Goan Varta News Ad

सावध ऐका पुढल्या हाका...

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर सीमेवर पाककडून शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. सोबत घुसखोरी, शस्त्र व अमली पदार्थ तस्करीच्या प्रकारांतही वाढ झालीय.

Story: राज्यरंग - नीलेश करंदीकर |
13th October 2020, 12:56 Hrs
सावध ऐका पुढल्या हाका...

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर सीमेवर पाककडून शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. सोबत घुसखोरी, शस्त्र व अमली पदार्थ तस्करीच्या प्रकारांतही वाढ झालीय. हीच वेळ साधून फुटीरतावादी नेते तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी ‘चीनच्या मदतीने पुन्हा कलम ३७० लागू करण्यात येईल’, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय. हा घटनाक्रम पाहता काश्मीर खोरे अशांत करण्याचा सुनियोजित डाव अधोरेखित होतोय.

 जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर आता १४ महिने उलटलेत. या कालावधीत फारुक, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती अशी ‘राजकीय’ संस्थाने खर्‍या अर्थाने खालसा झाली आहेत. जम्मू-काश्मिरातील राजकीय पटलावर सर्वसामान्य चेहरेही दिसू शकतात, असा समज जनमानसात रुजवण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतून त्याचेे प्रतिबिंब उमटतेय. त्यामुळेच फुटीरतावादी नेते वैफल्यग्रस्त बनलेत. त्यातूनच फारुक अब्दुल्ला यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या वक्तव्यांचा आधार घेतला आहे. जम्मू-काश्मीरचा इतिहास लक्षात घेतल्यास तेथील नागरिकांत वैचारिक गोंधळ राहणे स्वाभाविक होते. त्याचाच लाभ घेऊन देशविरोधात बुद्धिभेद करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवून अब्दुल्ला आणि समविचारी नेत्यांनी आपले बस्तान मांडले होते. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर स्थिती बदललीय. यापूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला पूर्वस्थिती बहाल करावी, अशी मागणी केली होती. काश्मिरींच्या मनात आजही काही अंशी असलेल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या धारणेला चिथावणी देण्याचा हा हेतुपुरस्सर डाव आहे. म्हणूनच ‘सावध ऐक पुढल्या हाका’ या उक्तीप्रमाणे भविष्यात देशविरोधी वैचारिक विषवल्ली वाढणार नाही, याची काळजी केंद्र सरकारला घ्यावी लागेल. त्यासाठी दृश्य स्वरूपात शाश्वत विकास हाच नामी उपाय ठरेल. कलम ३७० हटवल्यानंतर आपल्या आयुष्यात दूरगामी काही परिणाम होतोय, अशी जाणीव जेव्हा काश्मिरातील तरुणांमध्ये होईल, तेव्हाच फुटीरतावाद्यांचे मनसुबे पुरते धुळीस मिळतील. सध्या नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रशासित प्रदेशातील हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

 दुसर्‍या बाजूने पाककडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरूच आहे. सहा दिवसांपूर्वीच राजौरा येथे झालेल्या गोळीबारात सुभेदार सुखवेद सिंग हे हुतात्मा झालेत. पाककडून सातत्याने तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. भारतीय लष्करही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.   नुकताच पुलवामा येथे झालेल्या हदशती हल्ल्यात दोघा जवानांना वीरमरण आले, तर पाच जवान जखमी झाले.  दोन दिवसांपूर्वी कुुलमाग चकमकीत दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सोमवारी श्रीनगर येथे आणखी दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. पाकच्या लष्करप्रमुखांनी नुकताच व्याप्त काश्मीरचा दौरा केलाय. त्यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहा, असा आदेशही दिला आहे. यातून पाककडून आगळीक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सीमेपलीकडून भारतात दहशती कारवाया घडवून आणण्याच्या उद्देशाने तस्करीचे प्रकारही होत असून, लष्कराने ते उघडकीस आणले आहेत. पुलवामासारखा हल्ला करण्याचा कट १७ सप्टेंबरला जवानांनी उधळून लावला. करेवा भागातून तब्बल ५२ किलोे स्फोटके जप्त करण्यात आली. अशी एकामागोमाग तीन तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या सरपंचांना हदशतवादी टार्गेट करू लागले होते. तो प्रकार आतासा कुठे कमी झाला आहे. वरील सर्व घटनांचे अवलोकन करता करोनाशी दोन हात करणार्‍या केंद्र सरकारला काश्मिरातील स्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये’, या जाणिवेतून फारुक अब्दुल्लांच्या वक्तव्याकडे पाहणे उचित ठरेल.