जगण्याचे सार

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर दा. जोशी |
11th October 2020, 11:35 am
जगण्याचे सार

मुंबईतले माझे काम संपवून मी गोव्यात येण्यासाठी निघालो. वाटेत ट्रॅफिक लागल्यामुळे एअरपोर्टवर पोहोचायला थोडासा उशीरच झाला. घाईघाईत चेक इन् केले. विमानात प्रवेश करून माझ्या सीटकडे जाऊ लागलो. माझी सीट अलीकडची होती. पलीकडच्या दोन सीट्सवर एक वृद्ध जोडपं बसलं होतं. त्यातला पुरुष साधारणपणे ऐंशीच्या घरातला असावा. गोरापान, नीटनेटका पोशाख आणि हसतमुख चेहऱ्याचा. डोक्यावरचे केस विरळ झाले होते, पण अगदीच विमानतळ झाला नव्हता. खिडकी जवळच्या सीटवर साधारणपणे त्याच वयाची स्त्री बसली होती. ती त्यांची सहधर्मचारिणी असावी. दोघांत काहीतरी संवाद चालू होता. मी सीटवर बसताच त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. मीही प्रतिसाद दिला. थोड्याच वेळात टेक ऑफ झाले आणि मी थोडा रिलॅक्स होऊन बसलो. 

आता त्या गृहस्थाने त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला. "हॅलो, गुड इव्हिनिंग. हाऊ आर यू?" त्यांनी विचारले. त्यावर "आय एम् फाईन. थँक यू अंकल" असे उत्तर दिले. त्यावर ताबडतोब "नो, नो. डोन्ट से अंकल. आय एम् राम! राम प्रधान. युवर गुड नेम प्लिज?" "आय एम श्रीकृष्ण देशपांडे ". माझं नाव ऐकल्यावर त्यांनी मराठीतच बोलायला सुरुवात केली. "अरे व्वा! म्हणजे फ्लाईटमध्येही रामकृष्णाची जोडी जमली तर." असे म्हणत मांडीवर हलकीशी थाप मारली. मीही हसून प्रतिसाद दिला. "काय आहे देशपांडे साहेब, माझ्यासारख्या मराठी माणसाला अंकल, आंटी असे शब्द ऐकले की अंगावर झुरळ फिरल्यासारखे वाटते. त्याच्यापेक्षा दादा, ताई हे शब्द आपले वाटतात." मी काही बोललो नाही, पण गृहस्थ मला एकदम मनमोकळा, बोलक्या स्वभावाचा वाटला. त्यानंतर मी काय करतो, घरी कोणकोण असतात यासारख्या किरकोळ गप्पा झाल्या. मीही सहज कुतूहलाने "गोव्यात काय कोणा नातेवाईकांकडे चाललात काय?" असे विचारले. त्यावर थोडेसे ऐसपैस बसत त्यांनी बोलायला सुरुवात केली. 

गोव्यात आम्ही दोन दिवसांच्या टूरसाठी चाललो आहोत. मी सरकारी खात्यात ३५ वर्षे नोकरी केली. चांगल्या पदावरून निवृत्त झालो. मोक्याच्या पदावर असूनही शेवटपर्यंत हात स्वच्छ ठेवले. माझं एक तत्व आहे. माणसाच्या खरोखरीच्या गरजा किती? दोन वेळचं अन्न, अंगभर वस्त्र आणि डोक्यावर छप्पर असलं की पुरे. अहो, गरजा काय वाढवाव्या तितक्या वाढतात. त्यामुळे मिळणाऱ्या पगारात आम्ही समाधानी होतो. नेकीने संसार केला. दोन मुलं. एक मुलगा, एक मुलगी. त्यांच्या शिक्षणात कसूर केली नाही. मुलगा बंगलोरला असतो. मुलीचं लग्न करून दिलं. ती आमच्या शेजारच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहते. क्षणभर थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, "अहो, मी तुम्हाला बोअर तर करत नाही ना?" त्यावर पटकन मी म्हणालो, "छे छे अहो बोअर काय? उलट तुमच्यासारख्यांचे अनुभव ऐकताना काहीतरी शिकायला मिळतं."  

काहीशा समाधानी चेहऱ्याने त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. मला काय वाटतं सांगू? माणसानं विशेषतः आजच्या काळात, प्रॅक्टिकल असावं. नाती अवश्य जपावीत, पण त्यात गुंतू नये. कारण त्यात नात्याचा गुंता होण्याची शक्यता असते. आता माझंच बघा ना! माझी मुलं अतिशय गुणी आहेत. स्वतःच्या पायावर भक्कम उभी आहेत. त्यांना माझ्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. पण, निवृत्त होताच मी माझ्याकडे जे काही आहे त्याचे तीन भाग केले. एक भाग मुलाला दिला, दुसरा मुलीला आणि एक आमच्यासाठी ठेवला. निवृत्त झाल्यावर दोन्ही मुलं त्यांच्याकडे येऊन राहण्यासाठी आग्रह करत होती. पण, कटाक्षाने तो मोह टाळला. कारण त्यांना त्यांचे संसार आहेत. त्यांचे विचार आहेत. त्यात आपली ढवळाढवळ नको. म्हातारपणी गरज लागलीच तर जवळ कोणीतरी असावं म्हणून मुलीच्या शेजारच्या कॉम्प्लेक्समध्ये आम्हाला पुरेल असा वन बीएचके फ्लॅट घेतला. मुलगी, जावई रोज येऊन चौकशी करून जातात. नातू येऊन हक्काने आपल्याला हवं ते आजीकडून मागून घेतो. मुलगा, सून वर्षातून दोन- चार वेळा येऊन जातात. आम्हीही अधूनमधून त्याच्याकडे जातो. आता म्हातारपणामुळे थोडासा त्रास होतो. हातपाय थरथरतात. पण, आता सगळ्या सोयी आहेत. मुलगा तिकीट बुक करतो. जावई एअरपोर्टवर सोडतात. मुलगा तिकडे गाडी घेऊन येतो. मनात आलं तर आम्ही टूरवर जातो. सगळं कसं छान चाललंय. 

आमचं हे बोलणं चालू असतानाच त्यांच्या पत्नीने ज्यूसची बाटली काढली आणि झाकण उघडण्यासाठी मिस्टरांकडे दिली. थरथरत्या हाताने त्यांनी झाकण उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. पण, झाकण सील्ड असल्याने ते त्यांना सहजपणे उघडता येईना. त्यांचे प्रयत्न चालू होते, पण त्यांना ते जमत नव्हते. ते पाहून मी त्यांना म्हटले, "सर, माझ्याकडे द्या. मी उघडून देतो." त्यावर माझ्याकडे पहात काहीसे मिस्कील हसत ते म्हणाले, "बेटा, गैरसमज करून घेऊ नकोस. पण, हे माझं काम मलाच केलं पाहिजे. आज तू उघडून देशील, पण उद्या कोण येईल? तुला माहीत आहे ना 'Everyone has to carry his own cross ' आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत. एकदा का आपल्यासाठी कोणीतरी काही करतंय असं दिसलं की माणसाला त्याची सवय लागते आणि माणूस हळूहळू परावलंबी व्हायला लागतो. मग चालण्यासाठी सुद्धा त्याला दुसऱ्याची मदत लागते. मला ते नकोय. मला माहीत आहे वयोमानानुसार आता आमच्याकडून पूर्वीसारखी कामं होत नाहीत. पण, हळूहळू का होईना आम्ही दोघं ती एकमेकांच्या मदतीने करतो. आपण जास्तीतजास्त स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपला आत्मसन्मान अबाधित राहतो. एवढं बोलून त्यांनी तो ज्यूस तीन लहान कपात ओतला. एक मला दिला आणि ते ज्युसचा आस्वाद घेऊ लागले. माझ्यासाठी तो केवळ ज्यूस नव्हता ते जगण्याचे सार होते.

(लेखक साहित्यिक आहेत.)