नऊ दहशतवाद्यांना अटक

एनआयएचे केरळ, पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी छापे


20th September 2020, 12:29 am
नऊ दहशतवाद्यांना अटक

एनआयएने अटक केलेले दहशतवादी.

नवी दिल्ली/कोलकाता : बरेच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अल् कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला; पण राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या विविध पथकांनी पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांत छापेमारी करत या संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे त्यांचा भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा डाव उधळला गेला.

शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम् आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एनआयएच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. भारतात पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल् कायदाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगाल व केरळसह विविध राज्यांत अल् कायदा सक्रिय होत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याची या संघटनेची योजना होती. बंगालमधून सहा आणि केरळमधून ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली.

अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल वस्तू, आक्षेपार्ह दस्तावेज, जिहादी साहित्य, बंदुका, स्फोटके तयार करण्यासाठी लागणार्‍या वस्तू आदी सामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. फटाक्यांसाठी लागणार्‍या बारूदचा वापर आयईडी तयार करण्यासाठी करण्यात येत होता. यात हे सर्व दहशतवादी निष्णात होते. यातील काही दहशतवादी दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते, असे या प्रवक्त्याने सांगितले.

मुर्शिद हसन, याकुब बिश्वास, मोसर्फ हसन, नजमुस साकिब, अबु सुफियान, मैनुल मोंडल, लियू अहमद, अल् ममून कमाल, अतिर रेहमान, अशी जेरबंद केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील हसन हा या टोळीचा म्होरक्या आहे. या सर्वांना पाकिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांकडून आदेश मिळत होते. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासोबतच, काही बड्या व्यक्तींची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता.

नजीकच्या काळातच होती हल्ल्याची योजना

या नऊ दहशतवाद्यांची अटक आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. नजीकच्या काळात दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये मोठा हल्ला करण्याची त्यांची योजना होती. मात्र, त्यापूर्वीच अटक करून हा डाव उधळण्यात आला, असे एनआयएचा प्रवक्ता म्हणाला.

भरतीसाठी प्रक्षोभक भाषणांचा वापर

समाजमाध्यमांद्वारे भारतातील मुसलमान तरुणांची भरती करण्यासाठी हे दहशतवादी प्रक्षोभक भाषणांच्या ध्वनीचित्रफितींचा वापर करत होते. यात वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकिर हुसैनच्या भाषणांचाही समावेश आहे. निधी उभारण्याची जबाबदारीही काही जणांवर सोपविण्यात आली होती. यांतील काही जण शस्त्र व अन्य दारूगोळा खरेदी करण्यासाठी दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते.


हेही वाचा