार होता, पण त्याने काही सांगितले नाही.

दुसऱ्या दिवशी अनंत जरा उशिराच उठला, पण त्याला जवळपासच्या गोष्टी स्पष्टपणे दिसेना. त्याला खूप भीती वाटली. आईने त्याला उठवण्यासाठी हाक मारल्या, कारण आतापर्यंत तो सरावासाठी मैदानावर पोचायला हवा होता. कदाचित आज सुट्टी असेल असे तिच्या मनात आले. अनंत धड्पडतच उठला. अंथरुणाच्या घड्या करतानाही तो धडपडत होता. आता मात्र त्याला राहवेना. तो चक्क रडू लागला. त्याचे रडणे ऐकून आई आपले काम सोडून धावतच आली. त्याला जवळ घेऊन म्हणाली का रडतोस? अनंताला शब्द सुचेना कितीवेळ तो स्फुंदतच राहिला. शेवटी धीर करून आईला त्याने सांगितले कि त्याला काहीच दिसत नव्हते. ते ऐकून आईला देखील काय बोलावे ते सुचेना. अनंताचे बाबा गेल्यापासून घरची सर्व जबाबदारी आईवरच पडली होती. धाकटी शकुंतला व हा अनंत, अभ्यासात फार हुशार नसला तरी खेळात तरबेज होता. आपल्याला त्याचा नक्कीच आधार आहे या आशेवर आई पडेल ती कामे स्वीकारून संसार चालवायची. आताच कुठे सगळे मार्गी लागत असताना हे कसले भयंकर संकट! ती अनंताला धीर देत बोलली. काही घाबरू नकोस आपण डॉक्टरकडे जाऊया. 

संध्याकाळी शहरातील डोळ्यांच्या डॉक्टरकडे ती दोघे गेली. डॉक्टरांनी छोट्या अनंतला नीट तपासून काही प्रश्न विचारले. डॉक्टरनी त्याला तपासताना अंधार केला होता, पण त्या अंधारात अनंताला छान दिसत होते. त्याने पटकन डॉक्टरना म्हटले देखील, डॉक्टर मला छान दिसते. एवढ्यात डॉक्टरनी लाईट लावली. त्यावेळी मात्र अनंतला काहीच दिसेनासे झाले. अशा प्रकारची केस डॉक्टर प्रथमच हाताळत होते. आपण मांजरांना रात्रीच्या वेळेस नीट दिसते हे ऐकून होतो, पण इथे चक्क एका लहान मुलाला अंधारात स्पष्ट दिसू लागले होते आणि उजेडात मात्र तो चक्क आंधळा. डॉक्टरचे डोके गरगरू लागले होते. त्यांनी दोघांनाही बाहेर बसायला सांगितले व ते आपल्या जवळच्या समव्यवसायी डॉक्टरांकडे फोनवर संपर्क साधला. एक वेगळीच केस आपल्याकडे आली आहे. तुझे मत मला पाहिजे. त्यांच्या मित्रालाही काय मत सांगायचे ते कळेना, तरीपण त्यांनी स्वतःच क्लिनिकमध्ये येतो म्हणून फोन ठेवला. काही वेळाने डॉक्टरांचा मित्र तिथे पोचला व त्याने अनंताला तपासले. अगदी नॉर्मल मुलाप्रमाणे त्याचे डोळे होते. फक्त फरक पडायचा तो लाईट घालविताना! अंधारात त्याला स्पष्ट दिसे तर उजेडात चक्क अंधार. त्या दोघांनाही घरी पाठविले व दोन्ही डॉक्टरांनी या विचित्र केसवर अभ्यास करायला प्रारंभ केला.

योगायोगाने त्यांचा एक डॉक्टर मित्र इंग्लडहून सुट्टीवर भारतात आला होता. त्याच्याकडे या केससंबंधी बोलले गेले. त्याने पुन्हा एकदा डोळ्यांवर काही विशेष साहित्य मिळते का, याचा शोध घेतला. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य आणि ते मानवी शरीरातील महत्वाचे अंग मानले जाते. या मुलाच्या बाबतीत श्वेत रजत की दृष्टीपटलात दोष निर्माण झाला आहे का? यावरून पुढची दिशा ठरविणे शक्य होणार होते. डोळ्यांतील प्रकाश संवेदी रंगद्रव्य कणांच्या शोधाबद्दल १९६७ चे नोबेल पारितोषिक जॉर्ज वॊल्ड यांना देण्यात आले होते. प्रसंगी त्यांचा कुणी विद्यार्थी सापडला तर त्याच्याकडूनही अधिक मदत मिळू शकेल याचाही विचार त्या मित्राने केला होता. डोळ्यांचे समायोजन कमी झाल्यामुळे निकट आणि दूरदृष्टिता हे दोष उदभवतात, हे बहुतेक नेत्र डॉक्टरांना माहिती होते. पण, अनंताची केस वेगळीच होती. चष्मा लावून किंवा शस्त्रक्रियेने हा दोष एरव्ही कमी होऊ शकतो, पण या मुलाच्या बाबतीत तसे होणार नव्हते. भारतात असताना नेत्ररोगाचे अनेक रोगी त्याने तपासले होते. रांजणवाडी, खुपरी, पापणीशोध डोळे येणे पासून फुल पडणे, तिरळेपणा, हिमांधत्व आदींचा त्यात समावेश होता. अंधत्व का येऊ शकते? याचीही माहिती डॉक्तरांना होती, पण इथे मामला वेगळाच होता. एखाद्या प्राण्याप्रमाणे अनंताला दिवसा अजिबात दिसत नव्हते, मात्र रात्री मात्र स्पष्ट दिसे. यासाठी परदेशी तज्ञ डॉक्टरांशी बोलणे भाग होते. त्याप्रमाणे त्यांनी दिशाही ठरविले होती. 

एव्हाना अनंताला रात्री दिसते, पण दिवसा मात्र तो चक्क आंधळा झाल्याची बातमी शेजारी पाजारी पसरली होती. ही बातमी ऐकून अनंताचा कोच देखील धावून आला. कारण लवकरच अनंताची निवड होणार होती आणि त्याच्या सरावात खंड पडणे धोक्याचे होते. दिवसा त्याला काही दिसत नसल्याने इतरांप्रमाणे त्याचा सराव दिवस न घेता रात्रीच घ्यावा असाही विचार त्या कोचच्या मनात आला होता. पण ,भांबावलेल्या अनंताला आता धीराची गरज होती. अनंतला तपासणाऱ्या नेत्र डॉक्टरांनी त्याचे केसपेपर इंग्लडहून आलेल्या डॉक्टारांकडे ई मेलने पोचते केले होते. त्यावर काहीतरी तोडगा निघेल या आशेवर ते होते.

अनंत मात्र दिवसेंदिवस दुःखी होऊ लागला होता. त्याची आई बिचारी फार शिकलेली नव्हती. तरीपण आपल्या परीने ती त्याला धीर द्यायची. अनंत विचार करत होता. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर हा प्रकार घडला नसावा ना? त्याने ही शंका आईजवळ प्रथमच बोलून दाखविली. आई त्याच संध्याकाळी नेत्रडॉक्टरकडे गेली व ती माहिती देऊन आली. नेत्र डॉक्टराने देखील ती बाब गंभीरपणे घेत आपल्या त्या इंग्लडमधून आलेल्या डॉक्टरच्या कानावर घातली. एक मुद्दा स्पष्ट झाला होता. त्या पेयातून छोट्या अनंतावर जीवघेणा प्रयोग केला नव्हता ना? त्या नेत्रडॉक्टरने अनंतची नीट चौकशी सुरु केली, मार्गदर्शकालाही पाचारण केले तेव्हा अनंतामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू होण्याचे सगळे गुण दिसत होते आणि त्यामुळे तो परदेशी क्लबमध्ये खेळण्यासाठीही पात्र होणार होता. कदाचित या एका कारणामुळे अनंतच्या बाबतीत काहीतरी कारस्थान घडले असावे, या तर्कापर्यंत नेत्रडॉक्टर आले. पोलिसांपर्यंत ही बाब न्यावी कि नको? या संभ्रमात ते पडले. पण, अनंतच्या आईने आडकाठी आणली.

तिचेही खरेच होते. एकतर त्यांची हलाखीची परिस्थिती त्यात ती एकटीच. या सर्व प्रसंगाला तोंड देणे तिला जमणारच नव्हते. मग त्या नेत्रडॉक्टरांनीच पुढाकार घेऊन पुढे जायचे ठरविले होते. एक म्हणजे डोळा आपले प्रमुख अंग. शिवाय असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी, या उक्तीप्रमाणे अनंताचे भावी जीवन खडतर झाले असते. मोबाईल किंवा टीव्हीच्या अतिवापरामुळे त्याचे डोळे बिघडले असते तर गोष्ट वेगळी, पण इथे वेगळाच घातपाताचा प्रकार डॉक्टरांना दिसत होता. त्यात अनंत एक भावी उमदा खेळाडू. इंग्लडमधून आलेल्या डॉक्टराने हाती मिळालेल्या माहितीवरून निष्कर्ष काढायला सुरुवात केलेली होती. छोट्या अनंताच्या दृष्टीवर अशा प्रकारे परिणाम व्हावा यासाठी खास विषाणू कोणीतरी त्याच्या पेयात मिसळला असेल ही शक्यता नाकारता येत नव्हती.

इंग्लडमधून आलेल्या डॉक्टराने अनंताची केस आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविली. त्यावर अभ्यास सुरु झाला आणि त्या विषाणूच्या विरोधात काम करेल अशी खास लस शोधण्यासाठी एका प्रयोगशाळेने जबाबदारी स्वीकारली. कारण ती एका प्रकारची आगळीवेगळी केस होती. कित्येक महिने खपून त्यावर लस शोधायला शास्त्रज्ञांना यश मिळाले. अनंतला त्यासाठी खास इंग्लडला न्यावे लागले. शस्त्रक्रिया चांगली झाली आणि थोड्याच दिवसात त्याला पूर्वीप्रमाणे सामान्य माणसाप्रमाणे दिसू लागले. पुन्हा तो फुटबॉल मैदानावर दिसू लागला. त्या नेत्रडॉक्टराने घेतलेल्या परिश्रमाला फळ लाभले होते. 

(लेखक प्राध्यापक आहेत.)