Goan Varta News Ad

एकशे एक नंबरी सोने

5. माहीत आहे??

Story: महेश दिवेकर, डिचोली |
15th September 2020, 03:15 Hrs
एकशे एक नंबरी सोने

https://www.youtube.com/watch?v=b6lkvH_SOmg

https://www.youtube.com/watch?v=HRHXrR1JpDE

जगात अनेक अभियंते होऊन गेले. आपल्या भारतातही एक जगप्रसिद्ध अभियंता होऊन गेला, त्यांची आठवण आजही लोक काढतात. या अवलिया अभियंत्याचे नाव आहे, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. त्यांच्या नावाने राष्ट्रीय अभियंता दिन पाळला जातो. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांना एकशे एक वर्षांचे दीर्घायुष्य मिळाले आणि एमव्ही यांनी त्याचे अक्षरशः सोने केले. 

कोलार- कर्नाटकातील मुद्देनहळ्ळी या गावी त्यांचा एका गरीब परिवारात जन्म झाला. ते मूळचे आंध्रप्रदेशचे. वडील संस्कृत विद्वान होते. एमव्ही १५ वर्षांचे असताना ते वारले. आईने स्वकष्टाने त्यांना शिकवले. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण पुणे १८८३ मध्ये पूर्ण झाले. मग त्यांनी मुंबईत बांधकाम विभागात काम केले. एमव्ही यांनी अनेक योजना राबवल्या. सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली विकसीत केली व तिचे पेटेंट घेतले. १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास ती लावण्यात आली. नंतर ग्वाल्हेर व कर्नाटकातील कृष्णराज सागर धरणास ती लावली. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, जयचमाराजेन्द्र पॉलिटेक्निक इंस्टिट्युट, बंगलोर अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत प्रकल्प, संस्था त्यांनी सुरु केल्या. रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या अनेक खऱ्या दंतकथाही सांगितल्या जातात. रेल्वेच्या आवाजावरून त्यांनी पुढे रुळ उखडलेले आहेत, हे ओळखले होते.

१९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर ते म्हैसूरचे दिवाण झाले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. १९१७ मध्ये बंगळूर येथे देशातील पहिल्या अभियांत्रिकी संस्थेची स्थापना केली. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न किताब देण्यात आला. तत्पूर्वी त्यांच्या जनहिताच्या कामामुळे नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर किताब दिला होता. १४ एप्रिल १९६२ रोजी बंगळुरू येथे त्यांचे महानिर्वाण झाले.