करोना योद्ध्यांचे कार्य अद्वितीय : श्रीपाद नाईक

केंद्रीय आयुषमंत्र्यांकडून करोना योद्ध्यांचा सत्कार


19th October 2020, 10:55 am
करोना योद्ध्यांचे कार्य अद्वितीय : श्रीपाद नाईक

फोटो : करोना योद्ध्यांचा सत्कार करताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक. सोबत मान्यवर.

पणजी : केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आघाडीवरील करोना योद्ध्यांचा नुकताच सत्कार केला. करोना संक्रमण काळात आघाडीवर कार्यरत राहून, कुटुंबाची तसेच स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता अहोरात्र सेवा बजावणार्‍या करोना योद्ध्यांचे कार्य अद्वितीय आहे, असे मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, खोर्ली (तिसवाडी), कोविड केअर सेंटर - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअम, बांबोळी आणि कळंगुट रेसिडेन्सी येथील कोविड केअर सेंटर व्यवस्थितरीत्या चालवणारे डॉक्टर्स, नर्स आणि निम-वैद्यकीय कर्मचार्‍यांचा प्रमाणपत्र आणि सांडू फार्मस्युटीकलचे रोगतप्रतिकारक शक्तीवर्धन कीट देऊन सत्कार करण्यात आला. सांडू फार्माचे संचालक उमेश सांडू यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

देशात तसेच गोव्यात टाळेबंदी जाहीर केल्यापासून पोलिस, अग्निशमन दल, प्रशासनातील सर्व घटक यांनी अतिशय समन्वयाने कार्य केल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात करोना संक्रमणाला रोखण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. लवकरच या संक्रमणावर लस तसेच विविध औषधे उपलब्ध होतीले. करोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन करण्याचा मानस असल्याचे मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

बांबोळी कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत १,३०२ रुग्ण बरे झाले आहेत. कळंगुट रेसिडेन्सी येथून १,०४० रुग्ण बरे झाल्याची माहिती याप्रसंगी कोविड केअर सेंटर संचालकांनी दिली. कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी औषधोपचारांसह नियमित योगासन सत्राचे आयोजन करण्यात येते. रुग्णांचे समूपदेशन केले जात आहे.

संक्रमण परिस्थितीत सर्व आव्हाने स्वीकारून आघाडीवरील करोना योद्धे करत असलेले काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. केवळ रुग्णांची काळजी घेण्यापुरतेच त्यांचे काम मर्यादित नाही, तर त्यांनी समाजात संक्रमणाविषयी असलेली भीती दूर केली आहे.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष राज्यमंत्री